महापालिकेच्या नायर रुग्णालयात २ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |


 

मुंबई : नायर रुग्णालयामध्ये विविध विभागांमध्ये शस्त्रक्रिया कक्ष आहेत. या शस्त्रक्रिया कक्षांपैकी २ शस्त्रक्रिया कक्ष आता अत्याधुनिक अशा ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ मध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष २०१७ -१८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात नायर रुग्णालयातील २ ‘ऑपरेशन थिएटर’ ही अत्याधुनिक अशा ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ मध्ये रूपांतरित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे ही २ ऑपरेशन थिएटर रूपांतरित करण्यात आली असून यासाठी सुमारे ७ कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे.
 

लहान मुलांच्या दुर्धर शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रिया इत्यादींसाठी ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ हे शास्त्रीयदृष्ट्या तुलनेने अधिक चांगले मानले जाते व यात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णास जंतुसंसर्गाची शक्यतादेखील तुलनेने कमी असते. नुकत्याच कार्यान्वित करण्यात आलेल्या दोन्ही मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचा उपयोग बालरोग व मूत्ररोग शल्य चिकित्सा यासाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ च्या भिंती व छत हे एका विशिष्ट गुणवत्तेच्या स्टेनलेसस्टीलपासून तयार केलेले असते. तसेच यावर विशिष्ट प्रकारचा जंतुप्रतिबंधक रंगदेखील असतो. यामुळे ही ऑपरेशन थिएटर्स जीवाणु प्रतिबंधक, बुरशी प्रतिबंधक आणि धुळ प्रतिबंधक देखील आहेत. प्रस्तावित ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या थिएटरमध्ये हवा शुद्ध करणारे अत्याधुनिक यंत्रदेखील असणार आहे. ज्यामुळे हवेच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य जंतुसंसर्गाचा प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमधील विद्युत यंत्रणा, विद्युत जोडणी, विद्युत खटके तसेच गॅस पुरवठा आदी बाबीदेखील जंतुप्रतिबंधक पद्धतींनीच तयार केलेल्या असतात. ज्यामुळे या प्रकारच्या ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता तुलनेने कमी असते.

 

त्यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या दुर्धर शस्त्रक्रिया यासारख्या जंतुसंसर्गाच्या दृष्टीने तुलनेने अधिक संवेदनशील असणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ असणे अधिक योग्य मानले जाते. या ऑपरेशन थिएटरच्या शास्त्रीयपद्धतीने करण्याच्या साफसफाईला तुलनेने कमी वेळ लागत असल्याने उपलब्ध कालावधीत अधिक शल्य चिकित्सा करणे शक्य होते. मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनसाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक दिवे, दरवाजे, ऑपरेशन कंट्रोल पॅनल, क्ष-किरण यंत्रणा, ऑपरेशन टेबल इत्यादी सुविधादेखील आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर हे ‘प्री-फॅब्रिकेटेड’ पद्धतीचे असल्याने अत्यंत कमी कालावधीत उभारणे व कार्यान्वित करणे शक्य झाले आहे.

@@AUTHORINFO_V1@@