करवसुली वाढली तरीही जीएसटी स्लॅब नाही होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |

सर्वच वस्तुंना एकाच प्रमाणात कर लागू करणे शक्य नसल्याची भूमिका
करांचे दर कमीजास्त होऊ शकतील पण एकमेव स्लॅब राहणे अवघडच!

जीएसटी वसुली प्रतिमाह एक लाख कोटी रु.पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा
जुलैत निफ्टी दहा हजार ९०० बिंदूंपर्यंत जाण्याची शक्यता
 
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू होण्यास एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याचा प्रथम वर्धापन दिन सरकारी वर्तुळात मोठ्या उत्साहात साजरा झाला. असे असले तरी देशभरात जीएसटीचा एकच एक स्लॅब (टप्पा) शक्य नसल्याचे सरकारने स्पष्टीकरण करतांनाच म्हटले आहे की, ‘दूध व मर्सिडिज यांना एकाच तराजूत तोलता येणे शक्य नाही.’ याचाच अर्थ असा की सर्वच वस्तूंना एकाच प्रमाणात कर लागू करता येणार नसल्याची भूमिका सरकारची आहे. मात्र करवसुली वाढत गेल्यास करांचे दर कमीजास्त होऊ शकतील असेही सरकारने सूचित केले आहे.
लहान व्यावसायिकांसाठी जीएसटी हा गेमचेंजर म्हणून सिद्ध होणार असून त्यांना मासिकऐवजी वार्षिक रिटर्न भरण्याची सुविधा मिळण्यावर सरकार भर देणार आहे. प्रत्येक महिन्यात जीएसटी करवसुली (टॅक्स कलेक्शन) एक लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करीत सरकारने वर्षभरात एकूण १३ लाख कोटी रुपयांची करवसुली होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
 
 
एप्रिल, मे व जून या ‘गरम’ महिन्यात करवसुली ‘थंडावत’ असली तरी गेल्या मे महिन्यात ही वसुली ९४ हजार कोटी रुपये इतकी झाली असल्याचेही सरकारने दाखवून दिले आहे. सरकारचे लक्ष्य मात्र दर महिन्याला किमान एक लाख कोटी रुपये वसुलीचे आहे.
 
 
दरम्यान विरोधकांनी सरकारने एक चांगली योजना बरबाद केली असल्याचा आरोप करीत जीएसटीमुळे सामान्य मनुष्या(आम आदमी)वर करांचा बोजा वाढला असल्याची टीकाही केली आहे. ही योजना अनेक त्रुटींसह अतिशय वाईट पद्धतीने लागू केली असल्याचे सांगून विरोधकांनी व्यावसायिकांमध्ये जीएसटी हा वाईट शब्द (बॅड वर्ड) निर्माण झाला असून व्यावसायिक, निर्यातदार व ग्राहक यांच्यासाठी जीएसटी हे दु:स्वप्न बनले असल्याचे वर्णनही केले आहे.
 
 
सरकारने मात्र विरोधकांना ‘द्राक्षे आंबट झाली असल्याने त्यांचा आस्वाद घेता येत नसल्याची खंत वाटत असल्याचा ’ टोलाही लगावला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार जीएसटीमुळे देशातील करप्रणाली सरल झाली असून लोकांचे जीवन सहजसोपे झाले आहे. पण सध्यातरी टॅक्स स्लॅबमधून सुटका होणे अशक्य असून स्लॅब्जची संख्या कमी होणे जरुरीचे असल्याचे मान्य केले आहे. करवसुली वाढल्यास टॅक्स स्लॅब कमी होऊ शकतात. मात्र एकच एक स्लॅब राहू शकणार नाही. दरमहा एक लाख कोटी रुपये करवसुली झाली तर हे स्लॅब कमी होऊ शकतात. तसे पाहिले तर दोनच स्लॅब पुरेसे राहू शकतात.
 
 
तर व्यावसायिकांच्या मते सिमेंट, रंग, फ्रिज यावरील कर कमी व्हावयास हवेत. सरकारने कुठलाही नवा सेस लावू नये. तसेच निर्यातीवरही जीएसटी लागू केला जाऊ नये. जीएसटी लागू झाल्यानंतर करचोरी बर्‍याच प्रमाणावर थांबली असून करांच्या कक्षेत आणखी अनेक व्यावसायिक आले आहेत. एकंदरीत जीएसटीचे हे वर्ष चांगले गेले असल्याचे समाधानही सरकारला वाटत आहे.
 
 
तसेच जीएसटी करवसुली प्रतिमाह एक लाख कोटी रु.च्या वर कायम राहिल्यास पेट्रोल, डिझेल यासारखी द्रव इंधने जीएसटी कक्षेत आणता येतील. पण यास थोडा वेळ लागणार आहे. पेट्रोलियम उत्पादने जरी जीएसटी कक्षेत आणली तरी त्यांच्या किंमती कमी होण्याची शक्यता दुरापास्त असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे राज्यांचे उत्पन्न घटल्यास त्यांना जीएसटीच्या २८ टक्के स्लॅबपेक्षाही जास्त कर लावण्याचा अधिकार कायम राहणार आहे. जीएसटी रिटर्नचा नवा फॉर्म येत्या पाच ते सहा महिन्यात सुरु झाल्यानंतर २०१८-१९ या आर्थिक वर्षात जीएसटी करवसुली वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. एकंदरीत जीएसटीचे पहिले वर्ष चांगले गेले असून या नव्या करप्रणालीने महागाई वाढणार असल्याची ओरड व्यर्थ असल्याचे दिसून आले आहे.
 
 
कालच या स्तंभात म्हटल्याप्रमाणे जुलै महिना हा निफ्टीच्या दृष्टिने सुगीचा काळ असून त्यात त्याने किमान चारशे ते पाचशे बिंदूंची तरी उसळी घेतलेली आहे. तज्ञांच्या मतानुसार या महिन्यात निफ्टीत तेजी संभवते. त्यांच्या म्हणण्यानुसार निफ्टी १० हजार ९०० बिंदूंपर्यंत जाऊ शकतो. मागील वर्षी याच निफ्टीने १० हजार बिंदूंची मानसशास्त्रीय पातळी (सायकॉलॉजिकल लेव्हल) ओलांडली होती. आताही तो कदाचित ११ हजार बिंदूंच्याही पलीकडे जाऊ शकतो.
 
 
काही तज्ञांनी मात्र निफ्टी १० हजार ६०० ते १० हजार ५५० तर काहींनी निफ्टी १० हजार ५५० ते ५०० बिंदूंपर्यंत गडगडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अर्थात दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर दिवस यानुसार या घसरणीचा लाभ घेत तीत गुंतवणूक केली तर बाजार काही दिवसानंतर शॉर्ट कव्हरिंगच्या प्रथेनुसार वधारुही शकतो. तसेच बँक निफ्टी हा निफ्टीपेक्षा फारसा जास्त वाढणार नसल्याचे मतही तज्ञांनी व्यक्त केले आहे.
 
शेअर बाजारात पुन्हा घसरण, निर्देशांकात घट
शेअर बाजारात शुक्रवारी झालेल्या तेजीनंतर आज जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी २ रोजी पुन्हा घसरण झाली असून त्याचे दोन्ही महत्वाचे निर्देशांक चांगलेच गडगडले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स)शुक्रवारच्या बंद ३५ हजार ४२३ बिंदूंवरुन आज सकाळी ३५ हजार ५४५ बिंदूंवर उघडत ३५ हजार ५७८ बिंदूंच्या उच्च तर ३५ हजार १०६ बिदूंच्या नीचांकी पातळीपर्यंत जाऊन आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) शुक्रवारच्या बंद १० हजार ७१४ बिंदूंवरुन सकाळी १० हजार ७३२ बिंदूंवर उघडून १० हजार ७३६ बिंदूंच्या वरच्या तर १० हजार ६०४ बिंदूंच्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन परतला. दिवसअखेरीस सेन्सेक्स १५९ बिंदूंनी कमी होऊन ३५ हजार ३५ हजार २६४ बिंदूंवर तर निफ्टी ५७ बिंदूंनी घसरुन १० हजार ६५७ बिंदूंवर बंद झाला. अमेरिकेने इराणमधून कच्च्या खनिज तेलाची आयात न करण्याचा इशारा भारतासह अनेक देशांना दिल्यानंतर त्याचा भाव ५१०४ रुपये(सुमारे ७५ डॉलर्स) प्रतिपिंप एवढा वाढला होता.
 
@@AUTHORINFO_V1@@