‘संजू’नावाचा बदमाशपणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |


संजय दत्त आणि महेश भट या दोन्ही सेक्युलरीजमचा जप करणाऱ्या व्यक्तिमत्वांमध्ये एक साधर्म्य आहे. एकाच्या मुलाला टायगर मेनन मित्रत्व बहाल केले तर दुसऱ्याच्या मुलासोबत डेव्डिड हेडलीसारख्या दहशतवाद्याला दोस्ती करावीशी वाटली.

 

माध्यमाचा दुरुपयोग कसा करावा, याचा वस्तुपाठ म्हणजे ‘संजू’ हा सिनेमा. संजय दत्त या नटाच्या आयुष्यावर आधारलेला सिनेमा १०० कोटींचा गल्ला मिळवून देणारा सिनेमा ठरल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुळात संजय दत्त हा गुन्हेगारच. त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यासाठी त्याने शिक्षाही भोगली आहे. आता एका गुन्हेगाराचे किती वैविध्यपूर्ण मार्गाने उदात्तीकरण करता येऊ शकते, हे पाहायचे असेल तर ‘संजू’ सिनेमा हे त्याचे उत्तम उदाहरण ठरू शकते. मुद्दा हाच की, या सिनेमातून संजय दत्तचे उदात्तीकरण करणारा राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा दोषी की कारस्थानाच्या पदरात एक नाही, दोन नाही तर शंभर कोटी ओतणारे भारतीय दोषी? केवळ विनापरवाना शस्त्रे ठेवणे हा गुन्हा संजय दत्तवर नव्हता. अशाप्रकारे शस्त्र बनविणारे आणि ती आपल्याकडे बाळगणारे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्याकडे आहेतच. गावठी पिस्तुले, नळीच्या बंदुका असले उपद्व्याप करणारे लोक आपल्याकडे असतातच आणि पकडले गेले की, त्यांना शिक्षा वगैरेही होतात. संजय दत्तचा मुद्दा वेगळा ठरतो तो, ज्या मंडळींकडून त्याने शस्त्र घेतली त्यांच्यामुळे. ज्या मंडळींकडून त्याने शस्त्रे घेतली त्या सगळ्यांचेच लागेबांधे गंभीर देशद्रोहाशी संबंधित व शेकडो लोकांचे प्राण घेणाऱ्या व्यापक षड्यंत्रापर्यंत पोहोचलेले होते. कायद्याच्या कचाट्यात संजय दत्त एक एक करून सापडत गेला, तो त्याच्या बेफिकीर वृत्तीमुळे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे. अमली पदार्थांचे व्यसन, बायकांचा नाद यामुळे त्याच्यासोबत असलेल्या लोकांच्या आयुष्यात निर्माण झालेली वादळे हीच या सिनेमाची खरी पटकथा आहे. मात्र, केवळ मसाला सिनेमा न बनविता संजय दत्तला एक निरागस व्यक्ती म्हणून सादर करण्याचा प्रयत्न क्लेशकारक. ‘संजू’ सिनेमामध्ये असाच बदमाशपणा केलेला दिसतो. संजय दत्त निरागस असेल तर बॉम्बस्फोटात बळी पडलेले निरपराध लोकांचे काय? मूळ मुद्दा पुन्हा हाच की, जातीय दंगलींनंतर जे बॉम्बस्फोट घडवून आणणारे गुन्हेगार होते ते संजय दत्तचे दोस्त होतेच. सिनेमात एकामागोमाग एक असे जे काही प्रवेश दाखविण्यात आले आहेत, जे प्रेक्षकांना मूर्ख बनविण्यासाठीच आहेत.

 

दंगलीनंतर मुस्लिमांसाठी काम करणाऱ्या आपल्या खासदार वडिलांना दंगेखोरांकडून धोका होता म्हणूनच आपण तीन एके ५६ रायफल व हँडग्रेनेड घेतले. हा सगळा ऐवज घेऊन खुद्द अबू सालेम आपल्याकडे आला होता, हे संजय दत्तला माहीत होते. नंतर हे प्रकरण आपल्याला पेलवणारे नाही, हे लक्षात आल्यामुळेच संजय दत्तने त्यातील दोन रायफल परत केल्या. बॉम्बस्फोट झाल्यानंतर ज्या पोलिसी कारवाया झाल्या, त्यात संजय दत्तच्या हाकेला धावून येणारे मित्रही होते. आता हे मित्र काय करीत होते हे आपल्याला माहीत नाही, ही संजय दत्तची कथा कशी खपवून घ्यायची? हे सारे प्रकरण अंगलट येणारच होते व ते आलेच. आता प्रश्न हा आहे की, जर का संजय दत्तला या सगळ्या प्रकरणाची माहिती होती तर त्याने ती पोलिसांना का कळवली नाही? यामुळे मुंबईतील कितीतरी निरपराध लोकांचे प्राण वाचले असते.

 

संजय दत्तचे वडील खासदार होते. त्यांना पोलीस संरक्षण होते. असे असताना त्याचे हे कृत्य समर्थनार्थ होऊच शकत नाही. या सगळ्या प्रकरणात संजय दत्तने सगळे प्रकरण अत्यंत शिताफीने मीडियाच्या माथी मारले आहे. आरडीएक्सचा ट्रक घरी असल्याचा जो दावा माध्यमांनी केला होता, त्यावर सिनेमात खूप चर्चा करण्यात आली आहे. मुळात असा काही दावा पोलिसांनी केलेला नव्हता. न्यायालयातही याबाबत कधीच चर्चा झाली नाही, पण त्याचा उत्तम उपयोग सिनेमात करण्यात आला आहे. इतका उपयोग की, सिनेमाच्या शेवटी आपल्याला वाटायला लागते की, केवळ प्रसारमाध्यमांमुळेच संजय दत्तला यात गोवले गेले. न्यायालयाने त्याला तोंडी देशद्रोही नसल्याचे म्हटले आहे. मात्र, असा काही लेखी निर्वाळा दिलेला नाही. केवळ बंदुकांची देवाणघेवाण असा हा मामला नाही. संजय दत्तची या सगळ्यांशी असलेली दोस्ती व त्यातून त्याच्यावर गुन्हेगारी जगताने केलेले उपकार असा हा सगळा मामला आहे. यात तपासाच्या अभावामुळे प्रकाशात न आलेल्या अनेक गोष्टी आहेतच. दिल्लीतील एका मोठ्या नेत्याच्या भेटीचा प्रसंग यात रंगविलेला आहे. हा ‘बडा नेता’ असा उल्लेख करून जी व्यक्तिरेखा साकारली आहे, ती कुणाशी साधर्म्य साधते हे सांगायला नको. पण, नेत्याच्याच बाबतीत बोलायचे झाले तर एक खूप मोठा तपशील यात टाळण्यात आला आहे. हा तपशील आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचा. संजय दत्तला पहिला जामीन मिळाला तेव्हा राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. बाळासाहेबांशी सख्य साधून त्याचा जो काही परिणाम साधायचा तो संजय दत्तने साधला होता. जेलमधून सुटल्यावर संजय दत्त सरळ ‘मातोश्री’वर गेला होता. इतका मोठा उपकार संजय दत्त आपल्यावरील सिनेमात कसा काय विसरला, हा प्रश्नच आहे.

 

संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे स्वतःला धर्मनिरपेक्ष व मानवतावादी म्हणविणाऱ्यांपैकी होते. सिनेसृष्टीत त्यांचा दबदबाही होता. अशीच गोष्ट महेश भट यांची. स्वत:ला धर्मनिरपेक्ष आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे मक्तेदार म्हणविण्यात यांचा हात कुणीही धरू शकत नाही. या दोन्ही पित्यांमध्ये एक मजेशीर साधर्म्य आहे. अख्खी मुंबई सोडून जसे बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार संजय दत्तलाच येऊन भेटले होते, तसाच डेव्हिड हेडलीसारखा दहशतवादी कारवायांत सहभागी असलेला माणूस महेश भट यांच्या मुलाचा दोस्त झाला होता. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घालणाऱ्यांचा हाही पैलू कधीतरी आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे काय काय धागेदोरे असू शकतात, याचाही तपास घेतला पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@