चर्चा केवळ खडसेंचीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |
  
 
जळगाव महापालिकेची निवडणूक बर्‍याच वर्षांनी पुन्हा एकदा गाजायला लागली आहे. यंदा चर्चेचा विषय महापालिकेतील कथित घोटाळे वगैरे नाहीत तर भाजपा आणि खाविआची युती खरेच होईल का? ही चर्चा वेगवेगळ्या अंगाने चर्चिली जातेय. युतीच्या संकेताने भाजपामध्ये नाराजीचे वादळ उठले आहे आणि या घुसळणीस जबाबदार असलेले खाविआचे नेते मात्र, किनार्‍यावर बसून गंमत बघत आहेत. त्यांना हेच हवे होते का? अशी शंका येण्यासही बरीच जागा आहे. कारण, युतीच्या केवळ संकेतामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत तर मनपा निवडणुकीचे नेतृत्त्व करण्याची क्षमता असलेले ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे हे निर्णयप्रक्रियेपासून दूर आहेत. अशा द्विधा अवस्थेत ना. गिरीश महाजन धडपड करीत आहेत पण ती कुणासाठी? असा किंतु कार्यकर्त्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. भाजपा जिल्हा महानगरच्या संसदीय मंडळाची युतीसंदर्भातील ‘निर्णायक’ बैठक मंगळवारी पक्ष कार्यालयात झाली. सोबत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या गेल्या पण इथेही गाजत राहिली ती नाराजी - आ. खडसेंची आणि कार्यकर्त्यांची.
 
 
बैठकीला ना. महाजन व आ. खडसे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आणि आमदार उपस्थित राहणार असल्याचे पक्षाच्यावतीने प्रसार माध्यमांना कळविण्यात आले होते. बैठकीची वेळ सकाळी १० वाजताची होती. ना. महाजन दीड वाजता आले पण शेवटपर्यंत आ. खडसे आलेच नाहीत. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रचार मोहिमेत ते व्यस्त असल्याचे सांगण्यात येत होते. ते न येण्यामागील कारणांचीही वेगवेगळ्या अंगाने चर्चा होत होती. ते नाराज असल्यापासून ते भाजपाने खाविआसोबत युती केल्यास नाथाभाऊ स्वतंत्र आघाडीद्वारे आपले ‘हुकमी’ उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचेही बोललेे गेले. आता यात खरे किती आणि खोटे किती हे प्रत्यक्ष नाथाभाऊच सांगू शकतील. यावेळी ना. गिरीश महाजन म्हणाले की, महापालिकेची निवडणूक नाथाभाऊंच्या नेतृत्त्वात लढविली जाणार आहे. मुक्ताईनगरला नगरपंचायत निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने भाऊ बैठकीला येऊ शकले नाहीत. ना. गिरीश महाजन यांच्या या विधानाने एक गोष्ट सिध्द झाली की, आ. खडसे आणि ना. महाजन हे सर्व शक्तीनिशी या निवडणुकीत उतरणार आहेत मात्र, आ. खडसे यांचा ‘युती’ला विरोध असल्याने हे प्रत्यक्षात उतरेल का? याचीही कार्यकर्त्यांत चर्चा आहे. या पेचप्रसंगातून ना. महाजन कसा मार्ग काढतात हेही लवकरच दिसेल, अशी अपेक्षा करूया. खाविआने टाकलेल्या गळाला कोण लागते? याबद्दलही उत्सुकता आहे.
@@AUTHORINFO_V1@@