भाजपचे दुबळेपण की, नव्या रणनितीची नांदी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |
  
 
महापालिका निवडणुकीत भाजपा आणि खाविआची युती होणार असल्याचे संकेत ना. गिरीश महाजन आणि माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्याकडून देण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद पक्षातच नव्हे, तर गल्लीबोळातही भाजपाच्या पदाधिकार्‍यांना ऐकायला मिळाले, नसते तरच नवल होते. भाजपचे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे सुरेशदादांच्या विरोधात लढले. त्यांचे ‘कथित’ गैरव्यवहार बाहेर काढले आणि आज त्यांच्याचसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा अजब प्रसंग त्यांच्यावर आला आहे. प्रश्‍न असा पडतो की, स्वबळावर निवडून न येण्याएवढा भाजपा खरेच दुबळा झाला आहे का?
 
 
युतीच्या बाजूने असलेल्या नेत्यांचे ‘भविष्यवेधी’ राजकीय आडाखे सर्वसामान्यांना कळत नसतील पण या सर्व प्रक्रियेत आपल्याला आणि युतीच्या विरोधातील नेतृत्त्वालाही डावलले गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होण्यास मदत झाली आहे. भाजप सुरुवातीपासून दुबळा राहिलेला नाही किंबहुना भाजपा आहे म्हणूनच शहरातील विकासकामे झाली आहेत. माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यामुळे ‘अमृत’ अंतर्गत महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून महापालिका हद्दीतील समांतर रस्त्यांसाठी १३५ कोटी रुपयांचा निधी, तसेच इंदूर-बर्‍हाणपूर-पहूर आणि जळगाव- औरंगाबाद रस्त्याचे चौपदीकरण, शहर विकासासाठी २५ कोटी, महिलांसाठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले असल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगतात. त्यांच्याबरोबर ना. गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे, आ. चंदुलाल पटेल यांच्यासह इतरांच्या योगदानाचाही उल्लेख केला जातो. जळगावचे प्रश्‍न सोडविण्यासंदर्भात भाजपाची बाजू खूप जमेची म्हणायला हवी. पण गेल्या १० ते १२ वर्षांत खाविआला स्वतःच्या ताकदीवर काय करता आले? त्यांना दरवेळी भाजपच्याच दारात जावे लागले आहे, असा इतिहास आहे.
 
 
खाविआ आणि भाजपामध्ये अजून जागा वाटपाचे सूत्र ठरलेले नाही. दोन्ही बाजूने आपल्यालाच सर्वाधिक जागा मिळाव्यात, प्रसंगी स्वबळावर लढावे म्हणून दबाव वाढत आहे. गल्लीबोळात भाजपच्या पदाधिकार्‍यांना जनतेचे ‘बोल’ ऐकावे लागत आहेत. कुणी मतदानावर बहिष्काराची, तर कुणी असहकार्याची भाषा ऐकवित आहे.
 
 
भाजपने महापालिकेत सत्ता हस्तगत करण्यासाठी ‘मार्केट मॅन’ला जवळ करणे तेवढे बाकी होते, यासारखे उपरोधिक टोलेही मिळत आहेत. केवळ युतीच्या संकेतांमुळे एवढी उलथापालथ चालली आहे, तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर पक्षात काय घडेल? याचे चित्र न रंगविलेले बरे.
 
 
भाजपामध्ये एवढा गदारोळ चालला असताना त्याच्याशी आपल्याला काहीच देणेघेणे नाही अशा थाटात पक्षाच्याच काहीजणांनी आपापल्या प्रभागात प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे युतीला विरोध करणार्‍यांचा आवाज क्रमशः क्षीण होत जाणार हे स्पष्टच आहे. ना. गिरीश महाजन यांचे युतीसाठी जे प्रयत्न चालले आहेत, त्यावर महापालिकेतील कथित घोटाळ्यांप्रकरणी दाखल गुन्ह्यांमुळे कदाचित पाणी पडू शकते. वाघूर, विमानतळ, जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी कोर्टात दाखल याचिकेवर १९ जुलैला कामकाज आहे. ही याचिका नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी दाखल केली असली, तरी आ. एकनाथराव खडसे यांनी या कथित घोटाळ्यांबाबत आवाज उठविला होता हे विसरता येत नाही. सुरेशदादांच्या भाषेत सांगायचे तर ‘राजकारण सतत बदलत जाणारे असते’.
 
युतीचा निर्णय चांगला की, वाईट किंवा त्याचे होणारे दूरगामी परिणाम याची पूर्ण जाणीव नेतृत्त्वास असावी. त्याशिवाय एवढे धाडसी पाऊल त्यांनी उचललेही नसते. हे करताना मात्र, सुरेशदादांचे नेतृत्त्व आणि त्यांची कार्यशैली मान्य नसणार्‍यांची सहानुभूती इतके दिवस भाजपला मिळत होती, त्यावर बोळा फिरू नये म्हणजे मिळविले.
 
@@AUTHORINFO_V1@@