अध्यात्मातून समाजाचे उत्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018   
Total Views |



 

अध्यात्म विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा उज्ज्वल वारसा जोपासत आधुनिक समाजाला मार्गदर्शन करणारे अनेक पथदर्शी उपक्रम राबवले जातात. शहापूर, भिवंडी, पनवेल, नवी मुंबई ते गडचिरोली ते अगदी डहाणूपर्यंत अध्यात्म विद्या प्रसारक संस्थेचे समाजाभिमुख उपक्रम सुरू असतात. जगन्नाथ महाराज हे या संस्थेचे आध्यात्मिक गुरू आणि अध्यक्षही आहेत.
 

शहापूरच्या त्या खेड्यामध्ये अध्यात्म्याची चर्चा होती. कीर्तन नुकतेच संपले होते. साधेभोळे गाववाले जे खर्‍या अर्थाने गाववाले होते, आज अध्यात्मासोबतच चर्चा करत होते. भैय्यू महाराजांनी का बरं आत्महत्या केली? आपल्या वारकरी पंथात आपण नित्यनेमाने म्हणतो, ’ठेविले अनंते तैसेची रहावे.’ जर मन शांत तर सगळं शांत. खरं ना महाराज? त्या देवभक्‍त गाववाल्यांनी प्रश्‍न केला. खरं सांगू, महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदायाचा आत्मा वसला आहे. जगभरात अध्यात्म आणि संतविभूतींबाबत काहीही धारणा असली किंवा प्रसंगानुरूप झाली तरी महाराष्ट्रात संत नेहमी आदरस्थानीच असतील. का माहिती आहे? कारण महाराष्ट्राला लाभलेली वारकरी परंपरा. या वारकरी प्रथेनुसार संत म्हणजे कोण? हे विचारले की, आपण उत्तर देतो, ”जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा.” त्यामुळे आपल्याकडे जादूटोणा वगैरे थोतांड माजवणार्‍यांना संतसाधू म्हणत नाहीत, तर जे वंचितांचे दुःख दूर करण्यासाठी झटतात, समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न करतात तेच साधू, असे उभा महाराष्ट्र मानतो. कीर्तनातून समाजोत्थान करू इच्छिणारे आणि अध्यात्म विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील सांगत होते. जगन्नाथ पाटलांना महाराष्ट्रात महाराज म्हणूनच ओळखतात. कर्मकांडांचे स्तोम न माजवता वास्तवामध्ये असणार्‍या प्रश्‍नांना समाजाला सामोरे जाता यावे, यासाठी अध्यात्म विद्या प्रसारक संस्था काम करते.

 
 

अर्थात संतांचे कुळ विचारूच नये, पण संतपरंपरेची सेवा करताना अध्यात्माचा प्रसार करताना जातीनिहाय पारंपरिक चौकटी तोडून भिवंडीच्या गावातला आग्री समाजाचा जगन्नाथ जेव्हा समाजप्रबोधनासाठी कीर्तन आणि अभंगाची कास धरतो, त्यावेळी कौतुक वाटते कारण देश आणि समाजाच्या प्रांजळ विकासासाठी जातीपातीपलीकडे जाऊन व्यक्‍तीचे कार्य आणि स्वीकारार्हता वाढली पाहिजे, यासाठी कितीतरी देशप्रेमी संघटना, व्यक्‍ती झटत असतात. या संघटनांच्या, व्यक्‍तींच्या विचारातील कर्मयोगी संघटना म्हणजे अध्यात्म विद्या प्रसारक संस्था आणि व्यक्‍ती म्हणून जगन्नाथ महाराज यांना पाहायला हवे. संस्थेच्या नावातच अध्यात्म आहे. त्यामुळे कल्पना येतेच की संस्था समाजामध्ये, त्यातही तरुणाईमध्ये अध्यात्मिकता रूजवण्यासाठी काम करते. आता अध्यात्म म्हणजे काय? देव जर सगळ्यात आहे तर तो सगळ्या माणसांमध्येही आहेच. त्यामुळे माणसाने संवेदनशीलतेने प्रामाणिकपणे इतर माणसांचे माणूसपण जपायला हवे, स्वीकारायला हवे. अध्यात्माद्वारा हे प्रामाणिक माणूसपण समाजामध्ये उन्नत व्हावे म्हणून संस्था काम करते.  जगन्नाथ महाराजांशी संवाद साधल्यानंतर संस्थेचे उपक्रम समजले. या उपक्रमांचे स्वरूप ’जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे नाही तर पारंपरिक आणि आधुनिक विचार आणि जाणिवांचा सुरेख संंगम आहे. काही उपक्रम पाहू-

 

अधिक मासाचे जनजागरण

जागतिकीकरणामुळे काही प्रमाणात संपन्न भौतिक जीवनशैली जरी विकसित झाली असली तरी, सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीत या जागतिकीकरणामुळे अनेक पेचही निर्माण झाले आहेत. हे पेच नाजूक आहेत. आता पनवेलला विमानतळ होणार आहे. जागतिकीकरण, शहरीकरण आणि भौतिकवादातून हे अत्यंत फायद्याचे आहे. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. संपत्तीच्या वादातून भाऊबंदकी रंगत चालली आहे. भाऊबंदकीबरोबरच बहिणीचे माहेर परके होते आहे की काय, असे चित्र हळूहळू पसरत जाईल, असे दृश्य दिसते. कारण बहिणींनी माहेर जपले तर कायद्याने तिलाही संपत्तीत हक्‍क आहे. त्यामुळेही सासर माहेरच्या द्विधा अवस्थेत सासुरवाशीण सापडलेली दिसते. अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेतच. या कृत्रिम प्रकाराने निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये सासुरवाशिणीचे माहेरपण जपणे मोलाचे आहे. त्यासाठी अध्यात्म विद्या प्रसारक संस्थेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. आजपर्यंत अधिक मास हा हिंदू समाजात जावयांच्या मानसन्मानासाठी परिचित. त्यामुळे अधिक मासात घरोघरी जावयांना आमंत्रण देऊन त्यांचे यथोचित स्वागत करणे, हे आलेच. याच परंपरेचा आधार घेत संस्थेने एक नवीन उपक्रम सुरू केला. अधिक मासात गावच्या जावयांना आणि लेकीबाळींना आमंत्रण दिले. पूर्ण दिवसभर त्यांचा कौतुक सोहळाही केला. मात्र, हे करत असताना त्यांना आध्यात्मिक प्रवचनातून मार्गदर्शनही केले गेले. कौटुंबिक समुपदेशन केले गेले. ’दिल्या घरी तू मेली’ असे नव्हे तर ’दिल्या घरी तू सुखी राहा’, ’काही त्रास असल्यास माहेर तुझ्या पाठीशी आहे,’ असे सांगणारे मार्गदर्शन माहेरवाशीण मुलींना आणि त्यांच्या पालकांना केले गेले. पनवलेच्या विमानतळामुळे पनवेलच्या समाजजीवनामध्ये, कुटुंबामध्ये काय फरक पडला आहे, हे ज्याने अनुभवले असेल त्याला या उपक्रमाची किंमत नक्‍कीच कळेल. कारण भौतिकतेच्या पायावर उभा राहिलेला स्वार्थाचा तक्षक कुटूंब आणि नातीगोती उद्ध्वस्त करत चालला आहे.

 

धामणगाव

संस्थेने धामणगाव नावाचे गाव दत्तक घेतले आहे. गाव दत्तक घेणे म्हणजे गावातल्या कुप्रथा, अव्यवस्था या सगळ्या समस्यांचे निर्मूलन करणे हे ओघाने आलेच. धामणगावामध्ये संस्था धार्मिक उपक्रमातून नैतिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशा निर्माण करत आहे. आज धामणगावात वादविवाद, तंटेबखेडे यांना जागा नाही. गावातला प्रत्येक उत्सव, सण एकीने साजरे होतात. गावातला प्रत्येक जण दुसर्‍याशी खर्‍या अर्थाने बंधुत्वाच्या नात्याने जोडला आहे. हे संस्थेचे यशच म्हणायला हवे.

 

युवक वर्षान्त समारंभ

दर ३१ डिसेंबरला डोळखांब परिसरातल्या आजाच्या डोंगरावर संस्थेतर्फे युवक वर्षान्त समारंभाचे आयोजन केले जाते, कारण नवीन वर्षदिन कोणता? असे विचारले तर आताही नववर्षदिनाच्या आधी सरत्या वर्षाची रात्र म्हणून इंग्रजी पद्धतीनुसार ३१ डिसेंबरची रात्र विविध रंगाने समोर उभी राहते. अर्थात अपवाद आहेतच. ३१ डिसेंबरच्या रात्री वर्षाचा शेवटचा दिवस मानून भरपूर नशापान करणे, आक्षेपार्ह वर्तन करणे, त्यातून मग वाद होणे, घातपात होणे, अपघात होणे या घटना नित्यनेमाने दर ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात होतात. याला महाराष्ट्रातली गावखेडीही अपवाद नाहीत. उलट गावामध्ये निसर्गरम्य ठिकाणे आणि शहरवस्तीपासून मिळणारा एकांत यामुळे अनेक जण ३१ डिसेंबर रोजी गावात येतात. नववर्षाचे स्वागत म्हणून बाहेरून येऊन गावाचे वातावरण बिघडवतात. याला डोळखांब इथला आजाचा डोंगरही अपवाद नाही. सुंदर निसर्गरम्य ठिकाणावरचा डोंगर. डोळ्यांचे आणि मनाचेही पारणे फिटेल, असे वातावरण. या दिवशी डोंगरावर आजूबाजूच्याच काय दूरवरून युवकांच्या, नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी ३१ डिसेंबर साजरा करायला यायचे. ३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे दुर्दैवाने दारू पिणे, इतर नशा करणे, स्वैर वर्तन करणे असेच काहीसे असायचे. यामुळे परिसराचे पर्यावरणीय तसेच सामाजिक स्वास्थ्यही बिघडू लागले. अध्यात्म विद्या प्रसारक संस्थेने यावर निराळेच उत्तर शोधले. दर ३१ डिसेंबरला डोळखांब परिसरातल्या आजाच्या डोंगरावर संस्थेतर्फे युवक वर्षान्त समारंभाचे आयोजन केले जाते. डोळखांब आणि लगतच्या शहर परिसराल्या युवक-युवतींचे एक दिवसाचे शिबीर घेतले जाते. या शिबिराला २५०० पर्यंतच्या संख्येने युवक-युवती सहभागी होतात. दिवसभर अध्यात्म, नैतिकता, समाजभान, देश आणि समाजासंबंधीची प्रगती त्यासाठी स्वतःची प्रगती यावर भर देणारे मार्गदर्शन अत्यंत उद्बोधक पद्धतीने केले जाते.

 

‘स्वच्छ भारत अभियान’ हा मुद्दा ऐरणीवर आहे. संस्थेतर्फे ठिकठिकाणी ’स्वच्छता अभियान’ राबवले जाते. या माध्यमातून परिसर स्वच्छ तर होतो पण जागतिकीकरणामुळे भौतिक सुखालाच सर्व सुखांचे परिमाण मानण्याची भीती समाजात वेगाने पसरत आहे. नवीन पिढीला संस्कारांची गरज आहे. त्यासाठी संस्था शाळांच्या सुट्टीच्या कालावधीत महाराष्ट्रभर १८७ ठिकाणी २० दिवसांचे संस्कार केंद्र चालवते. यामध्ये १२ हजार बालकांचा सहयोग असतो. संस्थेचे कार्य आध्यात्मिक उन्नतीत समाजाचा सहभाग यावर आधारित आहे. आज समाजात नशेचे जणू पेव पुटले आहे. ‘मै जिता हूँ, गम भूलाने के लिये’ म्हणण्यापेक्षा ‘मै जिता हूँ, पिने के लिये’ ही मानसिकता बोकाळली आहे. शहरी, ग्रामीण आणि वनवासी दुर्गम क्षेत्रातही व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. संस्था वस्तीपातळीवर नशाबंदीसंबंधी प्रबोधन करते. संस्थेचे अनुयायी किंवा सदस्य होण्यासाठी नशाबंदीची शपथ पण घ्यावी लागते. आत्महत्या हा दैनंदिन समाजजीवनाचा सर्वात कटू भाग आहे. जरा मनासारखे झाले नाही की, आत्महत्या करायची ही वृत्ती फोफावत चालली आहे. बालकांच्या मनाला समर्थ करणे, येणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्याचे मनोबल त्यांच्यात तयार करणे यासाठी संस्था शाळाशाळांमधून ‘ताणतणावावर मात’ या विषयावर जागृती करते. महिलांचे आरोग्य हा विषयही संवेदनशील. वस्तीपातळीवर संस्था महिलांसाठी ‘आरोग्य’ या विषयावर काम करते.  नुकतीच वटपौर्णिमा झाली. काही वर्षांपासून असे दिसून येते की, बाहेर जाऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्यापेक्षा, वडाची फांदी तोडून आणून त्याभोवती प्रदक्षिणा करणे याकडे महिलांचा कल जास्त आहे. यामुळे वडाच्या झाडांचे आणि पर्यायाने निसर्गाचे अतोनात नुकसान होते. संस्थेने यावर्षी १०० वडाच्या झाडांचे वृक्षारोपण वटपौर्णिमेच्या दिवशी केले. एक ना अनेक, संस्थेच्या कामाची व्याप्‍ती दिवसेंदिवस वाढत जात आहे.

 

संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ महाराजांशी संवाद साधून संस्थेचे काम अनुभवता आले. त्यातील एक विशेष भावलेला पैलू हा की, महाराष्ट्रभर विविध सामाजिक समस्यांवर काम करताना, मार्गदर्शन करताना संस्थेशी अनेक व्याख्याते, कर्मवीर जोडले गेले आहेत. त्यापैकीच एक अब्दुल शेख ही व्यक्‍ती, संस्थेच्या माध्यमातून ‘राष्ट्रप्रेम’ या विषयावर समाजाला मार्गदर्शन करते. कीर्तन-प्रवचन, राष्ट्र प्रथम या माध्यमातून अब्दुल शेख समाजप्रबोधन करतात.  असो, झी टॉकीजवर जगन्नाथ महाराजांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन हा कार्यक्रम १ मे ते ८ मे २०१७ असा ८ दिवस सातत्याने सुरू होता. या कार्यक्रमामधून कीर्तनातून व्यसनबंदी हा मुद्दा प्रमुख होता. कार्यक्रम लोकप्रिय झाला आणि जगन्नाथ महाराज आणि अध्यात्म विद्या प्रसारक संस्था घराघरात पोहोचली आहे. जगन्नाथ म्हणतात, “समाज आपला आहे, त्याच्या सर्व सुखदुःखांशी आपण निगडित आहोत. त्यामुळे समाजाचे, राष्ट्राचे कल्याण होणे,ही एकच इच्छा आहे.”


@@AUTHORINFO_V1@@