गडचिरोली मधील चकमक आणि डाव्यांचा हिडीस चेहरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |

 
 
'सी सिक्स्टी' ह्या गडचिरोली पोलिसांच्या खास दलाने एप्रिल २२, २०१८ रोजी बोरिया-कसनासुरच्या निबीड अरण्यात झालेल्या कारवाईत जवळपास ३५-४० माओवादी कम्युनिस्टाना कंठस्नान घातले. गडचिरोलीच्या अती दुर्गम परिसरातले नक्षली केंद्र उध्वस्त करून टाकले. काही दिवसातच देशाच्या कान्याकोपर्‍यातून डाव्यांचे समर्थक गडचिरोलीच्या जंगलात येऊन डेरे दाखल झाले. त्यांच्या नेहेमीच्या खाक्या प्रमाणे पोलिसांनी केलेली कारर्वाई ही ‘फेक एंकाऊंटर’ होती असा कांगावा त्यांनी सुरू केला. अर्थात हे सगळं कस अगदी जमवून आणलेल आंदोलन होत. पोलिस यंत्रणेच मनोबल खच्ची करण्याचे सगळे प्रयत्न झाले.


वस्तुस्थिती ही निष्पक्षपणे लोकांपर्यंत आणणे जरूरीचे होते. त्यासाठी भारतीय मानवाधिकार परिषदेचे काही कार्यकर्ते महाराष्ट्राच्या रेड कॉरिडॉर म्हणजे गडचिरोलीच्या जंगलामधून खेडोपाड्यात जाऊन पोहोचले. त्यांनीच स्थापन केलेल्या सत्यशोधक समिती तर्फे गडचिरोली, भामरागड, सिरोंचा ह्या ठिकाणच्या गावकर्‍यांशी आम्ही प्रत्यक्ष संवाद साधला. कुठल्याही प्रकारचे पोलिस संरक्षण न घेता टीम लीडर गजेंद्र डोमले आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी म्हणजेच बोरिया-कसनासुर येथे पाहणी करण्यास पोहोचले. त्यांच्याच भाषेत लोकांशी बोलत गेले. लोकांना बोलतं करत गेले. आणि जे चित्र समोर उभे राहिले ते सून्न करून सोडणारे होते.


गावकर्‍यांच्या आणि परिसरातील आदिवासी लोकांच्या मानसिकतेमध्ये आमुलाग्र बदल झालेला आढळून येतो आहे. कालपर्यंत नक्षलवादी लोकांच्या दहशतीखाली ही माणस वावरत होती. अनोळखी माणसांची चाहूल लागली तरी घाबरून आपल्या कोशात जात होती. तेच गावकरी आज ठाम पणे पुढे येऊन बोलत होते. मन मोकळे करत होते. नक्षलींच्या छायेत असून सुद्धा निर्भयपणे आपल्या वेदना बोलून दाखवत होते. हे सगळ समजण्याच्या पलीकडे होते. प्रत्येक व्यक्ति आपल्यावर झालेल्या नक्षली लोकांच्या अत्याचाराची जखम ऊरामध्ये बाळगून वावरत होते. आज त्यांच्या दु:खाला मोकळी वाट करून दिली जात होती. डाव्यांनी मांडलेल्या उच्छादाला लोक आता कंटाळले होते.


प्रस्तुत लेखात अहवालाच्या निष्कर्षा विषयी ऊहापोह करणे हा उद्देश नाही. जंगलात राहणार्‍या ह्या आदिवासींची विदारक परिस्थिती त्यांच्याच शब्दात मांडलेली आहे. आमची वैयक्तिक मते तूर्तास बाजूला ठेऊन ह्या लोकांनी दिलेली माहिती जशी आहे तशी पुढे मांडत आहे -


- नरेंद्र चौधरी पुंगती, राहणार गर्देवाडा, तालुका एतापल्ली. : मी रोजंदारीवर मोलमजूरी करतो. दिवसाकाठी रुपये १५० कमावतो. १९ एप्रिल २०१२ रोजी माझ्या राहत्या घरामधून नक्षली लोकांनी मला उचलून नेला आणि जंगलात नेऊन टाकलं. 'दलम'च्या लोकांचा माझ्या वर संशय होता की मी पोलींसांचा खबर्‍या आहे. चार दिवस बंदिस्त करून हात पाय बांधून बेदम मारला लाठ्या काठ्यांनी मी बेशुध्ध पडून होतो. तिथून बाहेर आलो आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
 
 
- विश्वेश्वरराव नारायण मडावी, एकटेकका पोस्ट जरवंडी, तालुका एटपल्ली हा तरुण सध्या गडचिरोलीत नौकरीच्या शोधात आहे. दिनांक ७ मार्च २०१२ रोजी नक्षली कमांडर रजिता उसेन्डी आपल्या पंचवीस नक्ष्ली साथीदारांसोबत त्याच्या घरात घुसला. त्यांनी त्याच्या घराला वेढा घातला. त्याचे हात बांधून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला जवळच्या जंगलात घेऊन गेले. विश्वेश्वरराव पुढे सांगतो “मला बेदम मारहाण केली आणि माझी नखं उपटून काढली गेली. माझ्या पायाचे हाड पिचल्याचा मला आवाज ऐकू आला. मला वेदना असहय्य होत होती. मी दुःखाने कळवळत होतो. हे असे चार दिवस चालू राहिले पण माझा गुन्हा काय आहे हेच मला कळत नव्हते. ते मला सारखे विचारात होते की गावकरी लोक सरकारी मदत का घेतात. मला अन्न पाणी देत नव्हते. रात्री केव्हा तरी माझ्या लक्षात आले की पहारा देणारा झोपी गेला आहे. मी तिथून हलक्या पावलांनी पळ काढला. मी जीव मुठीत धरून पळत राहिलो.
 
 
- मनोजा आडवे कांडो, गाव देवडा, कसनासुर, एतापल्ली : सध्या गडचिरोलीमद्धे ड्रायवर म्हणून काम करत आहे. आठ वर्षांपूर्वी म्हणजे १० मे २०१० रोजी नक्षली कमांडर जोगन्ना ह्यांनी माझ्या घरातून मला पळवून नेले. त्यांच्या बरोबर 'दलम'चे अजून चार कमांडर राकेश तुमरेटी, रमेश लेखमी आणि दानी हे पण होते. मला जंगलात नेण्यात आले. माझा २७ दिवस पर्यंत छळ करण्यात आला. मी पोलिसांचा खबर्‍या आहे हा माझ्या वर आरोप लावण्यात आला. ७ जून २०१० रोजी माझी सुटका झाली. त्या पूर्वी माझी पोलिस भरतीसाठी निवड झाली होती. लेखी परीक्षा उत्तीर्ण होवून मी शारीरिक चाचणी पण पार केली होती. मला बिल्ला नंबर ५४३० दिला होता. परंतु त्या नंतर लगेच मी बंदिस्त असल्यामुळे पुढील कारवाई मला करता आली नाही. पुढील वर्षी २०११ ला मी पुन्हा पोलिस भरती साठी अर्ज केला होता. गावाकडे जाऊन माझा रहिवाशी दाखला आणि आदिवासी असल्याचा पुरावा मी आणू शकलो नाही. त्यामुळे माझी उमेदवारी त्यांनी नाकारली. मी पोलिसांत तक्रार दाखल केली पण हे कागदपत्र आणण्यासाठी गावात पाऊल ठेवायची माझी हिम्मत झाली नाही. त्या वेळचे गृहमंत्री आबा पाटलांना मी अर्ज पाठवला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
 
 
- मधुकर उसेण्डि, गाव कसानसूर. हा देखील रु.२२५ च्या रोजंदारी वर गडचिरोलीत काम करतो. २० मे २०१२ रोजी नक्षल कमांडर रजीता उसेण्डि ह्यांनी मधुकरला पळवून नेल. “मला जंगलात बंदिस्त करून चार तास बेदम मारहाण केली. जंगलात नक्षली रिती प्रमाणे रात्रीच्या जेवणा नंतरच कैदयाला मारण्याची प्रथा आहे. पण मला दोरखंडाला बांधत असतानाच माझे आईवडील तिथे पोहोचले. त्यांनी भीक मागितली, गयावया केली पण ते लोक काहीच ऐकायला तयार नव्हते. सुदैवानी रात्री अंधाराचा फायदा घेऊन मी तिथून पळालो म्हणून माझा जीव वाचला.”
 
 
- भीमराव मनू तुमरेट्टी गाव ताडगुडडा, पोतेगाव गडचिरोली. हा आज गडचिरोली येथे पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये विशेष पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. भीमराव सांगतो आहे, “माझे वडील ताडगुडडा गावाचे पोलिस पाटील होते. माझ्या वडिलांची २१.१०.१९९७ रोजी नक्षली कमांडर अशोक ह्यांनी हत्या केली. मी त्या वेळी अवघा दहा वर्षांचा होतो. चौदा वर्षांनी १४ ऑगस्ट २०११ रोजी माझा मोठा भाऊ बाबुराव तुमरेत्ती वय वर्षे ३६ची नक्षल्यांनी हत्या केली. तो नक्षल्यांच्या संपर्कात होता. त्यांना अन्न पुरवण्याच काम तो करत असे. पण काही कारणांनी त्यांच्या मध्ये भांडण झाल आणि माझ्या भावाला त्यांनी मारून टाकला. गावाकडे माझी ३२ एकरची जमीन आहे पण मला नक्षल्यांची दहशत आहे. मी सामान्य माणसासारखे आयुष्य कधीच जगू शकणार नाही. गावी जाण्याची माझी हिम्मत होत नाही."
 
 
- दीप्ती अमल घरमी, गट्टा जंबिया गावची. “२००७ साली नक्षली लोकांनी माझ्या नवर्‍याचा खून केला पण त्याचा काही पुरावा मिळाला नाही. दोन वर्षांनी जानेवरी २००९ मध्ये नक्षली लोकांनी माझ्या थोरला मुलगा बीप्लव ह्याला मध्य रात्री पळवून नेले. २८ जानेवरी २००९ रोजी त्याचा मृत देह रस्त्याच्या कडेला आढळला. २००७ ला सप्टेंबर मध्ये माझा धाकटा मुलगा आनंद वय वर्षे १७ ह्याला पळवून नेले. दुसर्‍या दिवशी त्याचा पण मृत देह सापडला. आम्हा सगळ्यांनाच पोलिसांचा खबर्‍या म्हणून समजले जात होते.” दीप्ती आता चामोरशी पोलिस स्टेशन येथे विशेष पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
 
 
- सोनाली वेंका पेंदाम गाव कातरंग गट्टा, ताडगाव, भामरागड तालुका. सध्या पोलिटिकल सायन्स मध्ये एम.ए. ची परीक्षा देत आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिचा भाऊ रामु वेंका पेंदम पोलिस भरती साठी निवडला गेला होता. ही गोष्ट नक्षली केंद्रावर पोहोचली आणि ते तडक घरात घुसले. सर्व गावकर्‍यांच्या देखत रामुला त्या लोकांनी कापून मारला. “मी खूप घाबरून गेले आणि गाव सोडला. आता पुन्हा गावात पाय ठेवायची माझी हिम्मत होत नाही.” सोनाली आपली कहाणी सांगते.


जवळपास दोनशेच्या वर आदिवासी आपल्या नावागावा सह आपल्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराची इत्थंभूत माहिती आमच्या पुढे मांडत गेले. देचळीपेठा एल्लरूमची शशिकला अंकलू गोमासे हिला नक्षल्यांनी उचलायचा प्लान केला होता पण त्या आधीच तिला माहिती मिळाली आणि ती पळाली. आता ती आपल्या म्हातार्‍या आईला गावात जावून भेटू शकत नाही. धांनोर्‍याच्या मुरूमगावचा राजीव बोधसाई एक्का अवघे दहा वर्षांचे असताना गावापुढे नक्षल्यांनी आपल्या बापाला कापून काढलेले त्यांनी पाहिले. १५ जानेवरी १९९४ आणि १ एप्रिल २००९ धांनोर्‍याच्या हेती गावात सर्व गावकर्‍यांच्या साक्षीने मनोज देवराम माडवीच्या वडिलांना आणि भावाला कापून काढला. त्या पूर्वी त्यांचे डोळे खोबणीतून ओरबाडून काढले. आणि हे लोक समाजामध्ये क्रांती घडवून आणण्याची भाषा करतात?
 
 
कसनासुऱ मधे शेवरी गावचा रमा चुकलू पुंगाटी आज मजूरी करत फिरतो आहे. त्यांनी आपल्या बाप, काका आणि भाऊ ह्यांचे वेगवेगळ्या वेळी गावात झालेले खून पाहिले. घर उध्वस्त झाले. आणि हे नृशंस कृत्य करणारे नक्षली गोर गरिबांचे राज्य निर्माण करणार? एवढे अत्याचार सहन केलेली ही माणसे कोण होती? गावा गावात वसलेली साधीसुधी गरिबीत जगणारे आदिवासी लोक ज्यांच्या समाजाकडून फार अपेक्षा नाहीत. पण यांच्या वरच्या अत्याचारांमधून कूठली आली आहे क्रांती?
 
 
नक्षली कार्यकर्ते विशेषतः शहरांमध्ये राहून सुखासिन आयुष्य जगणार्‍या माओवाद्यांच्या तोंडात कुठल्या वर्ग संघर्षाची भाषा शोभून दिसते? ज्या कष्टकरी शेतकरी कामगार समूदयाच्या उथ्थानाच्या वल्गना हे लोक करत असतात सोईनुसार त्यांच्याच अत्याचाराची दहशत नक्षली चळवळीने तयार केली आहे. कम्युनिझमचा व मार्क्सवादचा हिडीस चेहरा ह्या कारणांनी लोकांपुढे उघड होतो आहे. अपहरण, अत्याचार, लैंगिक ऊपद्रव, खंडणी उकळणे, जोर जबरदस्ती असे सर्व प्रकारचे दंड विधानात नमूद केलेले गुन्हे हे लोक करत आले आहेत. मार्क्सिझम आणि लोकशाही ह्या परस्पर विरोधी संकल्पना आहेत. जगभरातून ह्या विचारधारेचा समूळ नायनाट होत आहे. आपल्यातील अंतर्विरोधामुळे कम्युनिझ्मला जगभरातील लोकांनी पुर्णपणे नाकारले आहे. दूर्दैवाने भारतातच काही ठराविक प्रांतात आणि बंदूकीच्या जोरावर माओवादी प्रतिबंधित संघटनांच्या मार्फत ही विषारी विचारसारणी तग धरून आहे. अर्थात बेलगाम भांडवलशाहीचे समर्थन करणे हा उद्देश नाही. परंतु एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न उकलायला ही अप्रचलित, बंदिस्त तत्वप्रणाली पूर्णपणे निकामी ठरली आहे हे आता जगन्मान्य सत्य आहे. १८४० साली जे खात्रीशीर उपाय समजले जात होते ते ह्या शतकामध्ये अप्रासंगिक आणि असंबध्द ठरत आहे. म्हणूनच निष्पाप आदिवासी लोकांमार्फत कौमरेड्सची फॅक्टरी तयार करण्याचा फॉर्म्युला फार काळ टिकणार नाही.
 

अविनाश मोकाशी
अध्यक्ष, भारतीय मानवाधिकार परिषद
 
@@AUTHORINFO_V1@@