रामलल्ला पावेल कसा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |



 


गरज पडल्यास काँग्रेसच्या वळचणीला जाऊन मित्रपक्षाला फसविणाऱ्या आणि ‘महापौर आमचाच’ म्हणत मुंबईकरांच्या मानगुटावर बसणार्‍या शिवसेनेला रामलल्ला कसा प्रसन्न होईल? शिवसेनेचा आक्रमक हिंदुत्वाकडे झालेला प्रवासही गरजेपोटीच होता.

 

शिवसेनेचे अध्यक्ष अयोध्यावारीला निघाले आहेत. म्हणजे ते कधी पोहोचणार याची तारीख अद्याप तरी त्यांनी जाहीर केलेली नाही. त्यांनी तोंड वर करून सगळ्यांना काहीही विचारले तरी चालते पण त्यांना कुणीही काहीही विचारायचे नसते. २०१९ ला लोकसभेच्या निवडणुका आहेत. सर्वच पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहेत. शिवसेना तरी त्यात मागे कशी राहील? कोण्या एकेकाळी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक असलेल्या व आता शिवसेनेचे सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी शिवसेना भवनाच्या परिसरात होर्डिंग लावली आहेत. ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी,’ देशाच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी पाऊल. असा या होर्डिंगवरचा मजकूर आहे. वाराणसी हा नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदार संघ. तिथे जाऊन काही केले तरी त्याची राष्ट्रीय बातमी होणार, हे शिवसेनेला चांगलेच ठाऊक आहे. २०१४ ला शिवसेनेला भाजपबरोबर युती करून जे यश मिळाले त्यानंतर खरंतर शिवसेनेने आनंदाने नांदायला हवे होते. मात्र लाड करून घेण्याची जुनी सवय लागलेल्या या प्रादेशिक पक्षाला मोदींनी ‘जोर का धक्का’ पण जरा ‘धीरे से’ दिला. राजा भिकारी माझी टोपी घेतली या गोष्टीतल्या उंदरासारखे वर्तन शिवसेनेने तेव्हापासून सुरू केले ते आजतागायत. सेनेचे अनंत गिते मनाजोगते खाते मिळाले नाही म्हणून मोदींकडे रडत गेले होते. यावर मोदींनी त्यांना काय सुनावले ते जाहीर होते. मोदी कामाला लागले पण शिवसेनेचे रुसू बाई रुसू काही केल्या संपले नाही. नंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांत शिवसेनेने भाजपबरोबरची युती तोडली आणि जो काही निर्णय आला तो शिवसेनेलाच धक्का देणारा होता. देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. मागेपुढे रडारड करीत शिवसेना सत्तेत आली खरी पण सत्तेचे सोन्याचे ताट हा उद्धव ठाकरेंचाच शब्दप्रयोग काही केल्या जमला नाही. सोन्याचे ताट तर रोज दिसते पण ते घरी घेऊन जाता येत नाही. अशी काहीशी अवस्था शिवसेनेची आणि त्यांच्या मंत्र्यांची होऊन बसली. मुंबई महानगरपालिकेसारखी मोठी महानगरपालिका हातात असताना मुंबईचे सोने करण्यापेक्षा शिवसेनेने दुसर्‍यांच्या सोन्याच्या ताटाकडे बघण्याचे उद्योग काही केल्या सोडले नाहीत. यातून जे झाले ते इतके विचित्र होते की, त्यामुळे राहुल गांधीनंतर शिवसेना हा राष्ट्रीय विनोदाचा विषय होऊन बसली आहे. सावज काय? शिकार काय? काय वाटेल ते बरळण्याचे उद्योग शिवसेनेचे अध्यक्ष संजय राऊतांना सोबत घेऊन करीत असतात.

 
 

बरोबर वेळ साधून मनोरंजनाचा हा फॉर्म्युला जमविण्यात ठाकरे कुटुंबीयांचा हात उभ्या महाराष्ट्रात कुणीच धरू शकत नाही. तिकडे राज ठाकरे सध्या निरनिराळ्या मुद्द्यांना हात घालून काही केल्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची तडफड करीत आहेत, पण लोक काही त्यांना प्रतिसाद द्यायला तयार नाहीत. प्लास्टिकच्या पिशव्या झाल्या. आता रस्त्यावर नमाज पढायला बसणार्‍या मुसलमानांकडे राज ठाकरेंनी मोर्चा वळविला आहे. कधीकाळी डोक्यावर गोल टोप्या आणि खांद्यावर इस्लामी उपरणे घातलेली राज ठाकरेंची छायाचित्रे आजही गुगलवर पाहायला मिळतात. एकाला रस्त्यावरून हे मुसलमान उठवयचे आहेत, तर दुसर्‍याला अयोध्येला जाऊन रामलल्‍लाचे दर्शन घ्यायचे आहे. हे सगळे हिंदुत्वाचे बेगडी प्रयोग आहेत. २०१९ च्या आधी राहुल गांधींपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत ही सगळी मंडळी आता हिंदुत्वाचा अवलंब करुन का होईना सत्तेत येता येते का, याचा अतोनात प्रयत्न करणार आहेत.

 
 

इतके सारे करूनही यांना रामलल्ला प्रसन्न होणार नाही कारण यांची नियत साफ नाही. शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्वाचे खरे गुपित मराठीचा मुद्दा न चालेनासा झाल्यातच दडलेले होते. रामजन्मभूमी आंदोलनाने देशभरात हिंदुत्वाचे वादळ निर्माण केले होते. अभूतपूर्व असा प्रतिसाद सर्वसामान्य भारतीयांनी यासाठी दिला. बाबरी पडल्यानंतर बाळासाहेबांनी त्यात अत्यंत धाडसी पवित्रा घेतला. बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली आणि धमाल उडवून दिली. बाबरीच्या पतनाला शाहबानो प्रकरणापासून सुरू झालेले राजकारण कारणीभूत होते. मतपेट्यांसाठी हिंदूंच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली होती. या सगळ्या गंभीर विषयात शिवसेनेने प्रत्यक्षात काही केले नव्हते पण हिंदूहिताच्या विषयात बाळासाहेब आक्रमकपणे आवाज मात्र उठवत राहिले. रामजन्मभूमी आंदोलनाच्या रथयात्रेत शिवसेना शिरली ती अशी. आता तो काळ, त्यावेळचे बाळासाहेब ठाकरेंसारखे नेतृत्व, त्यांना झेपणारी आणि शोभणारी त्यांची भाषा यामुळे ते सगळे चालून गेले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेबांनी ठाकरी भाषेत प्रहार करून सत्तेला चिकटून राहण्याचे उद्योग कधीच केले नाहीत. आता मात्र शिवसेनेच्या प्रत्येक भूमिकेनंतर त्यांचा दुटप्पी चेहराच अधिकाधिक उजळून समोर येत असतो. रामलल्ला अशा लोकांना आशीर्वाद देईल, याची दूरवरही शक्यता नाही. उलट आपल्या लवाजम्यासह वाराणसीच्या घाटावर इकडेतिकडे बघत भलीमोठी पंचारती घेऊन ओवाळणारे उद्धव कसे दिसतील, याचे मजेशीर चित्रच समोर उभे राहायला लागले आहे. चॅनलवाल्यांना टीआरपीसाठी हा उत्तम मसाला आहे. हे असले उद्योग करून राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाकांक्षी पाऊल पडत असल्याचा कांगावा शिवसेनाच करू शकते. आता हे जर महत्त्वाकांक्षी पाऊल असले तर गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यात शिवसेनेने लढविलेल्या निवडणुका आणि त्यात फुटूही न शकलेला भोपळा काय होता? हा खरा सवाल आहे.

@@AUTHORINFO_V1@@