शिक्षणाची जिद्द जागवणारा 'बे एके बे'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |


 


मराठी चित्रपटात आजवर अनेकविध विषय यशस्वीपणे हाताळले गेले. कथा, अभिनय, संगीत अशा सर्वच बाबतीत स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणार्‍या या चित्रपटांना लोकाश्रयासोबतच समीक्षकांचीही वाहवा मिळाली. असाच एक वेगळ्या विषयावरील चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाला आहे. संचित यादव लिखित दिग्दर्शित बे एके बे या चित्रपटाने खेड्यातील शिक्षणाच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकला आहे.

 

समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने निरनिराळ्या योजना राबवल्या. परंतु, आजही भारतातील दुर्गम भागात या योजना पोहोचलेल्या नाहीत. अनेक गावांमध्ये शारिरीक आणि शैक्षणिक कुपोषणाने आज आपला पगडा कायम ठेवला आहे. मानवाच्या विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे ही जाणीवच या भागातील जनतेच्या मनात विकसित झालेली नाही. हीच अवस्था आहे या चित्रपटातील खानवली खेड्याची. जनसेवा हीच ईश्‍वरभक्ती मानणार्‍या घरात वाढलेले माधव गुरुजी(संजय खापरे) नावाचे प्राध्यापक शहरी सुखसोयींना तीलांजली देऊन १९९३ साली शिक्षक म्हणून या गावात रुजू होतात आणि पुढच्या दोन वर्षांत गावात काय बदल होतात ते सांगणारा हा चित्रपट आहे.

 

कथा

 

गावाचे पाटील(अरूण नलावडे) आपल्या गावातील आठ मुलांचा माधव गुरुजींना परिचय करून देतात. या मुलांना सर्वसामान्यांसारखे वही पुस्तक हातात घेऊन शिकवणे शक्य नाही असे लक्षात आल्यावर गुरुजी त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवण्याचे ठरवतात. विविध खेळांच्या माध्यमातून, निसर्गाच्या सान्निध्यात झाडे, पाने, फुले, लाकडाचे चुकडे यांच्या साहायाने मुलांना शिकवण्यास सुरुवात करतात. झाडांवर अक्षरे लिहून लपंडावातून शब्द तयार करणे असो वा आकुंचन-प्रसरण समजावण्यासाठी वेताच्या रोवळीत पाणी भरणे असो. आपल्या या एकल विद्यालयात मुलांत मूल होऊन माधव गुरुजी शिकवण्याचे काम करत राहतात. पुढच्या दोन वर्षांत मुलांमध्ये शिकण्याची जिद्द निर्माण करण्यात यशस्वी होतात. इथेच त्यांचा खानवलीमधील मुक्काम संपतो आणि ते दुसर्‍या एका गावाच्या कल्याणासाठी एका गावात निघून जातात. खानवलीतील शिरीष या विद्यार्थ्याला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाल्याच्या बातमीवर हा सिनेमा संपतो.

 

अभिनय

 

माधव गुरुजी संजय खापरे यांनी समरसून काम केले आहे. नलावडे ही आपल्या भूमिकेत मिसळून गेले आहेत. जयवंत वाडकर हे अशिक्षित ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर येतात. अन्य दोन पात्रांच्या माध्यमातून या भागातील व्यसनाधीनता दर्शवली गेली आहे. गावात रोगाची साथ आल्यावर आरोग्यसुविधा उपलब्ध नसणे, अन्नासाठी दुसर्‍या गावात जाऊन घरकामे करावी लागणे किंवा निकृष्ट दर्जाचे मांस सेवन करावे लागणे, स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व नसणे अशा अनेक बारीकसारीक तपशीलांतून व प्रत्यक्ष खेड्यात याचे चित्रण केलेले असल्यामुळे राज्यातील दुर्गम भागाचे वास्तवदर्शी चित्र उभे राहते. चित्रपटात जवळपास पंधरा मुले असून त्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषतः शिरीषचे काम करणारा मुलगा अधिक लक्षात राहतो.

 

दिग्दर्शन व तांत्रिक बाजू

 

चित्रपटाचा विषय, लेखक-पटकथाकार-दिग्दर्शक संचित यादव यांची त्यामागील तळमळ कौतुकास्पद असली तरी चित्रपट परिणामकारक ठरत नाही. चित्रिकरण, संकलन, स्पेशल इफेक्ट यावर अजून काम आवश्यक होते. चित्रपटात एकूण सहा गाणी असून शिवाजी महाराजांवरील पोवाडा विशेष लक्षात राहतो. संचित यादव आणि अभिजीत कुलकर्णी यांच्या गीताला विलास गुरव यांचे संगीत आहे. चित्रपटाचे छायाचित्रण अतुल जगदाळे, संकलक कमल सैगल आणि विनोद चौरसिया आहेत.

 

देशातील दुरवस्थेचे दर्शन घडवणारे, सर्वसामान्य मनाला हळहळ वाटणारे विषय चित्रपटांतून नेहमीच येत असतात. पण या दुरवस्थेवर उत्तर शोधणारे, आशादायक चित्रण असणारे चित्रपटही यायला हवे. माधव गुरुजींसारखे अनेक समाजसेवक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. या चित्रपटातून त्यांचा प्रातिनिधिक परिचय करून देण्याचा संचित यादव यांचा प्रयत्न होता. फक्त या प्रयत्नांना योग्य आकार मिळाला असता तर हा चित्रपट महोत्सवासाठी पात्र ठरला असता इतका विषय सशक्त आहे.

 

निर्मिती : थ्री स्टार एंटरटेनमेंट व नमस्ते एंटरटेनमेंट

 
निर्माते : विकास भगेरीया व पूर्णिमा वाव्हळ यादव

कथा, पटकथा, दिग्दर्शक : संचित यादव

कलाकार : संजय खापरे, जयवंत वाडकर, अरूण नलावडे, साहिल सितारे

 

 
- मृदुला राजवाडे
@@AUTHORINFO_V1@@