चर्चमधली कन्फेशन्स बंद करा; राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्राला सूचना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |



नवी दिल्ली : केरळच्या निरनिराळ्या चर्चेसमध्ये झालेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचार व बलात्कार प्रकरणानंतर देशभरात खळबळ माजली. आता यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाने एक अहवाल सादर केला असून त्यात चर्चमधली कन्फेशन किंवा कबुलीजबाबाची प्रथा बंद करण्याची सूचना केली आहे. कन्फेशनच्या प्रथेमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा निष्कर्ष महिला आयोगाने काढला. या प्रथेमुळे महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जाऊ शकता, त्यामुळे ही प्रथा बंद करावी, अशी सूचना आयोगाने दिली आहे.

 

चर्चेसमध्ये लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून केंद्रीय समितीच्या माध्यमातून याचा तपास करण्यात यावा, अशी सूचनाही महिला आयोगाने केली आहे. धर्मगुरू महिलेला तिच्या आयुष्यातील गुप्त गोष्टी सांगण्यास भाग पाडत असल्याचे एक प्रकरण आमच्यासमोर सुनावणीसाठी आहे. अशाप्रकारची अनेक प्रकरणे घडली असून जे आमच्यासमोर आहे ते केवळ हिमनगाचे टोक असू शकते, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा सांगितले. चर्चमध्ये महिलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराच्या विषयावर महिला आयोगाने एक चौकशी समिती नेमली होती. या समितीला काढलेले निष्कर्ष पंतप्रधान, गृहमंत्री व महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री तसेच केरळ व पंजाबचे पोलीस महासंचालक यांना पाठवण्यात आले आहेत.

 

केरळमध्ये एका महिलेवर पाद्री व बिशप आदी लोकांनी २० वर्षे अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. यामध्ये महिलांचे कबुलीजबाब किंवा कन्फेशन्स वापरून त्यांना ब्लॅकमेल केले होते. तर पंजाबमधल्या एका चर्चमधल्या बिशपनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केरळमधल्या एका नननी केली होती. या घटना समोर आल्यानंतर सगळ्यांचेच लक्ष चर्चमधल्या लैंगिक अत्याचार व बलात्कारांकडे वळले. कन्फेशनमुळे महिलांना ब्लॅकमेल केले जाते, त्यामुळे ही प्रथा बंद करण्याची शिफारस महिला आयोगाने केली आहे. अर्थात, आयोगाची ही सूचना धक्कादायक असून धार्मिक स्वातंत्र्याविरोधात असल्याची प्रतिक्रिया केरळमधल्या बिशप यांच्या संस्थेने व्यक्त केली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री अलफॉन्स कन्ननथनम यांनी या प्रकरणावर म्हटले की, लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सरकार घाला घालणार नाही व ही प्रथा बंददेखील करणार नाही. मुंबईचे आर्चबिशप ओस्वाल्ड कार्डिनल गार्शिअस यांनीही महिला आयोगाची सूचना धक्कादायक असल्याचे सांगत गैरप्रकार रोखण्यासाठी चर्चमध्ये कठोर नियम असल्याची जाणीव करून दिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@