देवदुताची जळगाववारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 
खान्देशवारीवर निघालेल्या देवदुताचा आजचा प्रवास जळगावला होता. जळगावविषयी देवदुताच्या मनात उत्कंठा लागून होती. जळगावची ख्यातीच तेवढी प्रचंड. जळगावच्या टोलेजंग गगनभेदी सतरा मजली इमारतीची स्वर्गात असताना कित्येकदा ठोकर लागली होती देवदुतास. म्हणून त्या सतरा मजली इमारतीस निरखत देवदूत आपल्या विमानातून खाली उतरले. थोडं पुढं जाऊन देवदूतानं आपल्या सेवकाकरवी सतरा मजलीच्या परिसरातील गर्दीची माहिती काढली. एका इसमानं त्यांना माहिती दिली की, निवडणुकांची तयारी चालूये म्हणून आणि तो इसम देवदुतास झटकून निघून गेला.
 
तेवढ्यात भराभरा एकापाठोपाठ एक अशा मोटारी येऊन इमारतीखाली उभ्या राहिल्या. मोटारीतून सफेद वस्त्र धारण केलेले, पोटाचा माठ झालेली माणसं आपलं शरीर सावरत कसेबसे बाहेर उतरले. बाहेर येऊन चेहर्‍यावर हास्यकळ्या फुलवत आपले दोन्ही हात वर उंचावून हलवू लागले. काही माणसं झुकून त्यांना अभिवादन करत होती. काही हस्तस्पर्श, हस्तांदोलन करुन धन्यता मानत होती. अन् पाहता पाहता सगळ्यांचा लवाजमा एकदम त्या इमारतीच्या आत शिरला. देवदूत तर गोंधळूनच गेला. त्याला असला संताप येत होता म्हणून सांगू. तो स्वत:शी पुटपुटू लागला, हे भगवान, काय दिवस आले हे? आम्ही साक्षात देवदूत. पण, आमच्याकडे कुणी ढुंकून पाहायला तयार नाही. आणि हे कोण कुठले पांढरपेशी माणसं...त्यांचा रुबाब पाहा. देवदुतानं नाराज होऊन तिथून काढता पाय घेतला.
 
अचानक देवदुताचं लक्ष बाजूच्या एका उंच इमारतीकडे गेलं. त्यावर होतं भलं मोठं घड्याळ. दहा वाजले होते त्यात. नगराच्या मध्यवर्ती एवढं मोठं घड्याळ म्हणजे इथले लोक वेळेचे चांगले पक्के असावे, असे वाटले असावे त्याला. अचानक देवदुतास दुरुन एक मोठा पुतळा दिसला. त्या दिशेनं त्याची पावलं वळू लागली. पण थोडं पुढे जाताच खमंग सुगंधानं देवदूत मोहीत झाले. बाजूला एका बोळकांडीत बर्‍याच हातगाड्या उभ्या दिसल्या. पाणीपुरी, भल्ला, मिसऴ, पावभाजी, दहीवडा अशी एकाहून एक पाककृती पाहून त्याच्या तर तोंडाला पाणीच सुटलं. पण देवदूत गाडीजवळ जाऊन उभे राहताच त्याच्या हाती एक पुरीचा तुकडा टेकवून त्याला त्या गाडीवाल्याने हुसकावून लावलं. आता देवदुताला पुरती चीड आली. पण सेवकानं सांगितलं की, आपल्याला देवानं संयम ठेवून वृत्त आणण्यास सांगितले आहे. तेव्हा संयम राखावा. देवदुतानं राग गिळला.
 
देवदूत आता फुले मार्केटमध्ये प्रवेश करता झाला. त्या गर्दीतून त्याला सारखे धक्केबुक्के बसू लागले. तो पार वैतागला. तेवढ्यात एक माणूस धावत आला आणि ओरडू लागला, गाडी आली, गाडी आली... अन् बघता बघता त्या दुकानदारांनी आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली! अन् सगळे पटकन पसार झाले तिथून. देवदूत भांबावल्यागत पाहतच राहिला. देवदुताला आता पुढं जायची काही इच्छा होईना. ते परत फिरले. जिथे विमान उतरवले होते, तिथे येऊन पोहोचले. पण विमान काही दिसेना. एका वाटसरूकडून त्यांना माहीत पडले की, ते विमान मनपानं जप्त केलं. का तर म्हणे ’नो ट्राफीक झोन’मध्ये लावलं होतं म्हणून. देवदूत गपकन खालीच बसला. अन् स्वत:चं कपाळ झोडून घेऊ लागला. त्यांना प्रचंड मनस्ताप झाला होता. तेवढ्यात समोरुन त्यांना त्यांच्या सारखाच, पण त्यांच्याहून झपकेबाज व नट्टापट्टा केलेला सोंग्या दिसला. देवदुताचंच सोंग केलं होतं त्यानं. तो तर यांच्यापेक्षाही उठून दिसत होता. आणि येणारे जाणारे लोक त्याला खुशाल पैसे देत होते. देवदूत आणि सेवक दोघेही कावरेबावरे झाले. दोघेही भयंकर चिडले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जळगावातून काढता पाय घेतला. दोघांचं लक्ष वर घड्याळाकडे गेलं. घड्याळात अजूनही दहाच वाजलेले होते.
 
 
 
-कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@