खरा ‘वाघ’ कोणता?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 
 
आपल्या हातातील न्यूज पेपर रागानं खाली ठेवत वाघोबा म्हणाले, च्यामारी, हे रोज रोज पेपरमधी वाचतोय. सारखं आपलं वाघ वाघ. यांचे सारखे सारखे पेपरमधी फोटो काय येता. टीव्हीत काय दिसता. सभा काय घेता. आपल्याला कोणी ईचारतच नाही राव. आपली इकडं दिसेंदिवस संख्या कमी होऊ लागली, अन् ह्ये आपले कधी मुंबईत, कधी नागपूरमधी, कधी पुण्यात, तर कधी कोकणात. आता जळगांवातबी येणार म्हणे. हे वाघ आहे कोणते नेमके? अश्यानं तं आपली किंमत कमी होईन राजा. वाघोबा चिंताग्रस्त झाले.
 
खरंय वाघोबाचं.
 
जळगांवात तर नुसती दहशत निर्माण झालीय म्हणे. वीस वाघ येणार आहेत वीस! एवढ्या वीस वाघांची फौज जळगावात आल्यावर जळगावच्या इतरांचं काही खरं नाही. त्यात ‘छावा’बी येणार म्हणे. अन् जळगांवच्या मोहिमेचे नेतृत्व छावाच करणार असं बी ऐकलंय.
 
हे वाघ जसे प्रसिद्ध तसा या वाघांचा करिष्माबी लय मोठा बरं का. अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडलाय वाघानं. हा वाघ सत्तेत तर असतो, पण नसल्यासारखा. त्याला आवड ती विरोधाची. आंदोलनं, मोर्चे, सभा यात हे वाघ मास्टरमाईंड. पण कश्यालाबी सारखा विरोधच असतो बघा यांचा. मागं ‘जैतापूर’ प्रकल्पाला विरोध केला. मग ‘मेट्रो’ला विरोध केला. ‘बुलेट ट्रेन’लाही विरोध केला. आता ‘नाणार’ गाजतंय. विरोध हा या वाघांचा पिंडच जणू.
 
आता जळगांवात रथी-महारथी येणार. छाव्यांसगट इतर मातब्बर वाघ येणार. अन् लढाई कोणासंगं तर ‘दोन सिंह’ आहेत म्हणे जळगावात. एक जामनेरचा अन् एक मुक्ताईनगरचा. अन यांच्यासंग लढाया वीस वाघांची फौज येतीय. एवढा कसा धाक या सिंहांचा, की तब्बल वीस वाघांनी मैदानात उतरावं? पण, आता काही सिहांचं खरं नाय बाबा. बाकीचे तर हरणं, ससं, माकडं सगळे प्राणी नुसती बातमी ऐकुनच गडप झाले असणार. तेव्हा या सिंहांचा काय निभाव लागणार? त्यात छावाबी येणार म्हणे. छाव्याची नुसती डरकाळी ऐकुन भले भले थर्रर्र कापतात. ज्या शहरात छाव्याचा पाय पडला त्या शहरात वाघाचं राज्य आलंच समजा. छाव्याची स्टेजवर एन्ट्री होताच विजा चमकू लागतात. ढगांचा गडगडाट सुरु होतो. मग मृग नक्षत्र असो वा नसो. समुद्राच्या लाटा किनार्‍यावर धडाधड येऊन आदळतात. सुसाट वारा सुटतो. फक्त दोन्ही हात फैलावून वर करायचा अवकाश. धरणीकंप आलाच समजा. असे खतरनाक, शक्तीशाली युवराज छावे जळगावात येणार. जळगांवचं काय होणार? सिंहांचा काही निभाव लागायचा नाही. एव्हाना तर सिंह पळालेही असतिल दूर कुठे तरी.
 
 
...आता तुम्हीच बघा. दोन पायाच्या वाघाचा असा दरारा असेल तर जंगलातल्या चार पायाच्या वाघानं काय करावं? त्याला कोण म्हणणार राजा? तुम्हीच सांगा. जंगलातल्या वाघाचं राजेपण धोक्यात आलं आहेच, शिवाय जळगावातील ‘वाघ’ विरोधकांचं जिणंही संकटात सापडलंय. भारीच म्हणायचे हो हे वाघ.
 
 
हो पण...छाव्याचा दरारा अन् रूबाब जरी भयानक असला, तरी हा छावा हिंस्र नाही बरं का. कारण त्याला ‘पेंग्विन’ फार आवडतात.
 
 
आपले वाघोबा का चिंताग्रस्त झाले त्याचं कोडं आता सुटलं. वाघोबाला नक्कीच आपल्या अस्तित्वाची काळजी वाटू लागली असावी. पूर्वी धनुष्यातून सुटलेल्या बाणांनी या वाघोबाच्या पूर्वजांचा कंठ फोडला. आता वाघोबाची शिकार होत नाही, पण ज्याच्या हातात धनुष्यबाण दिसतो तोच स्वत:ला वाघ म्हणवून घेतो. असा अजब प्रकार पाहून वाघोबा हैराण आहेत. पण, ‘खरे वाघ कोण?’ हे आता जनतेलाच ठरवावं लागेल. कारण लोकशाहीत जनता सांगेल तेच खरं! जनता म्हणेल तोच वाघ आणि जनता म्हणेल तीच शेळी! म्हणूनच आता जळगांवकर ठरवणार, ‘खरा वाघ कोण’?
 
 
 
 
-कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@