लोकहो, आता प्रसन्न व्हा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 
 
 
प्रचाराचा नारळ फुटला. जळगावातील प्रमुख मंदिरांमध्ये आता नेतेमंडळींची रीघ लागेल. विविध पक्षाच्या, अपक्षांच्या गर्दीमुळे एव्हाना देवबाप्पालाही निवडणुकांची चाहूल लागून चुकली असेल. भलं टेंशन आलं असणार देवाला. कारण जो येतो तो स्वत:च्या विजयाचीच मागणी करतो. आता देव तरी कोणाकोणाला जिंकवणार? काही वेळेस त्रिशंकूसारखी स्थिती किंवा समसमान मते मिळाल्यामुळे चिठ्ठ्या टाकण्याची वेळ येते, ती याचमुळे होत असावी. देवबाप्पा पुरते कात्रीत सापडतात ना. आताही तेच होणार आहे. उमेदवारांसाठी खरा देव जरी मतदार असला, तरीही सगळ्याच देवळांचे उंबरठे झिजवल्याशिवाय ते राहणार नाही. मग देवबाप्पाला लाच देणंही आलंच. ‘मी तुला इतके दान अर्पण करतो, फक्त मला निवडून दे रे देवा’ किंवा ‘मी अमुक अमुक इतक्या पेढ्यांचा नैवेद्य दाखवतो, फक्त मलाच विजयी कर’ अशा प्रकारच्या सगळ्यांच्याच मागण्या व प्रार्थना ऐकून देवबाप्पाची चांगलीच पंचाईत होत असावी. पण देवबाप्पाच तो शेवटी. आपल्या कर्तव्यापासून पळ काढत नाही.
 
 
पण या प्रचाराची सुरुवात देवळांमधूनच का होत असावी? याचे गूढ आता लक्षात येऊ लागले आहे. आपल्या प्रसादाची, नैवेद्याची किंवा दानाची अथवा पूजेची सुरुवात करून उमेदवारांचा हे दर्शविण्याचा प्रयत्न असतो, की बघा, देवबाप्पा आपला पालनकर्ता, आपला कर्ता करविता तोच. त्याच्याच कृपेमुळे आपण सुखी जीवन जगतो. त्याची कृपा आपल्यावर असली म्हणजे मोठमोठी संकटं (राजकीय) कोसळून पडतात. म्हणून सुरुवात बाप्पापासूनच व्हावी. म्हणजे पुढची पापंही धुतली जातात. एवढे जरी कळले तरी राजकीय लोक जनतेला देवाच्या स्थानी का बसवतात, ते लक्षात येईल. एरवी देवाचं अस्तित्व नाकारणारे तथाकथित पुरोगामी या सगळ्यात सर्वात पुढे असतात, हे विशेष.
 
 
‘जनता हेच आमचे दैवत व त्यांची सेवा हीच ईश्वरसेवा’ अशी मोठमोठी विधानं करून जनतेकडून नेतेमंडळी वाहवा मिळवून घेतात, ती काय उगीच? त्याच जनतेला निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासनं देऊन खूश करणं असो, लक्ष्मीप्राप्ती करून देणं असो किंवा पार्ट्या व भंडारे देणं असो, यामागे जनसेवेचाच उदात्त हेतू असतो, हे लोकांना काही कळत नाही. शेवटी जनता हेच त्यांचं दैवत ना. मग देवाला जसा नैवेद्य दाखवतात, दानधर्म करतात त्याचप्रकारे जनता जनार्दनास प्रसन्न करण्यासाठी शुद्ध हेतूने पार्ट्या, लक्ष्मीदर्शन व भंडारे आयोजित केले जातात. त्याचा मीडियाने इतका बाऊ तरी का करावा मग? नेता - पुढार्‍यांच्या इतक्या उदात्त विचाराला आपल्या संकुचित व कूपमंडूक वृत्तीने पाहून मीडिया जन आपला प्रतिगामीपणा सिद्ध नाही का करत?
 
 
आता जनतेनेही जरा देवासारखे वागण्यास हरकत नाही. देवबाप्पा जसा सगळ्या भक्तांच्या (उमेदवारांच्या) मागण्या ऐकून घेतो, नैवेद्य व दानही सगळ्यांचा मोठ्या मनाने स्वीकारतो, तसंच जनता जनार्दनानेही आपल्या भक्तांचे दान, पार्ट्या, भंडारे स्वीकारुन अखेरीस योग्य व्यक्तीवर प्रसन्न होण्यास काय हरकत? आपल्या कर्तव्यापासून देवबाप्पा जशी पाठ फिरवत नाही, तशी जनतेनेही फिरवू नये. देवबाप्पाने आपल्या कर्तव्यांचे पालन करणे सोडले तर जशी दुर्जन शक्ती वाढू लागते, त्याचप्रमाणे जन ईश्वराने आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडणे सोडले, तर सदाचारी व सज्जन लोकनेते मिळणे कठीण होऊन जाईल. तेव्हा आशीर्वाद सगळ्यांना देऊन योग्य व सज्जन व्यक्तीवर प्रसन्न व्हावे, हे अगत्याचे आहे. जनतेने बर्‍याच ठिकाणी ते कुशलतेने निभावले आहे. आता जळगावातही आपली छाप सोडावी, म्हणजे त्यांते प्रिय भक्त सुखावतील.
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@