ईव्हीएमची सत्वपरीक्षा संपली?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 
मागे ईव्हीएम मशिनची सत्वपरीक्षा पाहून झाल्यावर त्याचेही अधिवेशन भरले होते म्हणे. सगळे ईव्हीएम एका ठिकाणी गोळा झाले होते. तिथे त्यांचा नेता बोलत होता. त्यांचे थोडेसे बोलणे कानावर आले. निवडणुका होतात, होत असतात पण पराजय कारण्याइतकं मोठं विशाल हृदय कुणाचं राहिलेलंच नाही बघा. विजय आणि पराभव या एकाच नाण्याच्या दोन बाजू. हार होणार किंवा विजय मिळणार. परंतु, आपण कुठंतरी कमी पडलो का? याची शहानिशा करण्यापेक्षा आयोगाला नाहीतर ईव्हीएम मशिनला जबाबदार धरणे अधिक सोपे वाटते. जनसेवा करण्यात कमी पडल्याचे कबूल करण्याचे सोडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. आपणा सगळ्यांनाही अशाच कुणाच्या पराभवामुळे व कुणाच्या अनपेक्षित विजयामुळे जबाबदार धरले गेले. आजपर्यंत आपण प्रामाणिकपणे काम करत आलो आहोत, पुढेही करत राहू. आपल्यावरील आरोप कसे खोटे आहेत हे जगाला आता कळून चुकले आहे. एका महान माणसाने म्हटले आहे ना, ‘सत्यमेव जयते’. तसाच आपलाही विजय झालाच. सत्य समोर आलेच. आपण निर्दोष ठरलो. टाळ्या वाजल्या. सभा संपली.
 
 
ईव्हीएमवरचे बालंट टळले आहे. ईव्हीएम यंत्रणेसोबत एक परिवर्तन आले आहे.
 
 
तेव्हा कोमल संवेदनशील मनाच्या राजकीय नेत्यांनी, उमेदवारांनी आणि पक्षांच्या अंध समर्थकांनी यंदा आपल्या मनाची तयारी आधीच करून ठेवा. आपल्या पक्षाचा पराभव पचविता येत नसेल तर ईव्हीएमला दोष देता येणार नाही. कारण, ईव्हीएम मशिनवर मतदान केल्याची आता मतदारास पावतीच मिळणार आहे. तेव्हा ईव्हीएम मशिन बळीचा बकरा होणार नाही हे निश्चित. तेव्हा आपला पराभव विशाल अंत:करणाने कसा पचवता येईल याचा विचार व्हावा. नाहीतर नवीन काहीतरी कारण शोधून ठेवा. ऐनवेळी फजिती नको व्हायला. ईव्हीएमची झाली तेवढी बदनामी पुरे झाली. एखाद्यावर आरोप करायचे म्हणून तरी किती? त्यात ईव्हीएम आपले मुकेबाबा. निर्जीव वस्तू ती. म्हणून काय त्याला काहीही बोलणार? खरं पाहता ईव्हीएमसारख्या एवढ्या सन्माननीय वस्तूंना मानवाधिकारसारखा एखादा कायदा करून संरक्षण दिले पाहिजे. नाहीच काही तर निदान अब्रूनुकसानीचा दावा तरी ठोकता आलाच पाहिजे. आपल्याकडे प्राणीमित्र, वृक्षमित्र, जलमित्र असे अनेक मित्र सापडतील. ईव्हीएमचेच तेवढे मित्र अजून काही दिसले नाही. शेवटी निवडणूक आयोगानेच मैत्रीचा हात पुढे केला. म्हणून की काय बिचार्‍या ईव्हीएमची हतबलता पाहून आयोगालाच कीव आली असावी. म्हणूनच व्हीव्हीपॅटची नवीन सोय झाली. आता तर पावतीच मिळणार मतदान केल्याची. त्यामुळे ईव्हीएमच्या आडून आपली हार पचविणारे आता ताण तणावाने ग्रस्त असतील. पण बहाद्दर काही ना काही पुन्हा बहाणा शोधतीलच.
 
ईव्हीएमला आरोपमुक्त केल्याबद्दल आयोगाचेही आभारच मानले पाहिजे. आपली निष्पक्ष व कर्तव्यदक्षतेची ओळख आयोगाने कायम ठेवली आहे. आयोगासारखा सारासार विचार खरंच कुणी करुच शकत नाही. उमेदवारांची खर्चमर्यादा २ लाखावरून ५ लाख केली, हे त्याचेच उदाहरण तरीही लोक आयोगाला दूषणं देणं काही सोडत नाही. मोदी सरकारच्या हातचं बाहुलं म्हणून आरोप करतात. पण वास्तविकता सगळ्यांना ठावूक आहे. बंद हॉलमध्ये ईव्हीएमचे आपापसात हितगूज चालते. पुन्हा पुन्हा ईव्हीएमला आरोपीच्या पिंजर्‍यात कुणी उभं करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा रोष पावत्यांमधून सिद्ध होईल. तेव्हा सावधान!
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@