...कारण अभ्यास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |

 

आपली सध्याची शिक्षण पद्धती ‘अभ्यास’ या शब्दाचा किती संकुचित अर्थ मुलांसमोर मांडते! ‘शालेय विषयांच्या पाठांचा सराव म्हणजे अभ्यास’ ही किती त्रोटक व्याख्या केली आहे आपण अभ्यासाची? माझ्या शिक्षणाचा व अनुभवांचा विचार करून, वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग आठवून ते या लेखमालेतून मांडणे हा अभ्यासच नाही का?

 

पहिलीला नवीन शाळेत जाऊ गेल्यावर पहिल्याच दिवशी आमच्या मुलीच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न होता. हा प्रश्न तिच्या मनात होता, हे त्याचे उत्तर तिच्याकडून आल्यावरचं खरेतर कळले. पहिल्या दिवशी शाळा सुटल्यावर लेकीची प्रतिक्रिया होती, “आवडली बरं का नवी शाळा मला. आज मस्त खेळ, गाणी आणि गोष्टी झाल्या. अभ्यास वगैरे काही नाही. खूप मजा आली. वाटलं होतं पहिल्याच दिवशी अभ्यास करायला लावतायत की काय?” लेकीला शाळा आवडल्याचे समाधान होतेच पण मी विचारात पडले. विशेषत: ‘अभ्यास’ या शब्दाशी अडखळले. आपली सध्याची शिक्षण पद्धती ‘अभ्यास’ या शब्दाचा किती संकुचित अर्थ मुलांसमोर मांडते! ‘शालेय विषयांच्या पाठांचा सराव म्हणजे अभ्यास’ ही किती त्रोटक व्याख्या केली आहे आपण अभ्यासाची? माझ्या शिक्षणाचा व अनुभवांचा विचार करून, वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग आठवून ते या लेखमालेतून मांडणे हा अभ्यासच नाही का? पावसाळ्यात रस्त्यातल्या डबक्याजवळ बसलेल्या बेडकांकडे पाहत राहणारे मूल अभ्यास करत नसते का? स्वयंपाकघरात आईभोवती घोटाळत, तिच्या सराईत हालचाली बघत, तिने आता फोडणीत लसूण घातली हे वासावरुन ओळखणारा मुलगा अभ्यास करत नसतो का? इतकेच काय, हातात दिलेली कुठलीही वस्तू लगेच तोंडात घालून बघणारे तान्हुलेही अभ्यासच तर करत असते! मग इतका सर्वव्यापी असलेला हा अभ्यास, आपण शालेय शिक्षणाच्या विषयांपुरता पुस्तकांत बंद का करून ठेवला? अभ्यास म्हणजे आकलन, सराव आणि व्यक्त होणे. ही त्रिसूत्री म्हणजे जर अभ्यास आहे, तर ती जगातल्या कुठल्याही गोष्टीला लागू पडते.

 

काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अभ्यास-कौशल्य मार्गदर्शन सत्र घेण्याआधी मी त्यांना विचारले, अभ्यास कसा करायचा! याचा विचार आपण नंतर करू पण आधी मला सांगा, अभ्यास का करायचा? या प्रश्नाची प्रामुख्याने समोर अलेली उत्तरे- ‘परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी,’ ‘लक्षात राहण्यासाठी’, ‘विद्यार्थ्यांनी केलाच पाहिजे’, ‘शिस्त लागण्यासाठी’ अशी होती. यातून देखील अभ्यास व पाठ्यपुस्तके यांचा परस्परसंबंधच अधोरेखित होत होता. उच्चपदवी अभ्यासक्रमातसुद्धा शिक्षकांनी टिपणे डिक्टेट करावीत व आम्ही उतरवावीत अशा सवयी घेऊन मी जेव्हा भारतातून ऑक्सफर्डला ‘विकासाचे मानसशास्त्र’ शिकायला गेले, तेव्हा सुरुवातीला फारच त्रास झाला. अभ्यासक्रम सुरु होण्याआधी विद्यापीठातील चार-पाच अतिप्रचंड वाचनालये व सुसज्ज संगणक कक्ष आम्हाला दाखवण्यात आले. दिवसाकाठी केवळ तीन तास लेक्चर्स होत. शिक्षकांकडून सर्वांना समान मिळालेली मदत इतकीच. बाकीची मदत, विद्यार्थी स्वत: पुढाकार घेऊन अभ्यास किती करतात यावर अवलंबून होती. ज्ञानाची भांडारे समोर चोवीस तास खुली असताना ती मुळात वापरावीत कशी? हे मला शिकावे लागले होते. स्वयं-अध्ययनाची कौशल्ये प्रयत्नपूर्वक आत्मसात करत मुख्य अभ्यासक्रम शिकणे हा वर्षभराचा फारच रोमांचक प्रवास होता. स्वयं-अध्ययनाची कौशल्ये शालेय शिक्षणात सुरुवातीपासूनच अंगिकारता आली, तर त्याचे कितीतरी फायदे मुलांना मिळू शकतील. ‘मॅम, फिजिक्स मेरे बस की बात नही!’ ‘मी खूप वाचतो पण लक्षातच रहात नाही;’ ‘परीक्षेच्या आधी सगळं तोंडपाठ, पण उत्तरपत्रिकेत लिहिता येत नाही,’ ‘आय फील लाईक स्लीपिंग इन द क्लास’ अशा अनेक सर्वसाधारण समस्यांची उत्तरे स्वयं-अध्ययन कौशल्यांच्या प्रशिक्षणात सापडू शकतात. ‘अभ्यास’ ही केवळ शाळेतून आल्यावर तास-दोन तास बसून कसेबसे उरकण्याची कंटाळवाणी क्रिया न राहता, चोवीस तास घडणारी आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारी आनंददायी प्रक्रिया होऊ शकते.

 

अभ्यास पाठ्यपुस्तकांध्ये बंदिस्त नसून, आयुष्याचा भाग आहे. मुले निसर्गत:च अनेक गोष्टी शिकतात, शिकण्याचे वेगवेगळे मार्ग शोधतात. पालकांनी व शाळांनी त्यांना विविधांगी अनुभव घेण्याच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अभ्यासाची संकल्पना तुकाराम महाराजांनी सर्वसामावेशकतेने मांडली आहे.

 

असाध्य ते साध्य

ख करता सायास

ख कारण अभ्यास

ख तुका म्हणे खख

 

अभ्यासाने कुठलीही असाध्य गोष्ट साधता येत असेल, तर तो फक्त परीक्षेतल्या टक्केवारीपुरता मर्यादित मानणे म्हणजे संकुचित मनोवृत्तीचे ठरेल, नाही का?

- गुंजन कुलकर्णी

बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ

नाशिक

@@AUTHORINFO_V1@@