पाऊस पडे.. कमल फुले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 

जळगावात वाहणारे निवडणुकीचे वारे ऐन जोशपूर्ण रंगात येत होते. वार्‍यावर वेगवेगळी पक्ष आपापली चिन्हे घेऊन जनसामान्यांपर्यंत प्रचारास्तव पोहोचत होती. शिट्या, बॅट बॉल, घड्याळ व फुग्यांचे स्टॉल टॉवर चौकात लागले होते. जुनी पुरानी गंज लागलेली सायकल, इस्त्री, जुने टीव्ही, फ्रीज यांची मांदियाळी भंगार बाजारात लागली होती. पण तिकडे जळगाववासीयांनी सरळ दुर्लक्षच केले होते. पण विक्रेत्यांनी हार मानली नव्हती. त्यांचा ओरडून ओरडून प्रचार चालूच होता. अशा या प्रचारमय वातावरणात ढगात अचानक वीज कडाडू लागल्या, गडगडाट झाला आणि कुठून तरी भयानक आवाज ऐकू येऊ लागला. सारे भयभीत झाले. पण त्या आवाजातून आकाशवाणी होतेय असं समजल्यावर जळगाववासीयांनी कान टवकारले. आश्चर्यचकित मुद्रेने सारे जण ऐकू लागले. आणि ‘पुढची तीन दिवस जळगाव शहरात पावसाची संततधार असणार अशी आकाशवाणी झाली. आणि तो आवाजही बंद झाला. सर्वत्र शांतता पसरली. तेवढ्यात पावसाची रिपरिप चालू झाली. शांततेचं रूपांतर क्षणार्धात धावपळीत झालं.
 
उमेदवार मंडळी गरमागरम भजीवर ताव मारत विचार करु लागली की, अशीच मतांची बरसात झाली पाहिजे आपल्याला. साध्या विचारानेही ते हुरळून जात होते. सगळ्यांनी पावसात भिजू नये, म्हणून आडोसा घेतलेला असताना कमळ मात्र भर पावसात ग्रीष्माचा मनमुराद आनंद लुटत होते. त्याच्या कोमल गुलाबी पाकळ्यांवर पावसाचे थेंब क्षणभर विराजीत होत व लगेच घरंगळत निघून जात. खाली हिरव्यागार पसरलेल्या पानावर बेडूकराव ऐटित बसून डराव डराव करत व मधूनच घड्याळास, वाघोबास वाकुल्या दाखवी. वाघोबाची पावसामुळे झालेली दैना पाहून बेडूकराव उड्या मारत हश्या पिकवित होते. वाघोबाची नाचक्की पाहून घड्याळासही शरम वाटली. बेडूक आपलीही टर्रर्र उडवणार म्हणून घड्याळाने लगेच आपले तोंड दुसरीकडे फिरवून घेतले. पण आगाऊपणा व खट्याळपणा अंगी भीनलेल्या बेडकाने घड्याळाचीही चांगलीच खेचली. घड्याळाची टर्रर्र उडताना पाहून वाघोबा स्वत:चा अपमान विसरून ख्या ख्या करीत हसू लागले.
 
एवढ्यात पावसाने अजून तेजी पकडली होती. पाणीपातळी वाढू लागली. आता वाघोबाची पंचाईत होऊ लागली. प्रचार सोडून देऊन पावसाला घाबरुन वाघोबाने अखेर आपल्या खान्देश मॉलच्या गुहेत पळ काढला. वाघोबाला पळताना पाहून घड्याळाचे बाराच वाजले. भरपावसात टराटर घाम फुटला त्याला. आपला प्रचार बंद झाला पण कमळ काही पावसाला जुमानत नाही, हे पाहून वाघाला चेव आला. वाघोबा आपल्या विचारतंद्रीत गुहेत इकडून तिकडे फेर्‍या मारू लागला. त्याला एक युक्ती सुचली. आपल्या फोनवर नंबर फिरवीत त्याने सरळ पत्रकारांना बोलावून घेतले आणि कमळावर चिखलफेक करण्यास सुरुवात केली. ‘कमळ विश्वासघातकी आहे’ असा आरोप करु लागले. घड्याळानेही वाघाची नक्कल केली व त्यानेही पत्रकारांना बोलावून पत्रकार परिषदेत कमळावर चिखलफेक केली. पण झाले उलटेच. वरुन पडणारा पाऊस आणि चिखलफेकीमुळे कमलपुष्प अधिक बहरास येऊ लागले. बघता बघता त्यांची संख्या वाढली. एव्हाना कळ्यांचीही फुले झाली होती.
 
पाऊस ओसरला. फुगेवाले, बॅटवाले, इस्त्रीवाले, कपबशीवाले, घड्याळवाले आणि वाघोबा बाहेर पडले. पाहता तो काय? सर्वदूर कमळाचीच फुले. सारे अवाक्च झाले. मागून पाण्यातून कुणीतरी पळत जाण्याचा आवाज आला. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. वाघोबा सर्वशक्तीनिशी कमलपुष्प हाती घेऊन धावत सुटले होते. उंट टॉवरवरील घड्याळ्याच्या मनात ‘हा वाघोबा गिरीकडे तर जात नाही ना?’ असा विचार येऊन गेला.
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@