जंगल नसताना हत्तीचा संचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 

 
 
शहरात हिरवेगार जंगल नाही. हत्तीला फिरण्यासाठी मोकळे रान नाही. मात्र तरीही हत्ती शहरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करतोय. कारण हत्तीला याची कल्पनाही कदाचित नसेल की, या जंगलात त्याला फेरफटका मारणे अवघड आहे. मात्र, आशेने हत्तीची सवारी शहरातून हळूहळू सुरू आहे. त्याला घड्याळही साथ देत आहे. घड्याळाच्या तालावर हत्तीही धावत असल्याचे जाणवत आहे. मात्र, सगळ्या धावपळीत हत्ती अस्तित्वासाठी लढा देत आहे, हे मात्र निश्‍चित. कारण या जंगलात हत्तीला तग धरण्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे. या सगळ्या गडबड गोंधळात हत्ती शहरात जागा शोधण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, प्रस्थापित कमळ आणि धनुष्याच्या ताणाताणीत त्याला जागा मिळेल तरी कोठे? हाही प्रश्‍नच आहे.
 
आधीच शहरात सायकल लावतो म्हटले तरी जागा नाही. सायकलही या नगरीत चालून चालून थकली आहे. परिणामी, शहरात सायकल गल्लीबोळातच फिरू लागली आहे. पावसामुळे शहरातील मैदानामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने चेंडू घेऊन कुठल्या मैदानावर खेळायचे? हा प्रश्‍नही समोर आहे. त्यामुळे या पटांगणावर डाव मांडणार तरी कोण ? शहरात सर्वत्र पाऊस झाल्याने उमेदवारांबरोबरच कार्यकर्ते पावसात चिंब न्हाऊन निघाले आहेत. या निवडणूक मैदानात चिंब झालेल्यांना चहाचा चटका देण्यासाठी अधूनमधून कपबशीही फेरफटका मारते. त्यात अधेमधे पंखाही हवा देत असून त्यामुळे मतदारांना गारवा लाभत आहे. शहरातील मुख्य चौकात वाहतूक नसताना शिटी वाजल्याचा आवाज ऐकू येतोय. पण मागे वळून पाहिले तर तो केवळ आभास असल्याचे जाणवते. निवडणुकीच्या या रणधुमाळीत हवा नसतानाही पतंग हवेत उडतांना दिसतो, पण प्रत्यक्षात त्याला फुग्याची साथ असल्याचे दिसते.
 
निवडणुकीबरोबरच लग्नाचाही धुमधडाका सुरू आहे. त्यात आता नगारा वाजविण्याची पध्दती काळाच्या ओघात बंद पडली असल्याने आधुनिक काळातील तंत्रज्ञानाच्या युगात टीव्ही व एलईडीच्या आक्रमणात ते दुर्लक्षित झाले. आज टीव्हीवरही एलईडीने मात केली आहे. या सगळ्या धावपळीत कमळ सुगंधाने मतदारांना मोहिनी घालण्याच्या प्रयत्नात आहे. कमळाचा सुगंध शहरभर दरवळावा, यासाठी जीवाचे रान करीत आहे. चिखलात उमलून कमळ जणू विकासाचा मंत्र शहराला देऊ पाहत आहे. मात्र, ते रोखण्यासाठी पंजा धडपडत असून धनुष्यही अधूनमधून तिरपा निशाणा मारून कमळाला छेडण्याचा प्रयत्न करीत आहे. या रणसंग्रामात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर नारळ वाढवून प्रचार सुरू केला आहे. त्याचा प्रसादही ३ ऑगस्टला मिळणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची आतुरता शिगेला पोहोचली आहे. मात्र, यात मतदार कुणावर प्रसन्न होतो आणि कुणाच्या हातावर विजयाचा प्रसाद मिळतो, यांची उत्कंठा निवडणुकीच्या मैदानातील सगळ्यांनाच आहे. या जंगलात फिरणार्‍या या सर्वांपुढे समस्या आहेत. त्यामुळे कमळ आणि धनुष्यबाण एकमेकांकडे पाहून मिश्किलपणे हसताहेत तर घड्याळ उगाच जोरजोरात सारखं टिकटिक करीत आपणही यात आहोत, याची जाणीव करून देत पंजाची साथ मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
 
- रामदास माळी
 
@@AUTHORINFO_V1@@