घड्याळाची दुर्दशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 
 
टॉवरवरचे घड्याळ प्रचंड वैतागलेले दिसत होते. सारखा सारखा होणारा बिघाड आणि नको तेव्हा वळसे घेत सुटलेले त्याचे चालक, कधी किल्ली भरतात तर कधी विसरतात, कधी इलेक्ट्रॉनिक करण्याचा विचार करतात तर कधी प्रवासच रद्द करतात. म्हणून घड्याळाला सारखा आपला अपमान झाल्यागत भासे. त्यातच बळीराम पेठेतून वसंतस्मृतीवर फुललेले कमळ त्याला रोजच वाकुल्या दाखवी. कधीकाळी ऐटीत फिरणार दीड शाणं घड्याळ बंद पडलेलं पाहून कमळाला भारी आनंद होई. म्हणूनच कमळ आपले हिरव्यागार पानाच्या हाताने घड्याळाला सारखे खोडसाळपणे हातवारे करुन चिडवत. घड्याळाला याचा चांगलाच उबग आला होता. संतापाने ते लालबूंद होई. त्यातच निवडणुकांचा संचार झाला. घड्याळास राग अनावर झाला.
 
एवढ्या उंच टॉवरवर जाऊन बसलेले घड्याळ अख्ख्या शहरावर आपली भीरभीरती नजर फिरवी. कोणता नेता कुठे जातो, कोणाला भेटतो, काय करतो सारी इत्थंभूत बातमी त्याला बसल्या जागी मिळे. पण यंदा निवडणूक आली तरी त्याला स्वस्थ बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण त्याला किल्ली देणारा पार दूरवर आकाशवाणी चौकात राही. अन् घड्याळाला किल्ली द्यायला त्याला फार आळस येई. म्हणूनच स्वत:ची अवहेलना पाहून घड्याळ फारच चिडले होते. त्यातच मोदी लाटेतील शांत शीतल निर्मळ पाण्यात टवटवीत फुललेले कमळ मनपाच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले. गिरी पर्वतावरील शीतल वारे त्याच्या पाकळ्यांमध्ये प्राण ओतत होते. संपूर्ण जळगाव तलावातील कमळाच्या सौंदर्याने प्रभावित झालेले व ऐन ग्रीष्मात निवडणुकमय वर्षाऋतूचा आनंद उपभोगण्यासाठी वर आलेले बेडूक कमळाच्या मऊ पानांवर विराजित होऊन सारखे डराव-डराव करत होते. बेडकांच्या डराव डरावमुळे तर वाघाच्या डरकाळ्याही ऐकू येईनाशा झाल्या होत्या. आणि इकडे सारखे बंद पडण्यामुळे जळगाववासीयांची घड्याळावरुन विश्वासार्हताच नाहीशी झाली होती. त्यामुळे लोक वेळसुद्धा स्मार्टफोनवर पाहू लागले. संतापलेले घड्याळ स्वत:चं अवलोकन करण्यापेक्षा व आपल्याच अविचारी चालकांचे कान ओढण्यापेक्षा कमळाचा द्वेष करू लागले. कमळाची वाढती नावलौकिकता घड्याळाला बोचू लागली.
 
अखेर घड्याळास कमळावर निशाणा लावण्याचा बहाणा मिळालाच. घड्याळाने आपली मान उंच करुन जळगाव नगरीवरुन नजर फिरवली. तेवढ्यात त्याचे लक्ष उमवीच्या नामांतर सोहळ्याकडे जाताच कमळ आचारसंहिता भंग करत असल्याच्या संशयावरून रागासंतापात आपला एक बाणरुपी मिनिटकाटा कमळाच्या दिशेनं सोडला. पण कमळाचा रक्षक असलेल्या देवेंद्रने त्यास यशस्वीपणे अडविले. घड्याळाची तळपायाची आग मस्तकात गेली. तितक्यात त्याच्या तिक्ष्ण नेत्रांना स्वातंत्र्य चौकाजवळील एका सरकारी बंगल्यावर आचारसंहितेच्या काळात कमळप्रेमींची खलबतं चालू असल्याचा आभास झाला. पुन्हा आपला एक काटा उपटून त्याला स्वातंत्र्य चौकाच्या दिशेने सपकन सोडला. पण दक्ष असलेल्या उज्ज्वलताईंनी आपल्या बुद्धीचातुर्याने त्या बाणाची भूकटी करुन टाकली. करो या मरो स्थितीत असलेल्या घड्याळाजवळ केवळ सेकंद काटा शिल्लक होता. पण खान्देश मॉलजवळ आचारसंहिता असताना कमळाचे काही डाव शिवत असल्याची चाहूल लागताच मोठ्या आशेने घड्याळाने आपला उरला सुरला सेकंद काटाही त्या दिशेने सनान सोडला. पण तिथेही त्याला निराशाच हाती आली. शिवाय स्वत:चे काटेही गमावावे लागले. आता कसे वाजतिल १० वाजून १० मिनिटं? घड्याळ दु:खी झाले. तिकडून मुंबईहून जळगावकडे निघालेले निरीक्षक साहेबांचे लक्ष जळगांवच्या टॉवरकडे जाताच त्यांचा राग अनावर झाला. घड्याळाची झालेली दुर्दशा पाहून त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला असावा. त्यांनी अखेर आपला प्रवासच रद्द केला. एकंदरीत घड्याळावर वाईटच वेळ आली म्हणायची.
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@