दुनिया झुकती है...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
फेरीवाले म्हटले म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभे राहते मार्केटमधील लोटगाडीवर दुकान मांडणारे किंवा रस्त्यारस्त्याने कटलरी सामान व भाजीपाला विकणारे विक्रेते. त्यातल्या त्यात जळगावच्या फुले मार्केटचे फेरीवाले जास्तच प्रसिद्ध. कारण गेल्या दोन वर्षापासून ते चर्चेतच आहेत. अख्ख्या जळगाव जिल्ह्यातील लोकांना फुले मार्केटमधील फेरीवाल्यांची दैना कळून चुकली आहे. महापालिकेचे आणि फेरीवाल्यांचे संबंध जे कडवट झाले आहे ते काही गोड व्हायला तयार नाहीत. तसे फेरीवाले बिचारे गरीब लोकं. हातावरची कमाई त्यांची. पण, जळगाव महापालिका म्हणजे अतिशय शिस्तप्रिय व जनतेच्या अडचणींची त्वरित दखल घेणारी. म्हणून फेरीवाल्यांना नाहक त्रास सोसावा लागला. पण, फेरीवालेही जळगावची जनताच आहे, हे बहुतेक कुणाच्या लक्षात आलं नसावं. असो.
 
पण फेरीवाल्यांची पीडा आता जाणार बहुतेक. कारण फेरीवाल्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत त्या निवडणुका. म्हटलं तर निवडणुका...म्हटलं तर लोकशाही. कारण निवडणुका ही तर अंतर्भूत शक्तीच ना लोकशाहीची. आता तीच ताकद जळगावचे फेरीवाले आजमावणार म्हणे. गेल्या तीन वर्षापासून फेरीवाल्यांमागे लागलेल्या डोकेदुखीवर त्यांना आता रामबाण उपाय सापडलाय. कारण फेरीवाले जो त्यांच्या समस्या दूर करेन त्यांनाच मतदान करणार आहे. अन्यथा मतदानावर चक्क बहिष्काराचं शस्त्र फेरीवाल्यांकडून उगारलं गेलंय.
 
कालपर्यंत फेरीवाल्यांशी कुणाला घेणंदेणं नव्हतं. ती पडली गरीब माणसं. त्यांच्याभोवती गोळा होणारे ग्राहकही गरीब मध्यमवर्गीय माणसं. पण आता चमत्कार होणार. फेरीवाल्यांभोवती आता झगमगीत शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या ग्राहकांचा गलका दिसू लागेल. जो तो ज्याच्या त्याच्या पध्दतीने फेरीवाल्यांना लोणी लावू पाहील. विशेष म्हणजे आता व्यवहारही वेगळाच होणार. फेरीवाल्यांकडून कालपर्यंत कुणी कटलरीचं सामान, कुणी कपडे तर कुणी भाजीपाला घेत असेल. पण, आता मात्र ‘मत’ विकत घ्यायला मागे पुढे पाहिले जाणार नाही. कधी नव्हे त्या फुले मार्केटमध्ये आता राजकीय लोकांची होर्डींग्ज, बॅनर्स दिसू लागतील. नेत्या पुढार्‍यांची चमचेगिरी करणारी मंडळी फुले मार्केटच्या पायर्‍या झिजवतील. एवढेच काय तर भाऊ, दादाही कधी नव्हेत ते फुले मार्केटचे दर्शन घेतील. कारण मार्केटमध्ये त्यांचा देवच आहे ना. मतदार देव. फेरीवाला.
 
जवळजवळ साडेसहा हजार इतक्या संख्येने असलेल्या फेरीवाल्यांच्या कुटुंबातील सदस्यांसहित तीस हजाराच्या आसपास मतदारांचा आकडा जातो. एकंदरीत काय तर मताचा खजिनाच आहे तो. तेव्हा कोणत्याही पक्षाचा उमेदवार त्याकडे कानाडोळा करणार नाही. म्हणूनच कालपर्यंत आपल्या रुबाबात राहणारी मंडळी फेरीवाल्यांसमोर विनम्रपणे झुकतील. ‘दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये’ असंच काहीसं वर्णन याचं करता येईल.
 
जळगावकरांनी मनपाची गाडी आल्यावर धावपळ करणारे फेरीवाले पाहिले असतील, मनपाच्या गाडीत जप्त केलेला भाजीपाला पाहिला असेल, गरीब भाजीपाला विक्रेत्याच्या डोळ्यातील आसवं आणि शेतकरी माय बहिणीचा भाजीपाला विक्रेते व फळं मनपाच्या गाडीत कोंबताना होणार्‍या यातना पाहिल्या असतील. तेव्हा त्यांच्या मदतीला काही अपवाद सोडता कुणीही नेता धावून आला नाही. खुद्द मनपाही त्यांना समाधानकारक पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात अयशस्वी ठरली. फेरीवाले व्याकुळ होऊन मनपाजवळ, मनपा सदस्यांजवळ आणि नेतेमंडळीजवळ हात जोडून गयावया करत होती. पण त्यांच्या ना मागण्या मान्य झाल्या ना समस्या सोडवल्या गेल्या. झाला तो उपहासच.
 
पण लोकशाहीत कुणीच कुणाचा मालक नसतो, ना कुणीही कायमस्वरुपी लाचार. वेळ अखेर पालटलीच. आता तेच मनपा सदस्य, नेते मंडळी, पक्षीय उमेदवार फेरीवाल्यांना खूष करण्यासाठी धडपडतील. त्यांच्या घराचे उंबरठे झिजवतील. साहजिकच, ते त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातील. कारण मतदार देव असतो ना. मग उमेदवार मतदाराच्या पाया पडायला जाणार नाही असे होणार नाही. ‘नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा’ अशी म्हण आहेच. पण वेळ आली की तीही उलट होते कधी कधी. आशीर्वाद फुकाचा अन् नमस्कार लाखाचा होऊन बसतो. ही सर्व करामत आहे या लोकशाहीची.
 
 
-कल्पेश गजानन जोशी
@@AUTHORINFO_V1@@