यक्ष... मेघ अन् जळगाव नगरी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 


 
मलयगिरी पर्वतावरुन यक्षाचा त्याच्या प्रियेसाठी निरोप घेऊन मोठ्या उत्साहाने निघालेला तो मेघ काही फवलं पुढे जातो न् जातो तोच त्याला यक्षाचा आवाज ऐकू आला...
 
‘अरे मेघा जरा थांब’
 
मेघ थबकला आणि यक्षाकडे प्रश्‍नार्थक मुद्रेने पाहू लागला. ‘‘यक्ष म्हणाला तुला तुझा मार्ग मी आधीच सांगितला आहे. पण जाताना थोडा नाशिकमार्गे जा.तेथे पंचवटीला प्रभू श्रीरामचंद्रांचे वास्तव्य होते. त्या पुण्यभूमिला स्पर्शून जा. उत्तर महाराष्ट्र नामे त्या भूभागातील नाशिक परिसराचे ‘पालकत्त्व’ गिरीश नामक महाजन कुलोत्पन्न व्यक्तीकडे आहे... गिरीश म्हणजे पर्वतांचा ईश... म्हणजेच हिमालय.... हे गिरीशही हिमालयासमान आपले कर्तव्य आणि निर्णयावर अडिग असतात. ठाम असतात.... तसे कान्हदेश-खान्देशचे. खान्देश म्हणजे ऋषी आणि कृषी संस्कृतीचा विलक्षण संयोग झालेला प्रदेश. कला, काव्य अन् कनक यांच्या शुद्धतेच्या निकषांवर उतरलेला प्रदेश....
 
यक्षाला मध्येच थांबवत मेघ म्हणाला, ‘‘ पण मी तेथे का जावे? मला तर आपल्या प्रियेला निरोप द्यायचा आहे ना? ’’ ‘यक्ष म्हणाला ‘होय हे तर आहेच!’ मग मध्येच हा मार्गबद्दल का? कशासाठी? मेघाचा प्रश्‍न ‘अरे, पुढे जाताना तुला कंटाळा येऊ नये, उत्साह कायम रहावा अन् नवलाईच्या गोष्टी तुला पाहता याव्यात, यासाठीच हे सारे प्रयोजन.’ यक्ष म्हणाला...
 
‘‘अच्छा...पण तरीही मला स्पष्टपणे सांगितल्यास बरे होईल. म्हणजे, जर काही खरोखरच नवलाईचे दिसणार असेल तरच तिकडे जाण्यात हंशील, अन्यथा तो कालापव्यय ठरेल ’’ मे म्हणाला.
 
यक्ष म्हणाला ‘दिसेल, नक्की दिसेल. खान्देश नामक भूभागावरुन जाताना तुला ‘जळगाव’ नामक नगरी दिसेल. तेथे सद्य:स्थितीत नगर प्रशासनाचा धुरिण होण्यासाठी अनेकजण आपापले बलाबल अजमावताहेत. एव्हाना, तेथे वरुणराजाची कृपा झाली असावी, अन्यथा तेथील उष्ण वायुचे झोत तुला कष्ट देतील. नाव ‘जळ’गाव असले तरी प्रदीर्घकाळ येथील प्रजाजनांनी जलाचा अभावही सोसला आहे.
 
नगर प्रवेश करतांना तुला ‘कोल्हे हिल्स’ आणि ‘सतरा मजली’ वास्तु दिसतील. कोल्हे कुलोत्पन्न ललित हे या नगरीचे मावळते नगर प्रमुख. नगरजनांच्या अपेक्षाभंगाने विध्द झालेल्या आपल्या ‘मना’ला ‘धनुष्यबाण’ टोचू नये म्हणून त्यांनी थेट झेप घेतली ती ‘कमळ’ दलांवर... पुनश्‍च नगरप्रमुखाची माला आपल्याच गळ्यात पडावी एवढाच त्यांचा उद्देश.... सतरा मजली हे या नगरीचं प्रशासनालय.... एकेकाळी केवढं कौतुक होतं त्याचं, पण दैवगती फिरली अन् ऋणमुक्तीसाठी त्यालाही पणाला लावलं गेलं. त्यालाही प्रतीक्षा आहे ती मोकळा श्वास कधी घ्यायला मिळतो याचीच!
 
याच नगरात विद्युतभारित स्वयंचलित आवागमन स्थानकानजीक - ज्याला रेल्वेस्टेशन अशी जन संज्ञा देतात, तेथे निकटच शिवाजीनगर नामे परिसरात सुरेशदादा जैन या पूर्व नगरप्रमुखांचा निवास आहे. तेथे थोडा डोकावून बघ. कधीकाळी गर्दीने फुलणार्‍या या स्थानी आता तुला अत्यल्प डोकी दिसतील. हेतू साध्य झाला की, मानव कसा वागतो याचे दर्शन तुला तेथे घडेल. ‘वसंतस्मृती’त मात्र प्रचंड गजबज असेल. नगरप्रशासनाची सूत्रे हाती घेण्यासाठी तेथे खलबतं सुरु असतील. कॉंग्रेस जणांचे चिंतातूर चेहरे तुला दिसतील. तेव्हा त्यांचे जरा दुरुनच निरीक्षण कर. तेथे शुकशुकाटच असेल. तेथे अधिक काळ न घालवता तू पुढे प्रयाण कर. मार्गात मुक्तीचा पथ दाखविणारे मुक्ताईनगर आहे. तेथे सर्वांना समवेत घेणारे ‘एकनाथ’ भेटतील. ते संकटातून मुक्तीचा मार्ग दाखवतील. त्यांचे मार्गदर्शन घे अन् मार्गस्थ हो...
 
क्षणभर यक्षाने डोळे मिटले अन् उघडले तेव्हा तो मेघ त्याच्यापासून बराच दूर गेल्याचे त्याला दिसले...
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@