शिक्षण समितीच्या मंजुरीविना १७ शाळांचे विलीनीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |



मुंबई : मुंबई महापालिका एकीकडे इयत्ता ५ वी चे ७ नवीन वर्ग आणि इयत्ता ८ वी चे १०३ नवीन वर्ग सुरू करण्याची लगीनघाई करीत आहे. तर दुसरीकडे पालिका शिक्षण विभाग शिक्षण समितीला अंधारात ठेवून समितीच्या मंजुरीविना शहर व पूर्व उपनगरे या भागातील पालिकेच्या १७ शाळांचे विलीनीकरण परस्पर करून मोकळे झाले आहे. यामध्ये, सर्वाधिक ११ मराठी शाळांचा, २ हिंदी, २ गुजराती, १ उर्दू व १ कन्नड या शाळांचा समावेश आहे. या शाळांच्या कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर आणखीन २२ शाळांचे विलीनीकरण करण्याचे प्रस्ताव शिक्षण विभागाने मंजुरीसाठी सादर केले आहेत.यामध्येही, सर्वाधिक ११ शाळा मराठी माध्यमांच्या, तेलगू-४, इंग्रजी-२, उर्दू-२, गुजराती-२, हिंदी १ या शाळांचा समावेश आहे.

 

याप्रमाणे मुंबईतील ३९ शाळा विलीनीकरणात गेल्यात जमा झाल्या आहेत. या ३९ शाळांच्या विलीनीकरणात २२ मराठी शाळा असल्याने आता याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी देताना शिक्षण समितीमधील सत्ताधारी, विरोधक यांच्याकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या ३९ शाळांच्या विलीनीकरणात २ इंग्रजी शाळा वगळता अन्य बहुतांश शाळा या पालकांचा इंग्रजी शाळांकडे अधिक ओढा असणे व शाळेतील पटसंख्या घटने आदी कारणे शिक्षण विभागाने प्रस्तावात दिली आहेत.

 

या ३९ शाळांमध्ये, कुर्ला, भांडुप, मुलुंड येथील प्रत्येकी ३,मानखुर्द ,चेंबूर,प्रभादेवी येथील प्रत्येकी-२ ,घाटकोपर, विक्रोळी, ग्रँट रोड, ताडदेव, भायखळा, वरळी, माझगाव येथील प्रत्येकी १ अशा एकूण २२ मराठी शाळा कुर्ला येथील १ व प्रभादेवी येथील २ अशा ३ हिंदी शाळांचा, कुर्ला,चेंबूर व वरळी येथील प्रत्येकी १ याप्रमाणे ३ उर्दू शाळांचा, कुर्ला, परळ,वरळी व कुलाबा येथील प्रत्येकी १ याप्रमाणे ४ गुजराती शाळांचा, घाटकोपर, मुलुंड,दादर व कामाठीपुरा येथील प्रत्येकी १ याप्रमाणे ४ तेलगू शाळांचा, भांडुप व नाना चौक येथील प्रत्येकी १ याप्रमाणे २ इंग्रजी शाळांचा, वरळी येथील एका कन्नड शाळेचा समावेश आहे.

@@AUTHORINFO_V1@@