आरक्षण हे आर्थिक निकषांवरच मिळायला हवं - राज ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |
 

 
 
 
पुणे : महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींनी हे आरक्षणाचं राजकारण समजून घ्यायला हवं, मी पुन्हा सांगतो की आरक्षण हे आर्थिक निकषांवरच मिळायला हवं. असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे होत असलेल्या महाराष्ट्र सैनिक मेळाव्याअंतर्गत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 
आरक्षण हे शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांसाठी लागतात पण सगळ्या सरकारचं धोरणच जर खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्याचे असेल तर सरकारी शिक्षण संस्था आणि सरकारी रोजगार कमी होतोय, तेव्हा आरक्षण घेऊन करायचं काय?, केंद्रीय मंत्री गेहलोत हे लोकसभेत म्हणाले की, सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चाललंय आणि खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या वाढतायत. जर हे वास्तव केंद्रीय मंत्री मान्य करत आहेत तर मग आपला लढा नक्की कशासाठी आहे? तसेच महाराष्ट्र हे उद्योगधंद्यात कायमच अग्रेसर राहिला आहे, पण तरीही या उद्योगधंद्यांमध्ये मराठी मुलांना नोकऱ्या का मिळत नाहीत? असे सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले.
 
राज ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातले सध्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षात असताना गळ्यात फलक घेऊन फिरत होते की मराठी समाजाला आरक्षण मिळायला हवं, मग आता सत्तेत आल्यानंतर आरक्षण का देत नाहीत? अश टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केली. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असो किंवा सध्याचे सरकार कोणालाच मराठा आरक्षणासाठी काही करायचं नाही या पक्षांना फक्त राजकारण करायचं आहे. असे परखड मत त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
 
 
 
 
 
त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्रत्येक जातीचा मराठी माणूस एकदिलाने लढला, पण आज काय परिस्थिती आहे या राज्याची? आज आपण जातीपातींवरून एकमेकांशी भांडतोय. हाच तो महाराजांचा मराठी माणूस? वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET), तमिळनाडू मध्ये तामिळ भाषेतील प्रश्नपत्रिकेत चुका होत्या तर एक तामिळ खासदार कोर्टात गेला, आणि न्यायालयाने निकाल दिला की प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी ४ गुण अधिक दिले, महाराष्ट्रातले खासदार कितीवेळा महाराष्ट्रासाठी उभे राहिले? अहमदाबाद मध्ये जर शाळांमध्ये गुजराती भाषेची सक्ती केली जाते मग मी महाराष्ट्रात मराठीची सक्तीची मागणी केली तर काय चुकलं ? याबरोबरच लोकसभमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मारलेल्या मिठीचा मुद्दाही राज ठाकरे यांनी यावेळी मांडला ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीं जगभरात मिठ्या मारत फिरत होते, मग राहुल गांधींनी अजून एक मिठी मारली तर काय फरक पडतो... इतका गहजब करायचं काय कारण ? असे अनेक मुद्दे ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडले.
 
प्रत्येकाने आपला धर्म घरात पाळावा. तसंच कृपया सत्तेत असणारे असोत अथवा विरोधातले यांच्या राजकारणाला बळी पडू नका. पुन्हा माझ्या महाराष्ट्रात कुठल्याही काकासाहेब शिंदेंचा जीव जाऊ नये हीच इच्छा.. असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केले.
 
त्याबरोबर राज्यासाठी पक्षातील काही पदांवर नेमणुकाही करण्यात आल्याची माहिती नगरसेवक राजेंद्र वागसकर यांनी दिली. यामध्ये किशोर शिंदे आणि वसंत मोरे यांची सरचिटणीसपदी, राज्याचे सचिवपदी वसंत फडके, जिल्हा संघटकपदी सुधीर वझे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षापदी सुशिला नेटके, पुणे जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना पदावर प्रशांत गरोजा आणि आशिष साबळे, पुणे शहराध्यक्ष जनित कक्ष पदावर कैलास दांगट, रोजगार व स्वयंरोजगार विभाग पुणे शहराध्यक्षपदी अनिल राणे, महाराष्ट्र नवनिर्माण जनअधिकार सेना पुणे शहराध्यक्षपदी विशाल शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे शहराध्यक्षपदी ऋशिकेश सुतार, पर्यावरण विभाग पुणे शहराध्यक्षपदी संजय भोसले, तसेच , पुणे शहर सचिव संघटना समन्वयकपदी योगेश खैरे आणि संतोष पाटील यांची नेमणूक करण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@