चौथ्या औद्योगिक क्रांतीला ‘ब्रिक्स’ने गांभीर्याने घ्यावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |




जोहान्सबर्ग : चौथ्या औद्योगिक क्रांतीचा अर्थात ‘इंडस्ट्री ४.०’चा आपल्यासारख्या देशांवर दूरगामी परिणाम होणार आहे. जग या प्रक्रियेत अनेकार्थांनी मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे ‘ब्रिक्स’ देशांनी चौथ्या औद्योगिक क्रांतीचा अधिक गांभीर्याने विचार करायला हवा,” असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.

 

‘ब्रिक्स’ अर्थात ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या पाच देशांची परिषद यावेळी दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मायकल तेमेर, दक्षिण आफ्रिकेचे सायरील रामाफोसा आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी जागतिक स्तरावरील आर्थिक व औद्योगिक बदल डोळ्यांपुढे ठेऊन आपले भाषण केले. ते म्हणाले की, “आज अनेकार्थांनी मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर आहे. नवे औद्योगिक तंत्रज्ञान या नव्या जगाची निर्मिती करत आहे. ही एक संधीही आहे आणि आव्हानही. या नव्या प्रणाली आणि उत्पादनांनी जगापुढे आर्थिक प्रगतीची दारे उघडतील. मात्र, या विकासात मानवी मूल्येही महत्त्वाची आहेत. त्यामुळे चौथ्या औद्योगिक क्रांतीचा अर्थात, 'इंडस्ट्री ४.०' चा आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” असेही मोदी म्हणाले.

 

“आपल्यासारख्या अर्थव्यवस्थांवर याचा मोठा परिणाम होईल. वैश्विक सपाटीकरणाचा जे लाभ घेतील, ते प्रगती करतील. समाजाच्या तळातील अनेक वर्ग तंत्रज्ञानामुळे प्रगतीचा मोठा टप्पा गाठू शकतील. मात्र, यातून वाढती असमानता निर्माण होण्याचा धोका असून या गतिमान बदलांचा मानवी मूल्यांवर काय परिणाम होईल, हे सांगता येणे अवघड आहे,” असे त्यांनी सांगितले. “चौथ्या औद्योगिक क्रांतीत भांडवलापेक्षा प्रतिभा अधिक महत्त्वाची ठरणार असून त्यामुळे कुशल मनुष्यबळ हाच रोजगाराचा नवीन चेहरा असेल,” असेही मोदी यांनी स्पष्ट केले. “डिजिटलीकरण आणि ऑटोमेशनमुळे भौगोलिक अंतरे कमी होणार असून यातून जागतिक व्यापाराला नव्या दिशा मिळणार आहेत. त्यामुळे ब्रिक्सने 'इंडस्ट्री ४.०' वर लक्ष केंद्रित करावे.

 

येत्या काळात आपण स्वतःला कसे विकसित करू शकतो, याचा विचार व्हावा,” असे आग्रही प्रतिपादन भारतीय पंतप्रधानांनी यावेळी केले.

“रोजगारासाठी व्यक्तींनी आपले कौशल्य विकसित करणे आता अपरिहार्य असून शिक्षण व कौशल्य विकासासाठी आपला दृष्टिकोन वेगाने बदलावा लागेल. शाळा, विद्यापीठांना तसे बदलावे लागेल. तंत्रज्ञान क्षेत्रात येणारे बदल त्याच वेगाने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवले जायला हवेत. यासाठीच भारत सरकारने देशात ‘स्कील इंडिया अभियान’ सुरू केल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीत ब्रिक्स देशांसमवेत वाटचाल करू इच्छितो,” असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@