याद अगर वो आए, बजने लगे तनहाई...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018   
Total Views |

 
गेल्या आठवड्यात काही घटना वेदना देऊन गेल्या. रीता भादुरी गेल्या. मात्र, नीरज यांचे जाणे खूप काळ मनाला त्रास देत राहणार आहे. नीरज पूर्ण व्यक्त झाले. अगदी 96 वर्षांपर्यंत जगले. त्यांना त्यांच्या वाट्याचे मानसन्मानही मिळाले. अगदी अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश सरकारने त्यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. तरीही त्यांच्यासारख्या कलावंतांचे जाणे अन् गेल्यावर वृत्तपत्रांत सिंगल कॉलम बातम्यांच्या पलीकडे त्यांची दखल नसणे, दोन्हीही खूप खोलवर गेले.
 
 
नीरज गेले त्या दिवशी मग तनहाई वाजू लागली मनात. सुन्या सुन्या शहरात त्यांच्या गीतांची शहनाई निनादू लागली होती. खूप सार्या आठवणी दाटून आल्या. माझ्याही जन्माच्या आधी ते यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयात स्नेहसंमेलनासाठी येऊन गेल्याची आठवण अनेक जण सांगतात. त्या वेळी त्यांनी ‘शोखियों मे घोला जाए...’ ही कविता पूर्ण आठ कडव्यांची ऐकविल्याचे सांगतात. तेव्हा त्याचे गाणे झाले नव्हते. त्या काळी छोट्या गावातल्या चित्रपटगृहात दुपारचे शो नसायचे. पुण्या-मुंबईकडे चित्रपट पाहून झाल्यावर मग ते लहान गावातल्या टॉकीजला यायचे. त्यामुळे चित्रपट पाहणे हाही एक सोहळा होता. त्यांच्यासोबत मग बच्चे कंपनीचाही नंबर लागायचा. त्या काळातले चित्रपट देशभक्तीकडे झुकलेले असायचे. त्यामुळे सिनेमा बघण्याचा योग आला. तो होता ‘प्रेमपुजारी.’ त्यामुळे या चित्रपटातली गाणी नीरज यांनी लिहिली होती, हे कॉलेजला गेल्यावर कळले.
‘शोखियों मे घोलां जाए फुलों का शबाब, रंगिला रे तेरे रंग मे, फुलों के रंग से...’ ही गाणी खूपच आवडली त्या वयातही. ती गाणी मात्र तोंडात बसली. अर्थ कळत नव्हता. अर्थ कळण्याच्या वयात ही गाणी ऐंशीच्या दशकातली सर्वाधिक लोकप्रिय गाणी होती. तोवर मग नीरजही कळले होते. त्यांच्याविषयी मग बर्यापैकी माहिती गोळा झाली होती. न्हाव्याच्या दुकानात गेल्यावर तिथे फिल्मी मॅगझिन्स पडून असायची. माधुरी अन् मनोरमा, ब्लीटझ् वगैरे. त्यातून आपले फिल्मी ज्ञान वाढत गेले. उत्सुकता होतीच, कारण चित्रपट बघायचा नाही, या दंडकापासून आता बघू द्या ना, वयात आलाय तो... पर्यंतचा प्रवास पार पडला होता. उत्सुकता होतीच. आकर्षणही होते.
 
त्या दिवशी पहिला चित्रपट अन् ती नीरजची पहिली भेट, असेच म्हणावे लागेल. कुठल्याही कवीची प्रत्यक्ष भेट होण्यापेक्षा त्याच्या शब्दांची भेट होणे अन् त्याने आपल्याला गुंतवून ठेवणे, आपल्या मनातल्या भावनांना त्याचे शब्द चपखल बसणे, हीच खरी भेट असते. नंतर नीरज यांचे कवितासंग्रहदेखील मिळविले.
नेमके काय आहे, काय झाले होते त्यांच्या संदर्भात म्हणून मग नीरज यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला... त्यांच्या आयुष्यातला संघर्ष अखेरपर्यंत संपलाच नाही. 1944 साली त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. त्याचे नाव ‘संघर्ष’ हेच होते. 18 कवितासंग्रह त्यांनी लिहिले. शेवटचा 1987 साली लिहिला. 70 च्या दशकात मुंबईच्या चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांच्या प्रतिभांना नवे धुमारे फुटले आणि एकापेक्षा एक अशी सरस गीते त्यांनी लिहिली. ‘पद्मश्री’(1991), आणि ‘पद्मभूषण’ (2007) मिळाले. विश्व उर्दू परिषदेचा मानाचा पुरस्कार मिळाला. तीन वेळा त्यांना फिल्म फेअर मिळाले. पहिले गाणे होते, काल का पहिया, घुमे रे भैय्या, (चंदा और बिजली 1969) त्यानंतर, बस यही अपराध मै हर बार करता हूं, आदमी हूं आदमीसे प्यार करता हू...(पहचान 1970) आणि ए भाई जरा देख के चलो, (मेरा नाम जोकर 1971) अशी सलग तीन वर्षे त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. मेरा मन तेरा प्यासा (गॅम्बलर), जब से लगन लगायी रे उम्र भर (रेशमा और शेरा), आप यहां आये किसलिये, (कल आज और कल), लिखे जो खत तुझे (कन्यादान), तेरे मेरे सपने, गॅम्बलर, प्रेम पुजारी आणि शर्मिली या चित्रपटांतील त्यांची सर्व गाणी हिट झाली. ती गाणी आजही रसिकप्रियच आहेत. त्या काळी अनेक दिग्गज गीतकार होते. पण, नीरज यांच्या गीताचा बाज काही औरच होता. त्यामुळेच रसिकांनी त्यांच्या गीतांना डोक्यावर घेतले. सुमारे शंभर चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी लिहिली. त्या काळात ती सर्वांनाचा भावली. त्यांच्या कविताही खूपच अभिजात अशाच आहेत. गोपालदास नीरज यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. सहा वर्षांचे असताना त्यांचे वडील बाबू ब्रजकिशोर सक्सेना यांचे निधन झाले. ते दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी इटावामध्ये कचेरीत टायपिस्ट म्हणून काम केले. नंतर चित्रपटगृहातील एका दुकानावरही काम केले. ते काम सुटल्यावर बेरोजगारीत दिवस काढल्यावर ते दिल्लीला गेले अन् स्वच्छता विभागात टायपिस्ट म्हणून नोकरी पत्करली. ही नोकरी सुटल्यावर कानपूरमध्ये त्यांनी डीएव्ही कॉलेजमध्ये लिपिक म्हणून काम सुरू केले. नोकरी करत त्यांनी परीक्षा देत बी. ए. आणि नंतर हिंदी साहित्याची प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली. मेरठ येथे हिंदीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्यावर वर्ग वेळेवर घेत नसल्याचे आणि प्रेम प्रकरणात गुंतल्याचे आरोप केले. यामुळे नाराज झालेले नीरज यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अलीगढच्या धर्मसमाज कॉलेजमध्ये ते हिंदीचे प्राध्यापक झाले.
हे सगळे त्या माणसाला मला सांगायचे आहे. ‘एकही गुनाह हरबार करता हूं, आदमी हूं आदमीसे प्यार करता हूं...’ असे म्हणणारे नीरज- माणसांवर अन् माणुसकीवर प्रेम करणारे नीरज- त्या वयात कुण्या मुलीवरही प्रेम करत असतील तर तो काय गुन्हा ठरतो का?
प्रेमावर त्यांनी खूप गहिरं असं लेखन केलं. मी आलो नि प्रेमावर लेखन सुरू झालं अन् मी गेलो की ते संपलेलं असेल, असं ते म्हणाले होते. कविता करणार्या या माणसाला चित्रपटांची गाणी लिहिण्यासाठी देव आनंदने आणले. देव आनंद यांनी लखनौतील एका मुशायर्यात त्यांच्या कविता ऐकल्या. त्यांना चित्रपटात गाणी लिहिण्यासाठी मुंबईला बोलावले. ‘कारवॉं गुजर गया,’ हे गाणे हिट झाले. त्याआधी याच नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आला होता. साठच्या दशकात युवा पिढीत तुफान लोकप्रिय होता.
त्या काळात देव आनंद यांचा ‘प्रेमपुजारी’ या चित्रपटाचे काम सुरू होते. सचिनदांना त्याच्यासाठी काही अनवट अशी गाणी हवी होती. रंगिला या शब्दापासून सुरू होणारे गाणे हवे होते. नीरज यांनी तिथेच त्यांच्या कार्यालयात बसूनच हे गाणे लिहून दिले- ‘रंगिला रे... तेरे रंग में...’ अर्धशतकानंतरही ते तसेच ताजे आहे- 50 वर्षांनंतरही तसेच ताजे टवटवीत वाटते. पण नंतर ज्या देव आनंदने त्यांना आणले त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरविली... काम झाले की त्या माणसाला टाकून देण्याचे अन् कंटाळा आला की माणसे बदलून टाकण्याचे चलन सार्याच क्षेत्रात आहे. असे करणारी माणसे उत्तम प्रशासक म्हणण्याचा काळ आजही जसाच्या तसा आहे, नव्हे तो वाढला आहे. असे काळजाला लागून राहणारे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात वारंवार येत राहिले. कदाचित वेदनांची गाणी व्हावीत यासाठीच ते असावे. वेदनांची अशी गाणी झाली की गाण्यांचे वेद होत असतात.
बदन के जिसके शराफत का पैरहन देखा, वो आदमी भी यहॉं हमने बदचलन देखा...
ही कविता सादर करताना त्यांच्यावर त्यांच्या महाविद्यालयाने केलेला आरोप किती जिव्हारी लागला होता, हे कळायचे. हरिवंशराय बच्चन, ओशो यांनी मात्र या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. कलावंतांना समजून घेण्यासाठी ऐहिक सुखांच्या पलीकडे असलेली संस्कृती भिनली असली पाहिजे. कलावंताला समजून घेणे ही खरी सांस्कृतिकता असते. त्याबाबत अजूनही आम्ही असुसंस्कृतच आहोत.
आंसू जब सम्मानित होंगे
मुझको याद किया जाएगा
जहॉं प्रेम का चर्चा होगा
मेरा नाम लिया जाएगा।
मान-पत्र मैं नहीं लिख सका
राजभवन के सम्मानों का
मैं तो आशिक रहा जनम से
सुंदरता के दीवानों का
लेकिन था मालूम नहीं ये
केवल इस गलती के कारण
सारी उम्र भटकने वाला,
मुझको शाप दिया जाएगा।
ही त्यांची कविता बरेच काही सांगून जाणारी...!
@@AUTHORINFO_V1@@