आज कारगिल विजय दिवस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018   
Total Views |

आज 26 जुलै- कारगिल विजय दिवस! पाकिस्तानी लष्कराने अतिरेक्यांना सोबत घेऊन, भारताच्या अति उंच शिखरांवर आक्रमण केले असता, भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलेली मात म्हणून आजचा दिवस हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
हा दिवस आज साजरा करीत असताना, पाकिस्तानसारखा नापाक देश कोणत्या वेळी कशी खेळी खेळेल, याचा अदमास आधीच घेऊन आम्हाला आमची जय्यत तयारी ठेवावी लागणार आहे. सोबतच जुन्या घटनांपासून धडाही घ्यायचा आहे. ज्या वेळी पाकिस्तानने कारगिल आणि लगतच्या भारतीय चौक्यांवर हल्ले केले, त्या वेळी आपले लष्करप्रमुख मलिक हे विदेशात एका लष्करी सौद्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांना ही माहिती देण्यात आली होती, पण ते उशिराने पोहोचले. त्या वेळी स्थिती अशी होती की, पाकिस्तानी सैनिक उंचीवर होते आणि आपण खालून वर जात होतो. आपले सैनिक त्यांच्या टप्प्यात असल्याने शत्रुपक्षाच्या गोळीबारात आपल्या अनेक जवानांना शहीद व्हावे लागले. आपल्याजवळ त्या वेळी बोफोर्स तोफा होत्या. त्या तोफांनी अत्यंत प्रभावीपणे मारा करून पाकिस्तानी सैन्याला रोखले. पण, आपल्या जवानांचे रक्षण करणे गरजेचे असल्याने तत्कालीन वायुदलप्रमुख अनिल यशवंत टिपणीस यांनी वायुदलाला या युद्धात उतरविण्याशिवाय पर्याय नाही, हे हेरले. पण, लष्करप्रमुखांना हे मान्य नव्हते. युद्धकाळात असे निर्णय घेताना, चोहोबाजूंचा विचार करणे अत्यंत आवश्यक असते. शत्रू भारताला गाफील ठेवून आपल्या भूमीत घुसला होता आणि त्याने आमच्या सर्व चौक्या काबीज केल्या होत्या. एवढेच नव्हे, तर आपले पाच हजार सैनिक त्या भागात लपवून आणले होते. यात आपली गुप्तवार्ता यंत्रणा सपशेल अयशस्वी ठरली, असेच म्हणावे लागेल. स्थानिक मेंढपाळांनी पाकिस्तानी सैनिक या भागात आल्याचे भारतीय जवानांना सांगितले तेव्हा कुठे आमच्या गुप्तवार्ता विभागाचे डोळे उघडले. लष्कराने एक तुकडी त्या भागात पाठविली असता, आपल्या पाच जवानांना त्यांनी पकडले आणि त्यांचा अतोनात छळ केला. ते पाचही जवान शहीद झाले. ही बातमी कळताच पाकिस्तानने आपल्या भूमीत आक्रमण केल्याची बाब उघड झाली.
 
एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, ज्या उंचच उंच भागात आपल्या चौक्या कार्यरत असतात, तेथे उन्हाळ्यात कडक ऊन आणि हिवाळ्यात प्रचंड थंडी असते. थंडीत हे तापमान अगदी 40 अंशाखाली गेलेले असते. कारगिल हा घटक धरला तर या संपूर्ण भागात द्रास, बटालिक, टायगर हिल, नुब्रा व्हॅली, टोलोलिंग शिखर, लडाखमधील काही भाग असे अनेक भाग होते. हे सर्व भाग 20 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर होते. भारताच्या सीमेपासून जाणारा श्रीनगर-लेह हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरायचा, अशी व्यूहरचना पाकिस्तानने केली होती. आपल्या सुमारे दीडशे चौरस कि. मी. भूभागावर पाकिस्तानने कब्जा केला होता. सोबतच याच भागात लष्कराला रसद आणि दारूगोळा पोहाचविण्यासाठी एक मोठे भांडार उभारले होते. पाकिस्तानी लष्कराने मदतीला मुजाहिदीन आणि अफगाणी तालिबान्यांनाही सोबत घेतल्याचे नंतर निष्पन्न झाले. ज्या वेळी तेथे खूप थंडी असते, त्या वेळी दोन्ही देशांच्या सीमेवरील जवान हे परत बोलावले जातात. त्या वेळी असेच झाले. भारताने सर्व चौक्यांमधून आपले सैनिक परत बोलावले आणि याचाच फायदा पाकिस्तानने उठविण्याचे ठरविले. एकदा आपण भारतीय सीमेच्या आत घुसून त्यांच्या भूप्रदेशावर कब्जा केला, तर हा प्रश्न आपणास आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेता येईल, असा पाकिस्तानचा होरा होता.
 
पण, ज्या वेळी वायुदलप्रमुखांना तेथील पर्वतीय प्रदेश, भारतीय लष्कराची स्थिती, पाकिस्तानची तयारी या सर्व बाबी लक्षात आल्या आणि त्यांनी वायुदलाला या लघुयुद्धात उतरविण्याचा मानस व्यक्त केला. पण, अन्य दलाच्या प्रमुखांना असे वाटले की, वायुदलाचा वापर केल्यास या युद्धाची परिणती मोठ्या युद्धात होईल. पण, टिपणीस आपल्या मतावर ठाम होते. त्यासाठी पंतप्रधानांची मंजुरी आवश्यक होती. अटलबिहारी वाजपेयी त्या वेळी पंतप्रधान होते. तिन्ही दलांच्या प्रमुखांनी त्यांची भेट घेतली. वायुदलप्रमुख तेव्हा जॉईंट चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते. अटलजींनी शांतपणे वायुदलप्रमुखांचे म्हणणे ऐकून घेतले. समग्रपणे चर्चा झाल्यानंतर अटलजींनी वायुदलाच्या वापरासाठी परवानगी दिली. पण, नियंत्रण रेषा आपल्या विमानांनी ओलांडू नये, अशी सूचना केली. युद्धात जेव्हा पूर्ण ताकदीने उतरायचे असते, तेव्हा अशा बाबींना काळवेळ पाहून महत्त्व दिले जात नाही, ही युद्धशास्त्राची नीती आहे. 26 मे रोजी पहाटे श्रीनगर आणि अन्य वायुदल तळांवरून विमाने आणि हेलिकॉप्टर्सनी झेप घेतली. आणि मग सुरू झाली उंच पर्वतश्रेणीत लपलेल्या पाकिस्तानी लष्कराला हुसकावून लावण्याची मोहीम! वायुदलाच्या या मोहिमेत शत्रूंच्या लपलेल्या ठिकाणांवर जोरदार मारा करण्यात आला. मिग हेलिकॉप्टर्समध्ये तोफा लोड करून त्या उंच शिखरांवर नेण्यात आल्या. हजारो जवानांना शिखरांवर नेण्यात आले. मिग आणि मिराज विमानांनी शत्रूंची अनेक ठिकाणे नष्ट केली. तिकडे बोफोर्स तोफा आग ओकतच होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या विमानांनी पाकिस्तानी सैनिकांचे रसद आणि दारूगोळा भांडार पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. त्यामुळे पाकिस्तानला जोरदार धक्का बसला. पाकिस्तानने आपल्या आणि त्यांच्या चौक्यांमध्ये विमानभेदी बंदुका, क्षेपणास्त्रे, तोफा तैनात केल्या होत्या. त्यांना वाचवीत आपल्या विमानांनी त्यांना टिपले. जून महिन्यात श्रीनगर-लेह मार्ग पाकिस्तान्यांच्या तावडीतून मुक्त करण्यात आला. रसद तुटल्यामुळे पाकिस्तानी सैनिकांचे मनोबल खच्ची झाले होते.
 
 
तिकडे आपल्या युद्धनौकांनी पाकिस्तानमध्ये जाणार्या इंधन भरलेल्या नौकांना रोखून धरले. त्यांनी कराची बंदराला लक्ष्य केले. ही मोहीम ‘ऑपरेशन तलवार’ अंतर्गत फत्ते करण्यात आली. आमच्या जहाजांनी अरब सागरातून इंधन जाऊ देण्यास अटकाव तर केलाच, पण पाकिस्तानचा व्यापारी मार्गही रोखून धरू, अशी भूमिका घेतली. त्या वेळी पाकिस्तानजवळ फक्त सहा दिवस पुरेल एवढेच इंधन होते, असे विधान नंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केले होते. भारताच्या लष्कर, वायुदल आणि नाविक दलाच्या एकाच कारवाईमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले. आपली आता धडगत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना या युद्धाच्या योजनेची माहिती तत्कालीन जनरल परवेझ मुशर्रफ यांनी दिली नव्हती. युद्ध सुरू झाल्यानंतरच शरीफ यांना ही माहिती मिळाली. आमच्या वायुदलाने अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आमच्या सर्व चौक्यांना मुक्त केले आणि पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठविले. पर्वतश्रेणींमध्ये आमच्या सैनिकांजवळ तोफा आणि अन्य दारूगोळा आल्याने त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर जोरदार मारा केला. पाकिस्तानी विमानांनी आगळीक केली, तर त्यांचा मुकाबला करण्यासाठी आम्हीही विमानभेदी तोफा तैनात केल्या होत्या. पण, पाकिस्तानने ती हिंमत केली नाही. प्रारंभी हे युद्ध लढण्यासाठी भारताने दोन लाख सैनिकांना मैदानात उतरविले होते. पण, वायुदलाची साथ मिळाल्यानंतर हा आकडा अवघा 30 हजारावर आला व आमच्या जवानांची हानी कमी झाली. टायगर हिल ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी नुसता गोळ्यांचा वर्षाव सुरू होता. अकरा तास हे युद्ध चालले आणि पाकिस्तानी सैनिक मारले गेल्यानंतर टायगर हिल आपल्या ताब्यात आले. 3 मे रोजी पाकिस्तानने घुसखोरी केली आणि 26 मे रोजी आमच्या वायुदलाने उड्डाणे भरली. या काळात सर्वाधिक नुकसान भारताचे झाले. हा निर्णय आधीच घेतला असता, तर एवढी हानी झाली नसती, असे संरक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या या आगळिकीमुळे आंतरराष्ट्रीय दबाव नवाज शरीफवर वाढला. 15 जूनलाच अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिटंन यांनी शरीफ यांना फोन करून कारगिलमधून आपले सैन्य काढून घ्यावे अशी सूचना केली. पण, त्या वेळी नवाज शरीफ लष्करापुढे हतबल ठरले. 26 जुलैला अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्व पाकिस्तान्यांना भारतीय हद्दीतून हाकलून लावण्यात आल्याची घोषणा केली. तो दिवस लष्कर कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. या युद्धात शहीद झालेल्या सर्व जवानांना सॅल्यूट.
बबन वाळके
9881717821
@@AUTHORINFO_V1@@