संपत्तीचे ‘ऑनलाईन’ इच्छापत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018   
Total Views |


 

 

ऑनलाईन विल करण्याकरिता बरेच प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. ही सेवा देणारी पोर्टल्स रेडी टू यूज फॉरमॅट देतात. काही पोर्टल्सवर तुम्हाला कायदेशीर सल्लाही मिळू शकतो. वारसा हक्कासाठी विशेष सूचनाही देण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.

 

एखादी व्यक्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याची सर्व संपत्ती योग्य माणसांना मिळावी किंवा त्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे संपत्तीचे वाटप व्हावे म्हणून जिवंतपणीच इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र तयार करते. इच्छापत्र करून ठेवल्यास त्या माणसाच्या मरणोत्तर कुटुंबात शक्यतो संपत्ती वाटपावरून मतभेद किंवा भांडणं होत नाहीत.सध्याच्या डिजिटल जमान्यात ‘विल’ म्हणजेच इच्छापत्र ‘ऑनलाईन’ही करता येते. इच्छापत्र ऑनलाईन करणे सहज सोपे असते व खर्चही कमी येतो. वकिलामार्फत केल्यास खर्च जास्त येतो. एका साध्या कागदावरही केलेले इच्छापत्र वैध ठरू शकते. त्या कागदावर संपूर्ण संपत्तीचा तपशील द्यावयास हवा. ही संपत्ती कोणाला मिळणार, याचा पूर्ण तपशील हवा. इच्छापत्र करणार्याची व दोन साक्षीदारांची त्या कागदावर सही हवी. एवढे असले तरी पुढे अशा स्वरूपातील इच्छापत्रही वैध मानले जाते. इच्छापत्राचे रजिस्ट्रेशन केलेच पाहिजे, असा कायदा नाही. जर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर वादाला कारणे उरत नाहीत व रजिस्ट्रेशन केलेले इच्छापत्र हे पूर्ण खरे आहे, असे मानले जाते. परिणामी, न्यायालयीन दाव्यांची संधी कमी होते. इच्छापत्र नसताना मृत्यू आल्यास कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. ‘रजिस्टर विल’ लाही न्यायालयात आव्हान देता येऊ शकते. संपत्तीचा संपूर्ण तपशील, संपत्ती कोणाला जावी, याचा पूर्ण तपशील व इच्छापत्रात सोपी, समजणारी, वापरलेली भाषा ही त्रिसूत्री ज्या इच्छापत्रात सोपी, समजणारी वापरलेली भाषा ही त्रिसूत्री ज्या इच्छापत्रात असेल ते आदर्श इच्छापत्र.

 

ऑनलाईन इच्छापत्र तयार करण्यासाठी पद्धती आहेत. सुरुवातीला ज्याला इच्छापत्र करावयाचे आहे, त्याने शुल्क भरून सेवा पुरविणार्याकडे नोंदणी करावयास हवी. तुम्ही त्यांच्या फॉरमॅटवर ‘फिड’ करू शकता किंवा स्वतःच्या इच्छेचा फॉरमॅट तयार करू शकता. स्वतःचा फॉरमॅट तयार करताना शक्यतो वकिलाचा सल्ला घ्या. सर्व तपशील फिड करून झाल्यानंतर इच्छापत्राची प्रिंट घ्या. तपशील व्यवस्थित भरा. स्थिर संपत्ती फिड करताना, त्या स्थिर संपत्तीचा हिस्सा क्रमांक, संपत्तीचे क्षेत्रफळ, संपत्तीच्या चारही दिशांना काय आहे याचे वर्णन बरोबर द्या. इच्छापत्र सुरक्षित जागी ठेवा व तुमच्यानंतर तुमच्या कायदेशीर वारसांना ते सहज मिळाले पाहिजे. ऑफलाईन इच्छापत्रासारखे ऑनलाईन इच्छापत्रातही, पहिल्यांदा इच्छापत्र केल्यानंतर त्यात हवे तेवढे वेळा बदल करता येतात. शेवटचा बदल हा वैध समजला जातो. इच्छापत्र करणार्या मृत्यूनंतर न्यायालयातून ‘प्रोबेट’ मिळवावे लागते. या ‘प्रोबेट’मध्ये न्यायालय असे प्रमाणित करते की, हे इच्छापत्र कायदेशीर व वैध आहे. यात नमूद केल्याप्रमाणे संपत्तीचे वाटप करावे. ऑनलाईन इच्छापत्र करणे कमी खर्चाचे असते. तसेच ते जास्त खाजगी किंवा गुपित राहू शकते. ऑनलाईन इच्छापत्रात ‘फिड’ करण्यासाठी जो फॉरमॅट असतो, तो निष्णात वकिलांनी तयार केलेला असतो. एचडीएफसी सिक्युरिटीज, ईझी विल, वॉरमॉण्ड ट्रस्टीज् अॅीण्ड एक्झिक्युटर्स यांच्याकडे वारसा हक्क योजनांसाठी तयार सोल्युशन्स उपलब्ध आहेत. एसबीआय कॅपिटल मार्केट्सची उपकंपनी एसबीआय कॅप ट्रस्टी यांच्याकडे इच्छापत्र ऑनलाईन भरण्यासाठी ‘मायविल’ या नावाने सेवा उपलब्ध आहे. विलस्टार डॉट इन व लॉ फर्म डॉट इन या कंपन्या मोफत विलमेकिंग सेवा पुरवितात.

 

ऑनलाईन इच्छापत्र करताना काय काळजी घ्याल?

तुमचा तपशील किंवा डाटा ‘फिड’ करण्यापूर्वी, ज्या कंपनीची तुम्ही सेवा घेणार आहात त्या कंपनीचा योग्य अभ्यास करावा. सत्यता तपासावी. मागील इतिहास पाहावा. सर्वसाधारणपणे ऑनलाईन पोर्टल दीड ते साडेचार हजार रुपये शुल्क आकारतात. वकील त्यांच्या कुवतीप्रमाणे साधारणपणे वीस हजार रुपये शुल्क आकारतात. परिणामी, वकिलामार्फत ऑफलाईन इच्छापत्र करण्याऐवजी ऑनलाईन इच्छापत्र केल्यास पैसे वाचू शकतात. जेवढे वारसदार किंवा संपत्तीचा वाटा मिळणारे कमी, तेवढे इच्छापत्र सुटसुटीत. ज्यांना संपत्तीचा वाटा मिळावयास हवा, त्यांच्या नावात चुका असता कामा नये. जर तुमची परदेशात संपत्ती आहे व कुटुंब मोठे आहे, बर्याच सख्या व अन्य नातलगांना संपत्तीचे वाटप करावयाचे आहे व संपत्तीसाठी भरावयाच्या करांबाबत तुम्हाला कायदेशीर मताची गरज आहे, अशांनी ऑनलाईन इच्छापत्र भरू नये. इच्छापत्र आणि नामांकन (नॉमिनेशन)हे दोन भिन्न प्रकार आहेत. ‘नॉमिनी’ ला संपत्तीचा ताबा मिळू शकतो, पण तो संपत्तीचा मालक असेलच असे नाही. ‘नॉमिनी’ कडे जर मृत्यू पावलेल्याचे इच्छापत्र नसेल तर त्याने संपत्तीचा ताबा घेऊन, कायदेशीर वारसांकडे संपत्ती सुपूर्द करावयास हवी. शेअर व बॉण्ड्स नॉमिनीकडे येऊ शकतात.

 

ऑनलाईन इच्छापत्र

१) सेवा पुरविणार्यांकडे शुल्क भरून, नोंदणी करा. २) संपत्तीचा तपशील, संपत्ती कोणाला मिळावी व एक्झिक्युटरचे नाव फिड करावे. एक्झिक्युटरची ही जबाबदारी असते की, त्याने इच्छापत्रात नमूद असल्याप्रमाणे संपत्तीचे वाटप करावयास हवे. ३) जर संपत्ती ज्याला जावयास हवी तो /ती अज्ञान असेल, तर पालकाचे (गार्डियन) नाव फिड करा. ४) सेवा पुरविणारी यंत्रणा इच्छापत्राचा ड्राफ्ट पुरविणार. ५) ड्राफ्ट योग्य वाटल्यास, तो भरण्याचे समाधान झाल्यास, ड्राफ्ट सावकाश फिड करून अंतिम करावा ६) प्रिंट काढा, सही करा, दोन साक्षीदारांच्या सह्या घ्या. ७) हवे असल्यास रजिस्टर करा. सुरक्षित जागी ठेवावा. योग्य वेळी हे इच्छापत्र सहज मिळावयास हवे. ८ ) अतिरिक्त शुल्क भरून इच्छापत्रात हव्या तेवढ्या वेळा बदल करता येतील.


@@AUTHORINFO_V1@@