शिक्षक ते आरोग्य मार्गदर्शक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |



नाशिकचे ५० वर्षीय शिक्षक दीपक प्रताप मानकर यांनी आरोग्य मार्गदर्शक म्हणून काम सुरु केले असून गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर आणि प्रत्यक्ष प्रयोगानंतर आपल्या जुन्या शास्त्रातील अनेक बाबी त्यांनी पुन्हा नव्याने प्रचारात आणल्या आहेत.

 

आजकाल धकाधकीच्या जीवनात आरोग्य कसे सांभाळायचे, हा मोठाच प्रश्न होऊन बसला आहे. नोकरी-उद्योगासाठी दररोज प्रवास करावा लागतो. घरापासून दूर जावे लागते. अनेक ठिकाणी सोयी नसतात. वेळेवर जेवण, झोप, नैसर्गिक विधींची सोय अनेक ठिकाणी उपलब्ध नसते. भूक लागणे, व्यायाम करणे, योग्य निद्रा घेणे असे असेल, तर आरोग्य उत्तम राहील. मात्र, अनेक गोष्टींमुळे ते शक्य होत नाही. दूरचित्रवाणीपासून तर अनेक माध्यमे आरोग्यासाठी काय करावे ते सांगत असतात. मात्र, प्रत्यक्षात आजार झाला तर काय करावे, कोणाकडे जावे हे सुचत नाही. अशा परिस्थितीत नाशिकचे ५० वर्षीय शिक्षक दीपक प्रताप मानकर यांनी आरोग्य मार्गदर्शक म्हणून काम सुरु केले असून गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर आणि प्रत्यक्ष प्रयोगानंतर आपल्या जुन्या शास्त्रातील अनेक बाबी त्यांनी पुन्हा नव्याने प्रचारात आणल्या आहेत. त्यामुळे आजार बरा होऊन स्वास्थ्य लाभू शकते.

 

दीपक मानकर यांच्या घरात सेवेचे व्रत सुरू आहे. त्यांचे मोठे बंधू सुरेश मानकर हे भाजपचे पदाधिकारी आहेत, तर मधले बंधू रमेश मानकर हे ‘गो सेवा विभागा’चे काम सांभाळत आहेत. नाशिकच्या टाकळी रोड परिसरात वास्तव्यास असलेले दीपक यांना मात्र वेगळीच वाट सापडली. त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन त्यात प्राविण्य संपादन केले. शिक्षकापासून आरोग्य मार्गदर्शक हा त्यांचा प्रवास खूप काही शिकविणारा आहे. दीपक मानकर यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९६८ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी आपले पहिली ते दहावी शिक्षण रवींद्रनाथ विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय येथून डी.एड.पदवी संपादन केली. कलानिकेतन, नाशिक येथून चित्रकला विषयाचे ज्ञान संपादन केले. पुढे बी.ए.बी. एड. शिक्षणाबरोबर योगविद्या धाम येथून योग, निसर्गोपचार, अॅञक्युपंक्चर याचे शिक्षण घेतले. रुरल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनमधून एन.डी. पदवी संपादन केली. याच संस्थेने त्यांना ‘निसर्गोपचार सेवारत्न पुरस्कार’ प्रदान केला. २०१६ मध्ये झालेल्या पहिल्या ‘राष्ट्रीय आयुष संमेलना’त त्यांना ‘आयुष्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. समुद्रमंथनातील चौदा रत्ने हे काल्पनिक चित्र अॅाल्युमिनियमच्या पत्र्यावर इम्बोसिंग पद्धतीने त्यांनी पूर्ण केले. त्याचा अनेक वृत्तपत्रांमधून गौरव झाला. १९८९ ते १९९५ दरम्यान, जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून आणि त्यानंतर १९९५ पासून आजतागायत नाशिक मनपा शिक्षण मंडळाच्या शाळेत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. पूर्णवेळ ‘प्रौढ साक्षरता अभियाना’चे काम केल्यावर त्यांनी ‘सर्व शिक्षा अभियाना’त तज्ज्ञ शिक्षक म्हणून सेवा केली. त्यात शिक्षकांशी संवाद साधताना’ मंत्रांची योगसाधना’ पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. श्री. जिव्हेश्वर युवा उत्कर्ष संस्थेत सरचिटणीस म्हणून काम केले. त्यानंतर स्वकूल साळी समाज संस्थेत सरचिटणीस म्हणून आज काम पाहत आहेत. प्राथमिक शिक्षक समिती मनपा या संस्थेत तीन वर्षे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. बुधवार पेठेतील ‘सुभाष सार्वजनिक वाचनालया’त संचालक म्हणून देखील ते कार्यरत आहेत.

 

मात्र, ‘आरोग्य मार्गदर्शक’ म्हणून त्यांनी स्वीकारलेले कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. याची सुरुवात कशी झाली, त्याची हकिकत देखील मनोरंजक आहे. शाळेतील मुलांना पसायदान शिकवत असताना त्यांना तन्मयता आली त्यामुळे मुले भावसमाधी अवस्थेत जात, असे त्यांना आढळले. शासनाच्या ‘सर्व शिक्षा अभियाना’त त्यांना हा अनुभव आला. त्यानंतर आयुर्वेद तज्ज्ञ बालाजी तांबे यांचे ‘चक्र सुदर्शन’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्यातून त्यांनी २०११ पासून ‘मंत्र व योग’ साधना सुरु केली. पाथर्डी फाटा येथील मनपा शाळेत शिकवीत असताना त्यांनी योगासने, सूर्यनमस्कार, मंत्रोपचार, मुद्रा यांचा अभ्यास करतानाच शाळेतील मुलांवर त्याचे काय परिणाम होतात? त्यांचे आजार बरे होतात का? याबाबत प्रयोग सुरू केले. अनेक प्रयोग यशस्वी होऊ लागले. त्यातून त्यांनी ‘निसर्गोपचार कोर्स’ देखील केला. त्यांना या अभ्यासाचे जणू वेडच लागले. मग जुन्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी त्याला स्वानुभवाची जोड देत पुस्तक लेखन सुरू केले. ‘तंत्रांची योगसाधना, मुळाक्षरोपचार, शब्दोपचार, हस्तचिकित्सा पद्धती’ ही चार पुस्तके त्यांनी लिहिली. त्यानंतर नाशिकच्या वसुधा प्रकाशनाने त्यांचा अभ्यास पाहून ‘खास चटपटीत’ या नियतकालिकांचा विशेषांक प्रसिद्ध केला. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या मागील बाजूस असलेल्या पुस्तक प्रदर्शनात मानकर यांच्या या सर्व पुस्तकांना प्रचंड मागणी असते. अतिशय सुंदर आणि स्वतःची योगासने करतानाची छायाचित्रे असलेली आणि जुने संस्कृत श्लोक आणि त्यांचा अर्थ यांचा संदर्भ देत केलेले लेखन यामुळे आणि प्रत्यक्ष आजारांवर उपयुक्त ठरत असल्याने हे लेखन वाचले जात आहे. सध्या ते ‘गर्भावस्था रोग’ व ‘योग’ हे पुस्तक लिहित आहेत. निसर्गोपचार, अॅक्युप्रेशर, मंत्रोपचार, योगोपचार, फेंगशुई, सुजोक थेरपी, संगीत थाप, प्राणिक हिलिंग, रेकी, मसाज अशा सुमारे २५ उपचार पद्धतीत ते पारंगत झाले असून रोग निदान आणि त्यावरील उपचार ते करीत असतात. या सर्व उपचार पद्धती मूलतः भारतीय आहेत. आपल्या शास्त्रात त्यांचा आधार सापडतो. त्यानंतर अन्य देशात त्या विकसित झाल्या आहेत असे मानकर सांगतात. अनेक ठिकाणी मधुमेह, रक्तदाब यावर उपचारशिबिरे देखील घेतात. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

- पद्माकर देशपांडे

 
@@AUTHORINFO_V1@@