आयुष्याला सोबत करणारी बाबूजींची गाणी..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |
 
 
मराठी चित्रपट वा नाटके यांचे एक अभिन्न, महत्वाचे अंग म्हणजे त्यातील संगीत. भारतात अभिजात शास्त्रीय संगीताची एक मोठी परंपरा आहे. या भारतीय संगीताला मूठभर जाणकार लोकांच्या कोषातून बाहेर काढून सामान्य लोकांपर्यंत हा संगीताचा प्रवाह नेला तो चित्रपट संगीताने. अनेक प्रतिभावान, जाणकार संगीतकार व गायक महाराष्ट्राला लाभले.
 
काळानुसार चित्रपट मागे पडले तरी त्यातील गाणी मात्र ५०-६० वर्षांनंतरही आपल्या अंगभूत अभिजात गोडव्यामुळे आजही आपले स्थान टिकवून आहेत. मराठी चित्रपट संगीतावर गदिमांच्या साथीने अधिराज्य गाजवणारे कै. श्री सुधीर फडके उर्फ 'बाबूजी' यांच्या संगीताने महाराष्ट्राला केवळ वेड लावले असे नव्हे तर उच्च दर्जाच्या अभिरुचीचे संस्कारही त्यांनी मराठी मनावर केले. सुमारे ५११ गीते बाबूजींनी गायली, व ८७७ स्वरबद्ध केली आहेत. आणि त्यातील अनेकानेक गाणी चित्रपटातून बाहेर येऊन आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या प्रसंगांची साक्षीदार बनून आता आपलीच होऊन गेलीत. माझ्या पिढीच्या जन्माच्याही कितीतरी वर्षे आधी बाबूजींनी केलेली गाणी आजही एफएम रेडियोच्या जमान्यातही आपले विशिष्ट स्थान टिकवून आहेत. आणि आमच्या पुढच्या पिढीच्याही तोंडी सहज रुळत आहेत, हे पाहिले की पुन्हा बाबूजींच्या सांगितिक प्रतिभेबद्दलचा अभिमान फुलून येतो.
 
सकाळी ६-७ या वेळेत रेडियो चॅनल्स थोडी 'कर्णसुसह्य' असतात त्यावेळेत आजही अनेकदा दिवसाची सुरुवात बाबूजींनी गायलेल्या 'आभाळाच्या देवघरी उष:काल झाला, रवि आला हो आला.' या तेजस्वी गीताने होते, किंवा त्यांनी स्वरबद्ध केलेल्या व आशाबाईंनी अतिशय गोडव्याने म्हटलेल्या 'उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उजळली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली' या नितांत सुंदर गीताने आपली सकाळ मंगलमय होते. श्रावण सोमवारची सकाळ म्हणजे 'शंभो शंकरा करुणा करा जग जागवा' हमखास ऐकू येतंच.
 
दिवसाच्या प्रत्येक प्रहरी, आयुष्यातील प्रत्येक प्रसंगी आणि वयाच्या सर्व टप्प्यांवर बाबूजींचं गाणं सोबत असतंच. सकाळच्या वेळात ऐकू येणारी आणि आपल्याला थेट 'प्रभात' काळात घेऊन जाणारी आणखी दोन गाणी आहेत. 'प्रभात समयो पातला आता जाग बा विठ्ठला' ऐकताना मला नेहमी वाटतं की खरंच साक्षात परमेश्वराला 'ऊठ' म्हणायचं तर विनंती ही अशीच सौम्य, आदबशीर आणि मधुर हवी ! तसेच केवळ एकतारी व टाळ यांच्या सोबतीने गायलेले 'तू माझी माऊली मी गे तुझा तान्हा पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे...' लहान मुलाच्या निर्व्याज्यतेसारखं कोमलपणे म्हटलेलं हे गाणंही आपल्याला एका वेगळ्याच विश्वात नेतं.
 
लहानपणापासून बाबूजींचा स्वर इतका सतत कानावर पडत होता की, ते मला आपल्या घरातलेच एक वाटत. त्यावेळी प्रसंगा प्रसंगातून आई-बाबा, काका-मामा यांच्याकडून ही गाणी आम्हाला उद्देशून म्हटली जायची. कुणी रुसून बसलं की, कुणीतरी समजवायला येई तेव्हा हमखास
 
'आमचा राजू का रुसला' किंवा 'रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे गं गालांत खुदकंन हसू' आणि रुसणं पुढे रडण्यापर्यंत पोहोचलंच तर 'रडब नको रे चिमण्याबाळा हसण्यासाठी जन्म आपुला' असं म्हणत आजीचं हुकुमी समजावणं आपल्या कानी येई. मुलांचे रुसणे हा शिक्षा करण्याचा वा रागवण्याचा प्रसंग नसतो तर तो रुसवा हळुवारपणे, गोडपणे, खेळकरपणे काढायचा असतो हे या गाण्यांमुळेच मनात ठसलं. झोपताना आईच्या मायेने भरलेल्या गोड आवाजात 'देवा घरच्या फुला.. सोनुल्या' ऐकताना डोळ्यावर अलगद झोपेचं राज्य सुरु होणं हा अनुभव म्हणजे खरोखर 'अमृतानुभवच..!'
 
मुलांना गंमती जमती करुन दाखवायची हौस असलेले एखादे आजोबा 'लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना' हे मजेदार गाणं मुलांना ऐकवून त्यांना पोटभर हसवत. मुलंही मग त्यांना 'आजोबा आजोबा माझे आजोबा... आवडती भारी मला माझे आजोबा !' हे गाणं ऐकवून परतफेड करतील यात काय ते नवल.
 
बाबूजींची गाणी केवळ गाणी राहिली नाहीत तर प्रत्येक भावनेची अभिव्यक्ती कशी असावी याचा आदर्श बनून राहिली. आजही परमेश्वराच्या माणूस नावाच्या मुलांची आपसात चाललेली भांडणे पाहताना, 'अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात' हे गाणे तोंडावर येणारच. खरोखरंच अशी गाणी म्हणजे आदर्श जीवन मूल्यांचा वस्तुपाठच. आमच्या लहानपणी शाळेत चांगल्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स लावण्याची सुंदर पद्धत होती. चांगल्या विचारांचे आणि दर्जेदार संगीताचे संस्कारही आपोआप होत असत. त्यावेळी 'ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते.. सत्य शिवाहून सुंदर हे', 'उठा राष्ट्रवीर हो..' 'रक्षणार्थ ठाकूनी उभे चहुकडे' 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम्' अशी ओजपूर्ण गाणी आमच्या तोंडी सहज रुळली. त्यातून देशभक्तीचा संस्कार आपोापच रुजला. 'बालसागर भारत होवो' शाळेत वेगळ्या चालीत लागे, नंतर जेव्हा बाबूजींच्या घनगंभीर आवाजात, भैरवीच्या सुरात हे गाणं पुन्हा गायलं गेलं, तेव्हा त्यातली उदात्तता, गांभीर्य पुन्हा मनाला भिडलं.
 
खूप गाणी लहानपणात ज्या व्यक्तींकडून ज्या प्रसंगात ऐकली, त्याच्याशी त्या आठवणी निगडीत झाल्या. अनेकदा मूळ गाण्यातला प्रसंग वा भाव वेगळाच, आणि आठवण भलतीच अशीही गोडी जमली ! माझी मुलगी तिच्या वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षात असताना तिला वह्या - पुस्तकं - डबे - बाहुल्या असे काय हाती येईल ते पिशवीत भरुन फिरायचा सोस होता. ति तशी निघाली की आमचं 'रंगू बाजाराला जाते , जाऊ द्या' असं ठेक्यात सुरु व्हायचं. तसंच माझा एक मामा लहानपणी आम्हाला 'चं' ची भाषा शिकवायचा. (म्हणजे प्रत्येक शब्दाच्या अागोदर 'चं' लावून तो शब्द उलट्या सुलट्या बाजूने म्हणणे.) त्या वयात अशा विविध भाषा तयार करण्याचा, बोलण्याचा प्रचंड नाद बऱ्याच जणांना होता. तर हा मामा चक्क त्या भाषेत गाणीही म्हणायचा. 'लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी' हे गाणे तो 'चडक्याला चंडलिकपू चटीभे चंबलाचा चवदे चळवंटीवा...." असं चं च्या भाषेत अगदी आळवून म्हणायचा. एकदा आम्ही सारे कुटुंबीय एका जंगल रिसॉर्टमध्ये गेलो. सगळी बाळ-गोपाळ मंडळी झाडाच्या फांद्यांवर चढून बसली. एकदम एकाला 'बिनभिंतीची' गाणं आठवलं. आणि मग ही जीन्स टी शर्ट वाली पोरं जेव्हा एका सुरात
 
'बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे वेली - पशु - पाखरे यांची दोस्ती करु' गायला लागली तेव्हा तिथले वयस्कर व्यवस्थापक गहिवरलेच ! आमच्या भागात अजूनही रस्त्यावर बैलगाड्या दिसतात पण त्या सगळ्या उसाच्या भाराने जडावून कशाबशा चाललेल्या. पण क्वचित कुठल्यातरी शेतावर बैलगाडीला तरणाबांड बैल जुंपून हाताला चाबूक फिरवत सुसाट जाणारा कुणी गाडीवान दिसला की, मला 'बैल तुझे हरणावानी, गाडीवान दादा हां...!" असं म्हणत गाडी हाकणारे सीमाचे ते मर्दानी रूपच आठवते.
 
बाबूजींची गाणी असा आपला एक विशेष 'मूड' तयार करतात. 'घननिळा लडिवाळा' लिहितांना गदिमांनी 'ल' सारखं अक्षर जास्तीतजास्त वापरुनही गाणं सुंदर करता येतं, हे चॅलेंज घेऊन ते गाणं म्हणून दाखवलं, असं म्हणतात. बाबूजींनी त्याला चालही छान अशी वेटोळी - वेटोळी दिली ! मणिक बाईंच्या लडिवाळ आवाजातील 'घननिळा लडिवाळा' किंवा 'सावळाच रंग तुझा' किंवा ' अंगाई रामराया' ऐकताना मला नेहमी आत्या मावश्यांचे पूर्वी दाखवण्यासाठी काढलेले फोटो आठवतात. ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो. साध्या साड्या नेसलेल्या, तेल लाऊन केसांचे नीट वळण घेऊन वेण्या घातलेल्या आणि सर्वांचे चेहरे अतिशय रेखीव, सात्विक आणि सोज्ज्वळ ! ही गाणी ऐकताना अशी सात्विक सौंदर्यमूर्ती डोळ्यापुढे उभी राहते.
 
स्वत: प्रेमात पडण्याच्या वयात असताना तशी संधी कधी आली नाही. त्यामुळे बाबूजींची अनेक गाणी अशी बिनसंदर्भाची 'रिकामी' राहून गेली ! तरीही ती सुंदर गोष्ट आपल्या आयुष्यात घडावी असे तेव्हा वाटत असायचे. त्यामुळे प्रत्यक्ष नसला तरी आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराला उद्येशून गाणी गुणगुणण्याचं ते वय आणि त्या वयाला तर पुरून उरतील इतकी गाणी बाबूजींनी गायलीत. वयात येतानाच्या त्या खुणांनी संकोच वाटायच्या त्या वयात 'आला वसंत देही मज ठाऊकेच नाही' या गाण्यानं त्या बदलांकडे पाहण्याची किती सुंदर दृष्टी दिली. आशाबाईंच्या केळकर आवाजातलं 'मी आज फुल झाले' हे गाणं ऐकताना नुकतीच वयात आलेली स्वच्छंद बागडणारी एखादी मुग्धा डोळ्यापुढे उभी राहते. सहज तोंडात बसण्यासारखी आणि त्या फुलपाखरी वयात आपोआप तोंडावर येत ती ' प्रेमात तुझ्या मी पडलले' 'सांग तू माझा होशील का ?' 'आज कुणीतरी यावे' 'बघत राहू दे तुझ्याकडे' अशी गाणी कुणीतरी गुणगुणायला लागले की, ऐकणाऱ्याच्या मनात उगीचच मग संशय निर्माण व्हायचा ! त्या एखाद्या उदास सायंकाळी 'या कातरवेळी पाहिजेस तू जवळी' अशी गाणी हमखास तोंडावर येत. म्हणजे संशयाचं खात्रीतच रुपांतर व्हायचं ! बाबूजींच्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडवणारे 'दिवसामागून दिवस चालले ऋतु मागूनी ऋतु - जिवलगा कधी रे येथील तू ?' हे गीत तर सर्वांच्या अगदीच खास प्रेमाचे. या गाण्यात पालटणाऱ्या ऋतुंना आणि त्या बरोबर बदलणाऱ्या भावनांना बाबूजींनी किती अचूक स्वररचनेनं साकारलंय.
 
यथावकाश आयुष्यातला तो नवथर ऋतूही पालटला आणि मग खरोखरच "येणार नाय आता" अशी वेळ येऊन ठेपली. कितीही आव आणला तरी "चालली शकुंतला, लाडकी शकुंतला, सासुऱ्यास चालली" हे बाबूजींचं गाणं आजही मनात काहूर माजवतं. विवाहानंतर बाबूजींच्या गाण्यांची सोबत अजून गहिरी झाली. लग्नानंतरच आयुष्य आपल्याला कल्पनेच्या जगातून ओढून व्यवहाराच्या अधिक जवळ नेत असलं तरीही त्यातही एक सुंदर भावविश्व असतं आणि तेच आपल्या रुक्ष-धावपळीच्या आयुष्याला जीवनरस पुरवत असतं, हे बाबूजींच्या युगुलगीतांनी दाखवलं. आयुष्यात नव्याने प्रवेश केलेल्या जोडीदारालाही "नवीन आज चंद्रमा", "चंद्र आहे साक्षीला", "धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना" आवडतंय असं जर कुणी म्हणलं तर एकदम जार जुळलीच म्हणून समजायचे. त्यातही त्याने "रुपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणांना" आणि " जे वेड मजला लागते-तुजलाही ते लागेल का...? असं थेट म्हणल्यावर मग काय दुधात सारखच ‍‍! मग हळुहळू "रात्र चांदणी गंध चंदनी","या मिलनी रात्र ही रंगली" किंवा "धुंद एकांत हा" अशा गाण्यांच्या सोबतीनं जगण्याची खुमारी वाढत गेली. "चांदणी रात्र, गहिरा एकांत, पावसाची सर, आकाशातून डोकावणारा चंद्र आणि एकमेकांत समरस झालेले, उत्कट प्रेमाने भारलेले दोन जीव यावर "चांदण्यात चालूदे मंद नाव नाविका... तरंगती जळावरी संथ चंद्र चंद्रिका" यासारखी एकापेक्षा एक सरस गाणी बाबूजींनी तयार केली. आपल्या टीचभर खोलीत, गरगरणाऱ्या पंख्याखाली, दिवसभराच्या श्रमामं डोळे उघडण्याचंही त्राण अंगात नसतानाही एखाद्या जोडप्यानं "पावसात नाहती लता लता कळ्या, फुले, सुगंध धुंद रात्र ही-आज राज्य आपुले" हे बाबूजी-आशाताईंचं मधाळ गीत फक्त डोळे मिटून ऐकावं. जागेपणीसुद्धा स्वप्नात असल्यासारखी कल्पनेनंच त्या राज्यातली धुंदी अनुभवायला देण्याची जादू या गीतांमध्ये आहे.
 
पण हळुहळू संसाराच्या मार्गक्रमणतेत "तोच चंदमा नभात, सारी जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे, मीही तोच तीच तूही, प्रीती आज ती कुठे? असा टप्पाही कधीतरी अनिवार्यपणे येतोच. पण त्याहीवेळा "को हो धरिला मजवरी राग ? उपयोगी पडतं. किंवा का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला ? " हे गाणं अशा निरगाठी सोडवण्याची हळुवार रीतच सांगून जातं. ती जावघेणी दुराव्याची रात्र संपते अन् सकाळी "फिटे अंधाराचे जाळे- झाले मोकळे आकाश", आपल्या स्वच्छ, आश्वासक आवाजांनी बाबूजी व आशाबाई खरेच "क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास " असा मूड पालटवून टाकतात.... "मग तुझ्या-माझ्या संसाराला आणि काय हवं ?" सुरु होतंच. " असंल तो कुणावाणी... कसा गं दिसंल, तुझ्या माझ्या जिवाचा त्यो आरसा असंल... दिस जातील, दिस येतील..." या कल्पनाराज्यात आता जोडीनं रमणं चालू होतं.
 
संसार म्हटला का "घर" हवंच. "त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे" या गाण्यानं घराचं "ब्ल्यू प्रिंटच" तयार दिलेलं अन् "अंगणात गारवेल वाऱ्यावर हळु डुलेल" असंच आपलं घर असावं असं वाटे. त्या मानाने "ते माझे घर जगावेगळे असेल सुंदर" या गाण्यातल्या घराचं "बजेट" जरा जास्त होतं कारण "संगमरवरी ती पुष्करणी, त्यात असावे गुलाबपाणी" म्हणजे फारच झालं ! पण आपल्या साध्याश्या घरात, रुटीनमध्ये कंटाळा आला म्हणून ४-७ दिवस बाहेर गेलं की, त्या घराची आठवण यायला लागते, मग "आलो एकदाचे आपल्या घरी" म्हणून घरात यावं तर "Home...Sweet...Home" म्हणत बाबूजी स्वागताला हजरच आहेतच ! पण सहजीवनाचं खरं गांभीर्य समजलं तेही पुन्हा त्यांच्याच गाण्यातून, "कधी भांडलोही, थोडे थोडे दुरावलोही, पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही - रुजले कधी न बीज दोघांत संशयाचे - घर दोघांचे... घरकुल पाखरांचे..." या गाण्यानं घरकुलाचा पाया एकदम पक्का केला.
 
कितीतरी गाणी अशीही आहेत की, या गाण्यांच्या आधारानंच त्या काठीण काळातून बाहेर पडलो असं आता वाटतं. आयुष्याच्या वाटचालीत काधीतरी एखादा घाव खोल बसतो अन् "लळा जिव्हाळा शब्दच खोटे, कुणी कुणाचे नाही राजा" या गाण्यातून हे पटतं आणि "हा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला" या गीतातून स्त्रवणारी बाबूजींच्या आवाजातून भिडणारी आर्त वेदना जवळची वाटते. पेल्यामागून पेले रिचवावेत तशी पुन्हा पु्हा ही गाणी मनात वागत राहतात. "चल सोडून हा देश पक्षिणी" पासून ते "संपली कहाणी माझी संपली कहाणी" इतक्या टोकाला मन येऊन बसते. अशा वेळीही पुन्हा हात द्यायला धावून येतातच बाबूजींची गाणी. "एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे" म्हणत तो स्वर आपली समजूत काढतो. आपण एकटेच असे नाही तर "कुणी न येथे भला चांगला - तो तो पथ चुकलेला - जग हे बंदीशाळा" असंही सांगून पाहतो. आपण तरीही बाहेर पडत नाही म्हणल्यावर "मनुष्य तू बडा महान है भूल मत" म्हणून आपला आत्मविश्वास जागवतात अन् मग "जा शोध ना किनारा" अशी आज्ञा सोडतात.
 
"आकाशी झेप घेरे पाखरा" म्हणतानाच "कष्टाविन फळ ना मिळते" हे सांगायला विसरत नाहीत. "ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे नाचत नाचत गावे... आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्यापायी त्या त्यागाच्या संतोषाला जगी या उपमा नाही" अशा उदात्त आनंदाची ओळखही तेच करुन देतात. "वसे श्रमात श्रीमंती-श्रम माणसाच्या हाती" असं सोपं सूत्र सांगून टाकतात. जाता-जाता लताबाईंच्या नाजूक आवाजात हळूच "सुख देवासी मागावे - दुःख देवाला सांगावे" असं समजावून आपल्याला "त्या"च्यापुढे नतमस्तक व्हायला लावतात. मग हळुहळू आपल्याही मनाची कळ उमलते अन् मग "या सुखांनो या, अंगणी प्राजक्त व्हा" असं आपल्या दारी फुलण्यासाठी आपणही आनंदाला आमंत्रण देतो. मतही आता आशावादी होऊन "लहरेन मी, बहरेन मी" म्हणत "एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेम मी" इतक्या स्थित्यंतरासाठी सिद्ध होतं !
 
समाजात वावरताना माणूस नावाच्या प्राण्याचे उफराटे उद्योग पाहून कपाळाला हात लावण्याची वेळ अनेकदा येते. "लहरी राजा- प्रजा आंधळी - अधांतरी दरबार - अजब तुझे सरकार, उद्धवा !" हे तर रोजच पाहतो आपण. अशावेळी आपण सामान्य माणसानं कसं वागावं-जगावं काही कळत नाही. पण बाबूजींनी एक साधी सोपी रित सांगितलेली असते. फार हिशेब मांडत बसूच नका. जगणं सोपं करा - "हाती नाही येणे हाती नाही जाणे- हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे" अत्यंत अडचणीच्या वेळी माणसाला शेवटी देवच आठवतो. पण "देव" या संकल्पनेची उत्तम जाणही बाबूजींच्या गीतांनी दिली. देवत्व म्हणजे माणूसपणा जपणं, माणूसपणा जपणं म्हणजे दुसऱ्यातही देव पाहता येणं - आनंदाने कष्ट करत करत हसत आयुष्याला सामोरं जाणं - देव कुठे आहे? कुठे नाही? "नसे राऊळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी", "देव देव्हाऱ्यात नाही- देव नाही देवालयी" आणि असलाच तरी "मंदिरात अंतरात तोच नांदताहे- नाना रुपी नाना देही उभा देव आहे" अशी समजूत दिली. आपल्या निजी आयुष्यातही हे तत्वज्ञान जगणारे व गळ्यातल्या सुराइतकेच मनातल्या प्रखर राष्ट्रभक्तीला जपणारे बाबूजी म्हणूनच जास्त जवळचे वाटतात. "मानवतेचे मंदिर माझे त्यात लावल्या ज्ञानज्योती" म्हणून "श्रमिक हो घ्या इथे विश्रांती" म्हणून घाम गाळणाऱ्या श्रमिकाला सन्मानाने पुकारणारे बाबूजी मग केवळ पांढरपेशांचे उरत नाहीत.
 
"छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव - खाई दैवाचं तडाखं त्यास मानूस ह्ये नाव" असं तेच तत्वज्ञान अस्सल ग्रामीण बोलीत ऐकवतात. "अगा इट्टला पांडुरंगा होई जागा" म्हणून त्याला हाकारतात "आन द्येवा तुला द्या येईना कशी?" असं आर्जवपणे विचारतात. विठ्ठलभक्ती हा महाराष्ट्राचा स्थायीभाव. त्या सावळ्या विठ्ठलावर कितीतरी रचना झाल्यात. सर्वच सुंदर आहेत, पण पंढरपूरला प्रत्यक्ष जाण्यापूर्वी "समचरण सुंदर | कासे ल्याला पीतांबर | आनाभिया माया रुळति | मुख्य त्यात वैजयंती |" या गीतातून बाबूजींच्या समईसारख्या शांत, तेजाळ आवाजातून जे रुप उभं राहिलं, ते प्रत्यक्ष पाहतानाही हे गाणं आठवलं की, होय, असंच रुप त्या गाण्यानं दाखवलं होतं आणि त्याची रुपं तरी किती ! जनाबाईंसारख्या संतानी विठ्ठलाला विठाबाई म्हटलं आणि आशाबाईंनी तरी "ये गं ये गं विठाबाई" म्हणत किती लाडिक, आर्जवी सुरात पुकारलंय ! "फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार -विठ्ठला तू वेडा कुंभार" असंही आपण त्याला म्हटलं आणि त्याच्या या वर्णनांनी भुलून त्याच्या दर्शनाला जावं तर तिथं वेगळीच तऱ्हा ! मग "पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा - पातितपावन न होसी म्हणुनी जातो माघारा" असं म्हणायची वेळ आली. "ऊठ ऊठ पंढरीनाथा, ऊठ बा मुकुंदा, ऊठ पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा" अशा विविध नावांनी त्याला हाकारलं तरी तो आपल्याकडे पाहिना म्हणल्यावर मात्र "जगाच्या पाठीवर" कुठेच झाला नसेल असा सौदा झाला आणि चक्क "चक्क बाई मी विकत घेतला शाम !" पण त्यासाठी 'जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम' एवढी किंमत मोजावी लागली. पण एकदा ही किंमत मोजलीत की, 'नाचनाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला.' हे त्याला हक्कानं सांगावं इतका तो तुमचा होतो. खरचं, बाबूजी नसते तर ही अतीव सुंदर अक्षरलेणी स्वरांचा प्राण फुंकून कुणी जिवंत केली असती?
 
 
मला तरी या सर्व गाण्यांमधून बाबूजीच आपल्याला मार्ग दाखवतात, सोबत करतात. आनंद लुटायला अन् वाटायला दोन्हीही शिकवतात. असं वाटतं. पण हे वाटणं नुसतं वैयक्तिक नक्कीच नाही अन् अजूनही?
 
 
तारखेला बाबूजींनी केलेले किशोरदांच्या प्रसन्न आवाजातलं 'दिन है सुहाना, आज पहिली तारीख है' रेडीओवर वाजतं. दिवाळीच्या रात्री शांतपणे तेवणाऱ्या पणत्यांच्या ज्योतिर्मय दर्शनाने भारावताना मनात आपोआप 'ज्योतिकलश छलके' येतंच ना? रेडिओला श्रावण महिन्यात 'चल ग सये वारुळाला', एका फुलाच्या चार पाकळ्या पूजिती मंगळागौर', 'चला सख्यांनो हलक्या हाते नखानखावर रंग भरा' ऐकायला मिळतं. गौरीगणपती 'रुणझुणत्या पाखरा... आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा' तर रक्षाबंधनाच्या दिवशी 'धागा जुळला जीव फुलला, वेड्या बहिणीला भाऊ मिळाला' हे गीत लागतं. गुरुवारी हमखास 'गुरुविण कोण दाखविल वाट' तर नवरात्रात 'आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई' अगदी हवंच. बाबूजींच्या आवाजात 'ओम णमो अरिहंताणं' आणि 'ओम नमो तथागता नामोस्तु गौतमा' ऐकल्यावर या दोन्ही प्रवाहांबद्दल एका आत्मीय धागा आपोआप जोडला गेला आहे.
 
बाबूजींची मराठी चित्रपटसंगीत वगळताही इतर कारकीर्द खूपच मोठी आहे. अन त्यातल्या काही गाण्यांच्या उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. 'मधु मागसी माझ्या सख्या परी' याचा पं. नरेंद्र शर्मानी केलेला अनुवाद 'म धु माँग न मेरे मधुर मीत मधु के दिन मेरे गये बीत' स्वरबद्ध करून बाबुजींनी इतक्या तन्मयतेने आणि रसपूर्णतेने गायलेय की तो ऐकल्यावर पैलतीरी जायला परवानगीच नाही! तसचं 'बांध प्रीत फूल डोर मन लेके चित्तचोर दूर जाना ना' हे गीत. हिंदी भाषा, बाबूजींचं संगीत व दीदींचा स्वर असं गोडवा त्रिगुणीत झालेलं हे अवीट गोडचं गीत, कितीदा ऐकलं तरी मन भरत नाही असं बाबूजींच्या गाण्याचं हे देणं दोन्ही हातांनी मोजून संपत नाही. त्यांच्या शेवटच्या चित्रपटातलं 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' हे गाणे ऐकताना अंगावर काटा येतो. स्वत: सावरकरभक्त असलेल्या बाबूजींनी त्या प्रखर देशभक्त कवीची तळमळ आतून जाणून घेतली होती. खरंच बाबूजींची गाणी हा घराघरातून पुढल्या पिढीकडे सोपवण्याचा अमूल्य सांगितिक वारसा अआहे. मागील तीन पिढ्यांना जोडत आलेला हा धागा पुढल्या पिढ्यांनाही समृद्ध करत राहील यात शंका नाही. त्यांच्या जाणिवा विस्तारण्यासाठी, त्यांच्याही सुख-दु:खांनासोबत करण्यासाठी बाबूजींचा स्वर त्यांच्यासोबत कायम असेल. या विचारांनीच खूप आश्वस्त वाटतं!
 
 
 
- विनिता तेलंग  
 
@@AUTHORINFO_V1@@