संत चोखोबा अध्यासन केंद्राच्या निमित्ताने....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |





 

 

संत चोखोबांचा जेथे जेथे उल्लेख येतो, तेथे तेथे हिंदू धर्मातील ‘महार’ या अस्पृश्य आणि हीन समजल्या जाणाऱ्या जातीत त्यांचा जन्म झाला, असे सांगण्यात येते. चोखोबांच्या काळातही जेव्हा समाजाने त्यांना हीच गोष्ट सांगितली होती तेव्हा चोखोबा म्हणाले होते

 

करुणासागर संत चोखामेळा यांच्या निर्वाणाला ६८० वर्षे लोटूनही अद्याप त्यांचे समाजप्रबोधनपर अभंग साहित्य त्यांच्या जीवनकाळाइतकेच उपेक्षित राहिलेले आहे, हे आपल्याला जाणवते. वारकरी संप्रदायातील आघाडीच्या संतांच्या मांदियाळीतील हा महापुरुष. अन्य संतांप्रमाणेच क्रांतिकारी विचार यांनीही मांडले, पण अन्य संतांच्या तुलनेत चोखोबांनाच अन्याय-अत्याचाराच्या झळा जास्त प्रमाणात सोसाव्या लागल्या होत्या. याला कारण म्हणजे त्यांचा तथाकथित अस्पृश्य जातीतील जन्म होय. समाजाच्या संकुचितपणाच्या, हीन भावनेच्या होरपळून टाकणार्या झळा बसत असतानाही चोखोबांनी आपली वेदना व्यक्त करणार्या विद्रोही रचनांना विद्वेषाचा वारा लागू दिला नाही. समाजात क्रांतीचा आगडोंब माजविण्यापेक्षा संत चोखोबा समाजाला समन्वयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारे आधारवड ठरले आहेत.

 

“मी जरी अशुद्ध जातीचा असलो तरी माझा भक्तिभाव अशुद्ध नाही. अहो, ऊस हा वाकडातिकडा असला तरी त्याचा रस वाकडातिकडा असतो का? नदी वाकडीतिकडी वाहत जाते म्हणून तिचे पाणी वाकडेतिकडे असते का? त्यामुळे मला तुम्ही वेडावाकडा म्हणू शकता, पण माझ्या भक्तिभावास तुम्हाला नावे ठेवता येणार नाहीत. मला तुम्ही हिणवू शकाल, पण माझ्या भक्तिभावाला तुम्ही हिणवू शकणार नाही. माझा भाव वेडावाकडा नाही. तो अगदी बावनकशी सुवर्णच आहे.”

 

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।

काय भुललासी वरलीया रंगा ॥

कमान डोंगी परी तर नोहे डोंगा ।

काय भुललासी वरलीया रंगा ॥

नदी डोंगी पर जळे नव्हे डोंगे ।

काय भुललासी वरलीया रंगा ॥

चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।

काय भुललासी वरलीया रंगा ॥

 

वस्तुतः ज्यांचे अंतःकरण शुद्ध नाही त्यांनीच मनुष्यमात्रांमध्ये उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्पृश्यास्पृश्य असा भेदभाव केला आहे आणि समाजाचे विभाजन करून त्यांच्यात भेदभावाच्या भिंती उभारल्या आहेत. ज्यांचे अंतःकरण चोख आणि निर्मळ आहे, त्यांनी मात्र अशा कृत्रिम भेदभावाच्या भिंती पाडून ‘अवघा रंग एक झाला’ असे म्हणत सर्व समाजाला एकाच भक्तिरंगात न्हाऊ घातले आहे. हा रंग विशुद्ध भक्तीचा आहे. त्यामुळे ‘भाव नोहे डोंगा’ हे तीन शब्द संत चोखामेळा यांच्या जीवनाचे सार आहेत. आपण संत चोखामेळा यांचे जीवनचरित्र पाहिले तर त्यावर चमत्कारांचा प्रभाव दिसतो, पण एका उपेक्षित आणि अस्पृष्य मानल्या गेलेल्या समाजात जन्म घेऊनही खरोखरीच ‘अभंग’ ठरलेली साहित्यरचना निर्माण करणे हाच त्यांच्या आयुष्यातील महान चमत्कार होय. संत चोखामेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचा पूर्ण परिवार हा संत परिवार होता. संत सोयराबाई, संत कर्ममेळा हे यांच्या घरातील संत तर यांची बहीण निर्मळा व मेव्हणा बंका हे संतच होते.

 

चोखोबा अशिक्षित असल्यामुळे उच्च कोटीतील सृजनशीलता असूनही त्यांचे फारसे साहित्य आज तरी उपलब्ध नाही. ३४९ च्या आसपास त्यांचे अभंग आज उपलब्ध आहेत. त्यांच्या या साहित्यकृतीवर संशोधनपर कार्य होणे गरजेचे आहे. हे अभंग मंगळवेढा गावातील ब्राह्मण परिवारातील अनंत भट यांनी संग्रही ठेवले. त्यांच्या परोपकारी भावनेमुळेच चोखोबांचे समतावादी, मानवतावादी साहित्य आपल्याला गवसले आहे. येणारी पिढी त्यांची सदैव ॠणी राहील. वारकरी संप्रदायातील उच्च नैतिक मूल्ये व आदर्श हेच आमची प्रेरणा आहेत. भीमा-कोरेगावसारखी दुर्दैवी घटना घडल्यानंतर समाजातील सामाजिक सौहार्द जपण्यासाठी ‘चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची’ ही संकल्पना सुचली. याकाळात रवींद्र गोळे, सिद्धराम पाटील यांनी चोखोबांच्या साहित्यकृतीचा तौलनिक अभ्यास केला. या वारीच्या प्रस्थान कार्यक्रमात चोखोबांची समतेची पताका आमच्या हाती दिली असता आम्हाला गहिवरून आले आणि चोखोबांच्या विचारांची ही पताका आयुष्यभर फडकत ठेवण्याचा निश्चय झाला. संत चोखामेळा अध्यासन केंद्राचा जन्म याच निश्चयातून झाला आहे. चोखोबाच्या साहित्याचे संवर्धन करण्यासाठी त्याचे संकलन, संपादन आणि पुनर्प्रकाशन करणे, संत चोखोबा आणि अन्य समकालीन संतसाहित्याचा तौलनिक अभ्यास करून वर्षभरात किमान दोन पुस्तकांचे प्रकाशन करणे, संत चोखोबांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी झटणाऱ्या महानुभावांना जीवनगौरव पुरस्कार देणे, याच विचारांच्या प्रसारार्थ परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि कीर्तन-सप्ताहांचे आयोजन करणे ही या केंद्राची प्रमुख कार्ये आहेत. तसेच ४० वर्षांपासून प्रलंबित मागणी पूर्ण होऊन संत चोखोबांच्या स्मारकाचा विकास, हेच त्यांना खरेखुरे अभिवादन ठरणार आहे.

 

 


 

 
आज उद्घाटन सोहळा

संत चोखामेळा अध्यासन केंद्राचा उद्घाटन सोहळा आज, शुक्रवार, दि. २७ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे सायंकाळी ५ वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक व संत साहित्य संमेलनाध्यक्ष अभय टिळक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. ह.भ.प शिवाजीराव मोरे महाराज देहुकर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. ज्येष्ठ विचारवंत शेषाद्री (अण्णा) डांगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वायुपुत्र नारायणराव जगदाळे (बाबा) हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहतील. संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा प्रा. उल्काताई चंदनशिवे आणि चोखाबा ते तुकोबा एक वारी समतेची व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. एस. काटे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल.

-दीपक जेवणे

@@AUTHORINFO_V1@@