मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |

मराठा समाजाला न्याय मिळावा, सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

 
 
 
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मराठा समाजाला तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारमधील जबाबदार व्यक्तींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावे अशी मागणी राष्ट्रवादी कांँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. लोकसभेत आज शून्य प्रहरात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे सुळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रात शांततापूर्ण मार्गाने मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याची पूर्तता झाली नसल्याची खंत सुळे यांनी व्यक्त केली.
 
 
 
दोन दिवसांपूर्वी काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने आरक्षणाच्या मागणीकरता जलसमाधी घेतली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुंबई, नगर, नाशिक असे राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलन छेडले गेले आहे, बंद पुकारला गेला आहे, याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. सर्वसामान्यांना काहीही त्रास सहन करावा लागणार नाही यांची काळजी या आंदोलनादरम्यान घेतली जात आहे. मात्र सरकारतर्फे याकडे अधिक गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 
 
सरकारकडून याबाबतीत संवाद व्हावा, जबाबदारीने प्रश्न सोडवला जावा, एवढीच समाजाची अपेक्षा आहे. परंतु, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे गैरसमज वाढत असल्याची टीका सुळे यांनी केली. धनगर, मराठा या दोन्ही समाजांना आरक्षण देण्याचे भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केले असल्याची बाब लक्षात आणून देत या समाजांना न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी लोकसभेत केली. तसेच, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी अशी विनंतीही सुळे यांनी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@