मराठ्यांचा ठोक मोर्चा ; मुंबईसह राज्यात चक्काजाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |
 


 

मुंबई : वारंवार मागणी करून देखील मराठा आरक्षणासंबंधी कसलीही ठोस पाऊले उचलली जात नसल्यामुळे मराठा समाजाकडून ठोक मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात सर्वत्र मराठा समाजाकडून बंद आणि ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले असून या आंदोलनामुळे राज्यात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


औरंगाबादमधील काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मराठा समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. संपूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तसेच रस्ते आणि रेल्वे मार्ग देखील अडवले जात आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यामध्ये रेल्वे मार्ग अडवल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी या आंदोलना हिंसक वळण देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात तोडफोड आणि हिंसक कारवाया जमावाकडून करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर देखील निदर्शने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यासमोर देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरुण जमा झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी समस्त मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात मराठा युवक बंगल्याबाहेर जमा झाल्यामुळे सध्या  वर्षाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे.  तसेच मुंबईतील  भाजप कार्यालयाबाहेर देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.


याचबरोबर राज्यातील प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये देखील हे आंदोलन तीव्र होऊ लागले आहे. ठिकठिकाणी मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात ठोक मोर्चे आयोजित करण्यात आले आहे. दुकाने, वाहने आणि लहान मुलांच्या शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. साताऱ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आज एकवटला आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजवाड्यासमोरून आज सकाळी मोर्चाला सुरुवात झाली असून सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन मांडण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@