एसटीची साडेसाती संपेना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |



गाजावाजा केलेल्या ‘शिवशाही’वर जप्तीची नामुष्की !

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी महामंडळाची साडेसाती काही केल्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. एसटीचा कायापालट करू, अशा बाता मारत महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेली बस म्हणजे शिवशाही. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दारात वातानुकुलीत प्रवास करता येणाऱ्या शिवशाही बसचा एसटीने चांगलाच गाजावाजा केला. मात्र, एवढे कौतुक झालेल्या या शिवशाहीवर सध्या चक्क जप्तीची नामुष्की ओढवली आहे.

 

मुळात, या शिवशाही बसेस एसटी महामंडळाच्या मालकीच्या नसून एका खासगी कंपनीच्या आहेत. या कंपनीने काही शिवशाही बसचे हप्तेच न भरल्यामुळे त्यातील १० बसची जप्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. २७ एप्रिल रोजीच जप्तीचे आदेश देण्यात आले होते. कोकणातरत्नागिरीच्या एसटी आगारात अशा २ बस असून त्या जप्त करण्यासाठी संबंधित वित्तीय कंपनीचे अधिकारी रत्नागिरीत पोहोचलेही होते. मात्र, रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी कंपनीशी त्यांचे बोलणे करून दिल्यानंतर कंपनीने थकीत रक्कम येत्या २ ते ३ दिवसांत भरण्याचे मान्य केले, आणि तात्पुरती का होईना, या लाडावलेल्या शिवशाही बसची बेअब्रू होता होता वाचली. राज्याच्या प्रत्येक एसटी विभागात अशा शेकडो शिवशाहीआहेत. या सर्वच बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून वादात भोवऱ्यात सापडल्या आहेत. अपघात तसेच बसचालकांचे पगार थकणे अशा या ना त्या कारणाने या शिवशाही बस चर्चेत राहिल्या आहेत. मात्र, आता तर थेट बसवर जप्तीची कारवाईच होऊ घातल्याने एसटी महामंडळ आणि संबंधित कंपनीच्या इभ्रतीचे पुरते वाभाडे निघत आहेत.

 

गुजरातमधील कंपनी असलेल्या रेन्बो टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्सच्या शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात आहेत. या बसवर हिंदूजा लेलँड फायनान्सचे कर्ज आहे. मात्र, काही महिन्यांपासून या बसेसचे हप्ते कंपनीने भरलेले नाहीत. एका बसचा जवळपास ९० हजार ते ९८ हजारांचा हप्ता आहे. असे एका बसचे जवळपास ७ लाख रुपये थकीत आहेत. त्यामुळे फायनान्स कंपनी कोर्टात गेली. त्यामुळे कोर्टाने अशा १० शिवशाही गाड्यांच्या जप्तीचे आदेश दिले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@