गणेशमूर्ती देखाव्यांना यंदा भालेकर मैदानावर बंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |


 

नाशिक: शहराच्या गणेशोत्सवाचा गाभा असणाऱ्या बी. डी. भालेकर मैदानावरील देखाव्यांना आता नाशिककरांना मुकावे लागणार आहे. कारण, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येथे देखाव्यांस परवानगी नाकारली आहे. उत्तराऐवजी उलट प्रश्न निर्माण करण्यात माहीर असणार्या आयुक्तांनी “या ठिकाणी ई-पार्किंगचे काम सुरू असून, पार्किंगच्या जागेत देखावे कसा उभारता येईल?,” असा प्रश्न आपल्या नेहमीच्या शैलीत मंडळांना विचारला आहे. काही मंडळांना तर तपोवनातील मोकळ्या जागेत उत्सव साजरा करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे वृत्त असून, त्यामुळे संतप्त झालेल्या मंडळांनी लोकप्रतिनिधींना साकडे घालण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या बी. डी. भालेकर मैदानावर महिंद्रा अँड महिंद्रा गणेशोत्सव मंडळ, एच.ए.एल. मंडळ, महिंद्रा सोना गणेशोत्सव, बॉश मंडळ, श्री राजे छत्रपती सामजिक मंडळ, श्री गणेश मूकबधिर मंडळ, श्री नरहरी राजा सामाजिक मंडळ आदी मंडळे गणेशोत्सवात देखावे साजरे करतात.
 

सीबीएससारख्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या देखाव्यांना पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून नागरिक येत असतात. महापालिकेच्या वतीने या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत वाहनतळाचे काम सुरू असून, त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, यासाठी श्रीगणेश मूकबधिर मित्रमंडळाच्या पदाधिकार्यांनी गेल्या आठवड्यात आयुक्तांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी वाहनतळाच्या जागेत देखावे उभारण्याऐवजी तपोवनात देखावे उभारण्याचा सल्ला दिल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. त्यावर गणेश बर्वे, सुनील भांडारे, हेमंत तेलंगी, गावंडे, देवेन हल्ली, सुशांत गालफाडे, विजय बिरारी यांनी आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. वाहनतळाच्या जागेत देखावे उभारता येणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे असून, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यकर्त्यांनी उपमहापौर प्रथमेश गिते यांची भेट घेतली असून त्यांनी या मंडळांच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कदाचित विघ्नहर्त्याच्या आगमनाप्रसंगी गणेश मंडळे आणि आयुक्त यांच्यात विघ्न येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नासंबंधी कार्यकर्ते महापौरांना भेटून आपले गार्हाणे मांडणार असल्याचे समजते.

@@AUTHORINFO_V1@@