नमन माझे गुरूराया..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |


 


जन्मदात्री माता, तिच्या मातृत्वाला काही अंशी मर्यादा आहेत. सद्गुरू माऊली अमर्याद, अलौकिक आहे. एखाद्या सावलीप्रमाणे ती शिष्याच्यासमवेत असते. त्यामुळेच सद्गुरू माऊलीला चिंतामणी, कल्पवृक्ष अशा उपमा अपुऱ्या ठरतात. स्थूल सृष्टीमध्ये अशी एकही गोष्ट नाही की, जी सद्गुरु माऊलीचं वर्णन चपखलपणानं करु शकेल! सूक्ष्म सृष्टीमध्ये सदैव संचार करून शिष्याला घडवणारी गुरूमाऊली! तिच्या प्रती कृतज्ञतेनं मन काठोकाठ भरुन येतं. तिनं केलेल्या अनंत उपकाराचं ऋण एका जन्मात फिटणं शक्यच नाही. त्यांनी दर्शविलेल्या उपासना मार्गावरुन निरंतर वाटचालं करणं आपल्या हातात आहे. कोणतीही कामना न ठेवता त्यांच्या सेवेत रत राहणं हे शिष्य करु शकतो. त्यांचा ज्ञानाचा लाभलेला वारसा पुढे चालवू शकतो.

 

आकाशात कृष्णमेघांची दाटी झालेली! कृष्णमेघांचं मन सद्गुरूंच्या स्फटीकासमान प्रेमानं भरून आलेलं! या मेघांना सद्गुरूंच्या पूजनाची अनिवार ओढ लागलेली! सद्गुरूंच्या सुंदर, सात्त्विक स्थानी कधी एकदा पोहचतो अशी भावावस्था! सदगुरु अखंड प्रेम देत राहतात. त्यांच्या इतकं अवघ्या ब्रह्मांडामध्ये, सृष्टीमध्ये प्रेमाचा अमृत पान्हा पाजून तृप्त करणारं कोणीही नाही. बरं एकाचं...चालू जन्मामध्ये देतात का? अनेक जन्म सद्गुरूंचं देणं चालूच असतं. परत ‘मी केल्याचा’ डंका न वाजवता, गाजावाजा न करता गुप्तपणानं उत्कट प्रेम देण्याचं कार्य अखंड चालू असतं. कलियुगामध्ये स्वार्थाने उच्चांक गाठलेला आहे. प्रत्येक गोष्ट स्वार्थाशिवाय कोणी करत नाही. सगळी नाती बेगडी, कृत्रिम आणि खोटी वाटावीत अशी वर्तवणूक सर्वत्र दिसून येते. अशा कलियुगामध्ये एकमेव सद्गुरू माऊली नि:स्वार्थ, निरलस, निस्पृह या तीन ’नि’युक्त प्रेम करते.

 

सद्गुरू माऊलीला आपल्या बालकाला, शिष्याला सर्वांगानं पुष्ट आणि परिपूर्ण करायचंअसतं. त्यासाठी अखंड धडपड चालू असते. दिवसरात्र एकच ध्यास असतो, तो म्हणजे ‘शिष्याला शहाणं करणं!’ लौकिकामधील संकटांपासून संरक्षित करणं! दु:खाच्या दरीमध्ये पडू न देता अलगदपणे सावरणं... सामाजिक विपरित परिस्थितीमध्ये खचू न देणं... निसर्गाच्या प्रकोपामधून सुखरुप बाहेर काढणं... क्रूर, कपटी वृत्तीपासून सुरक्षित ठेवणं! प्रपंचाच्या धडपडीत वृत्ती सैरभैर झाल्या तर त्या शांत करणं! षडरिपूंच्या मगर मिठीमधून बाहेर काढणं! अवघड, अशक्य वाटणार्या उपाय व उत्तर न मिळणार्या गोष्टी मिळवून देणं! जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही प्रेमळपणानं आणि हळूवारपणानं सांभाळणं!

 

जन्मदात्री माता, तिच्या मातृत्वाला काही अंशी मर्यादा आहेत. सद्गुरू माऊली अमर्याद, अलौकिक आहे. एखाद्या सावलीप्रमाणे ती शिष्याच्यासमवेत असते. त्यामुळेच सद्गुरू माऊलीला चिंतामणी, कल्पवृक्ष अशा उपमा अपुर्या ठरतात. स्थूल सृष्टीमध्ये अशी एकही गोष्ट नाही की, जी सद्गुरु माऊलीचं वर्णन चपखलपणानं करु शकेल! सूक्ष्म सृष्टीमध्ये सदैव संचार करून शिष्याला घडवणारी गुरूमाऊली! तिच्या प्रती कृतज्ञतेनं मन काठोकाठ भरुन येतं. तिनं केलेल्या अनंत उपकाराचं ऋण एका जन्मात फिटणं शक्यच नाही. त्यांनी दर्शविलेल्या उपासना मार्गावरुन निरंतर वाटचालं करणं आपल्या हातात आहे. कोणतीही कामना न ठेवता त्यांच्या सेवेत रत राहणं हे शिष्य करु शकतो. त्यांचा ज्ञानाचा लाभलेला वारसा पुढे चालवू शकतो.

 

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा ।

आम्ही चालवू हा पुढे वारसा ॥

 

गुरुपौर्णिमा ही शिष्याच्या हृदयात असते.वाटोळा, शांत, शीतल चंद्रमा हृदयाच्या आकाशात पूर्णपणानं विलसतो. या पौर्णिमेला सद्गुरू माऊलींच्या चरणी पूजन करून अर्पण करण्याची संधी शिष्याला मिळते. ती संधी शिष्य वाया कशी घालवेल? तो त्यांच्या चरणांवर ‘अवघं जीवन अर्पण’ करण्यासाठी प्रयत्न करतो. त्याला सद्गुरूचं पूजन म्हणजे देवपूजन किंवा त्याहीपेक्षा श्रेष्ठपूजन वाटतं. म्हणून शिष्य मन:पूर्वक म्हणतो-आळवतो,

 

माझी देवपूजा बा देवपूजा ।

पाय तुझे गुरूराया ॥

गुरूमाऊली, आपल्या पायाचं पूजन हीच माझी देवपूजा आहे. पुढे म्हणतो,

गुरूचरणाची माती ।

तेचि माझी भागीरथी।

गुरूचरणाचे ध्यान ।

तेचि माझे संध्यास्नान।

 

अशी शिष्याची भावावस्था होऊन जाते.सदैव सद्गुरूंच्या चरणाचं चिंतन होतं. त्याला गुरूमाऊली शिवाय चैन पडत नाही. प्रत्येक क्षणी सद्गुरूंचं स्मरण आणि चरणाचं ध्यान चालू असतं. संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणांना वाहिलेलं आहे. जीवनाचं पुष्प त्यांच्या चरणांवर अर्पण करणार्या शिष्याजवळ स्वत:च असं काहीच उरत नाही. हीच एकरुपता सद्गुरूंना भावते-आवडते. त्याला अन्य गोष्टी करण्याची इच्छा राहत नाही. वासना, कामना सद्गुरू पूजनामुळे नष्ट होतात. प्रत्येक कर्म सद्गुरू माऊलीच्या स्मरणामध्ये सुरू असतं. त्यामुळे कोणतीही कर्म बाधक ठरत नाहीत. इतर कोणतीही साधनं वापरून जे प्राप्त होणार नाही, ते सद्गुरूचरणांशी एकरुप झाल्यामुळे सहजपणानं प्राप्त होतं. इतक्या अफाट गोष्टी सद्गुरूंच्या सेवेने पूजनाने साध्य होतं, म्हणून ज्ञानदेव सांगतात,

 

श्रीगुरूसारिखा असता पाठीराखा। इतरांचा लेखा कोण करी ॥

 

इतर कोणाची कशाला आस धरायची? कारण श्रीगुरू-सद्गुरू सदैव पाठराखण करत असताना इतर कोणाची आवश्यकताच नाही. पुढे निवृत्तीनाथांसारखे सद्गुरू लाभलेले संत ज्ञानेश्वर सांगतात-

ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो।

साच उद्धरिलो गुरूकृपे॥

 

आपल्या सद्गुरूंचं श्रेष्ठत्व विनम्र भावाने सांगतात. निवृत्तीनाथांनी कृपेचा वर्षाव केला, त्यामुळे मी उद्धरुन गेलो. संपूर्ण संतांची माऊली झालेल्या ज्ञानदेवांची अनुभूती महत्त्वपूर्ण ठरते.

संत तुकाराम महाराजांची अवस्था आगळी वेगळी आहे. ते ठामपणानं सांगतात-

सद्गुरूवांचोनि सापडेना सोय ।

धरावे ते पाय आधी आधी ॥

 

शारीरिक व्याधींनी देहावर हल्ला करण्याआधी सद्गुरूंचे पाय धरावेत. मनाला व्याधींनी ग्रासून टाकण्याआधी सद्गुरूंचे चरण घट्ट धरावेत. त्यांच्याशिवाय अंतर्बाह्य सर्वप्रकारची सोय, उपाय करणारे कोणीही नाहीत. सद्गुरू माऊलींचं श्रेष्ठत्व कथन करताना तुकाराम महाराज सांगतात-

 

सकळ देवांचे दैवत ।

सद्गुरूनाथ एकला।

राम केला ब्रह्मज्ञानी ।

वसिष्ठ मुनी तारक।

कृष्ण गुरू सांदीपन ।

परब्रह्म दावियले ।

 

प्रभू श्रीरामांना वसिष्ठ मुनींनी तारलं. भगवान श्रीकृष्णाने पूर्णावतारी असूनही सांदिपनी मुनींना सद्गुरू म्हणून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. त्याची सेवा केली. त्यांनी दिलेली विद्या ग्रहण केली. तेव्हा सांदिपनी सद्गुरूंनी परब्रह्माची प्राप्ती भगवान श्रीकृष्णाला करून दिली. सद्गुरूंची सेवा सकल अवतारांमध्ये भगवंतानी देखील केली. मग आपल्यासारख्या सामान्यांनी तर सद्गुरूंप्रती समर्पण भाव ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

 

गुरूपौर्णिमेच्या शुभ दिनी प्रत्येक शिष्याने सद्गुरुंचं मनोभावे पूजन करावं. त्यापासून अलौकिक आनंदाचा ठेवा प्राप्त होतो. शिष्य सद्गुरूंप्रती निष्ठावंत असतो. ‘गुरूवाक्यप्रमाण’ या शुद्ध भावाने सेवा करतो. सद्गुरूंची प्रसन्नता सदैव लाभावी, ही अभिलाषा बाळगतो. त्यांची कृपा प्राप्त व्हावी, यासाठी सेवा करतो. एकदा सद्गुरूंची कृपा लाभली की, या संपूर्ण विश्वात अन्य मिळवण्यासारखं काहीही उरत नाही. जे जे हिताचं असतं ना, ते गुरू सगळं सगळं शिष्याला देतात. त्याची अवनती होऊ नये यासाठी हितकारक ते प्रदान करतात. समर्थ रामदास स्वामी सांगातात-

 

जेचि क्षणी अनुग्रह केला ।

तेचि क्षणी मोक्ष झाला॥

 

अशी शिष्याची अवस्था असावी. शिष्याने ज्ञान ग्रहण केलं की, तो मोक्ष प्राप्त करतो. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली. त्या सद्गुरूंच्या संदर्भात एकनाथ महाराज म्हणतात-

 

वर्णावी ती थोरी एका सद्गुरूची ।

येरा मानावाची कामा नये।

सद्गुरू कृपेचा सागर।

मनी वारंवार आठवावा।

सद्गुरूचरणी तल्लीन ही वृत्ती।

वृत्तीची निवृत्ती क्षणमात्रे।

एका जनार्दनी आठवी सद्गुरू ।

भवसिंधू पार पावलासे ॥

 

सद्गुरूंची थोरवी, महती, कार्य, कृपा याची वारंवार आठवण करावी. सद्गुरू चरणी तल्लीन झालं की, वृत्तीची क्षणात निवृत्ती होते. सद्गुरू स्मरणात केवढे सामर्थ्य आहे की, माऊली भवसिंधू पार करुन नेते. सद्गुरू माऊलीचं गुरुपौर्णिमेला पूजन म्हणजे त्याचं कार्य स्वतः करुन अनेकांना या मार्गावर कार्यविस्तारासाठी आणणं! त्यांनी दिलेला ज्ञानरुपी वसा निरंतर चालवण्याचा प्रांजळ प्रयत्न म्हणजे सद्गुरूपूजन होय. काया-वाचा-मन गुरूंशी एकरुप होऊन सेवा करताना जीवनपुष्प त्यांच्या चरणांवर अर्पण करणं, हेच खरं गुरूपूजन.

 

-कौमुदी गोडबोले

@@AUTHORINFO_V1@@