जनस्वभाव गोसावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |


 


उद्या गुरुपौर्णिमा. गुरुला वंदन करण्याचा, त्यांचे ऋण मानण्याचा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा दिवस. पण, हल्लीच्या काळात कुणाला गुरु मानावे, याचेच भान कुठे तरी समाजात हरवलेले दिसते. आज ज्याप्रमाणे भोंदू गुरूंचा अध्यात्मक्षेत्रात मुक्त वावर दिसून येतो, तसा समर्थकाळातही या भोंदू गुरूंचा सुळसुळाट झाला होता. तो पाहून रामदासांनी भोंदू गुरूंचे, गोसाव्यांचे वर्णन ‘जनस्वभाव गोसावी’ या सत्तर ओव्यांच्या प्रकरणात केले आहे. या प्रकरणाकडे फारसे कुणाचे लक्ष गेलेले दिसत नाही. आज प्रसारमाध्यमे देशाच्या कानाकोपर्यात पोहोचली आहेत. त्यामुळे या भोंदू बाबांची प्रकरणे आपण रोज वाचतो. टीव्हीवर पाहतो आणि ऐकतो. काही भोंदू बाबा कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने तुरुंगात गजाआड शिक्षा भोगत आहेत, तर काही तुरुंगाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. लोकांच्या श्रद्धांचा (किंवा अंधश्रद्धांचा) फायदा घेऊन ते भाविकांना फसवत आहेत. अजूनही बरेच ढोंगी बाबा, माँ बिनदिक्कत वावरत आहेत.

 

जनसामान्यांना रामदासांची वाड्मयीन ओळख म्हणजे त्यांचा ग्रंथराज दासबोध आणि मनाचे श्लोक. हे दोन्ही ग्रंथ लोकप्रिय आहेत. बर्याच मराठी भाषिकांच्या घरात दासबोध ग्रंथ असतो. जुन्या पिढीतील लोकांना आजही मनाच्या श्लोकांपैकी काही श्लोक मुखोद्गत आहेत. एकूण २०५ मनाचे श्लोक आहेत. ते भुजंगप्रयात वृत्तात लिहिलेले असल्यामुळे पाठ करायला सोपे आहेत. त्यातील भाषा सोपी आहे. दासबोध हा समर्थांचे तत्त्वज्ञान, प्रपंच विज्ञान, व्यवहार ज्ञान व राजकारण सांगणारा ग्रंथ आहे. परंतु, टीकाकारांमध्ये त्याविषयी वेगवेगळी मते आहेत. त्याचा आढावा नंतर घेता येईल. आज ज्याप्रमाणे भोंदू गुरूंचा अध्यात्मक्षेत्रात मुक्त वावर दिसून येतो, तसा समर्थकाळातही या भोंदू गुरूंचा सुळसुळाट झाला होता. तो पाहून रामदासांनी भोंदू गुरूंचे, गोसाव्यांचे वर्णन ‘जनस्वभाव गोसावी’ या सत्तर ओव्यांच्या प्रकरणात केले आहे. या प्रकरणाकडे फारसे कुणाचे लक्ष गेलेले दिसत नाही. परंतु असल्या भोंदू बाबां-बुवांची प्रकरणे आज आपण ऐकतो. त्यावरुन या प्रकरणाची आठवण झाली. आज प्रसारमाध्यमे देशाच्या कानाकोपर्यात पोहोचली आहेत. त्यामुळे या भोंदू बाबांची प्रकरणे आपण रोज वाचतो. टीव्हीवर पाहतो आणि ऐकतो. काही भोंदू बाबा कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने तुरुंगात गजाआड शिक्षा भोगत आहेत, तर काही तुरुंगाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. लोकांच्या श्रद्धांचा (किंवा अंधश्रद्धांचा) फायदा घेऊन ते भाविकांना फसवत आहेत. अजूनही बरेच ढोंगी बाबा, माँ बिनदिक्कत वावरत आहेत.

समर्थांनी तीर्थाटनात जे भोंदू साधू, भोंदू गुरू पाहिले, त्यांच्या भोंदूगिरीचे यथार्थ वर्णन या ‘जनस्वभाव गोसावी’ या प्रकरणात वाचायला मिळते. गुरूदेव रा. द. रानडे या संदर्भात लिहितात की, “रामदासांनी भोंदू गुरूंचे वर्णन अशा बहारीने केले आहे की, ते जर या भोंदू गुरूंनी मनात बाळगले, तर त्यांस भोंदूपणाच्या नवीन क्लृप्त्याच सुचायच्या नाहीत.“ (रामदास वचनामृत) रामदासांच्या मते, स्वानुभवा वाचून बोलणारे हे सर्व गुरू भोंदू आहेत. रामदास या प्रकरणाच्या सुरुवातीस सांगतात की, ”वेदशास्त्र करील काई। तथा मूर्खांसी ॥’ या भोंदूच्या ठिकाणी प्रत्ययाचे ज्ञान नाही. त्यामुळे तेच त्यांचे शत्रू झाले आहेत. तीर्थाटन काळात असे अनेक गोसावी, गुरू पाहून स्वामी उपरोधिकपणे म्हणतात-

 

जिकडे तिकडे ज्ञान झाले ।

उदंड गोसावी उतले॥

तयांचे संगती जाले । बाष्कळ प्राणी ॥

 

असल्या गुरूंचे शिष्य हेही मूर्खच आहेत. ते आपल्या भोंदू गुरूंवर स्तुतीसुमने उधळून एक प्रकारे त्यांची जाहिरात करीत आहेत व स्वत:चा मूर्खपणा प्रकट करीत आहेत. तसे पाहिले, तर हे गुरू म्हणजे भ्रष्ट, ओंगळ अनाचारी, कुकर्मी, अविचारी आहेत. त्यांना वेदशास्त्र- अध्यात्म माहीत नाही. ते माजलेल्या बोक्याप्रमाणे किंवा रेड्यासारखे आहेत. त्यांच्या ठिकाणी सर्व बाबतीत संशय आहे. प्रचितीचे ज्ञान त्यांच्याजवळ नाही. पण, ज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा मात्र ते मारतात. ते शुद्ध अज्ञानी आहेत. त्यांच्या शिष्यांना ते सांगतात की, देवतार्चन टाकून द्या. अशा रितीने ते धर्म-नीती बुडवत आहेत. तरीही शिष्यांना या गुरूंचे कौतुक आहे. ही नवलाची गोष्ट आहे.

कोणी म्हणतात, आमचा गुरू विष्ठेचा अंगिकार करतो. यावर समर्थ मिश्कीलपणे टिप्पणी करतात-

 

‘बरे जैसे जैसे मानले । तैसे तैसे घेतले।

तेथे आमुचे काय गेले । होईना कां ॥

 

थोडक्यात, या गुरूंना विष्ठेचा अंगिकार करणे मानवले, तर त्यात आमच्या बापाचे काय गेले! या नंतर रामदासांनी हे गुरू कसे कसे चमत्कार करतात ते सांगितले आहे. वस्तुत: हे चमत्कार वगैरे काही करत नसून, उगाच भोळ्या भाविकांना फसवून आपले महत्त्व वाढवीत आहेत.

कोणी म्हणतात, आमचा गुरू स्मशानात राहतो. त्याला अनेक कपट विद्या माहीत आहेत. त्याला मोहिनी विद्या वश आहे. कोणी म्हणतात, आमचा गुरू औषधी जाणतो. त्याच्या औषधीने नपुंसकसुद्धा वनितेचा भोग घेतो. तो मंत्राने साप, विंचवाचे विष उतरवतो. काही ऐकीव चमत्कारही ते आपल्या गुरूंच्या नावावर खपवतात.

 

व्याघ्रावरी नि:शंक । हाती सर्पाचा चाबूक ।

वाचले होते सहस्र । सामर्थ्य बळे ॥

 

हे चमत्कार चांगदेवांच्या नावावर आहेत. पण, भोंदू गुरू ते आपल्या नावावर सांगत आहेत. आता पुढील काही चमत्कार संत ज्ञानेश्वरांच्या नावावर आहेत, तेही या भोेंदूंनी स्वत:च्या नावावर सांगायला सुरुवात केलेली दिसते.

 

अचेतन चालवितो । मोठा ज्ञानी।

रेड्याकरवी वेद म्हणवती ॥

 

समर्थांना भोंदूगिरीची विलक्षण चीड आहे म्हणून ही ओवी ते कशी पूर्ण करतात पाहा-

 

गुरू भविष्य सांंगती । रेड्याकरवी वेद म्हणवती।

गधड्याकरवी पुराणे सांगती । सामर्थ्य बळे ॥

 

या भोंदूंचे शिष्य पुढे सांगतात, आमचा गुरू वाळलेल्या लाकडाला पाने आणतो.

 

वाळली काष्टे हिरवाळली । आंधळी डोळस जाली।

 

पांगुळे धावो लागली । चहूंकडे ॥

 

एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे की, ‘ मुकं करोति वाचालम् । पंगु लंघयते गिरीम् ।’ त्यावरुन हा चमत्कार घेतला असावा. आता वाळलेल्या काष्ठाला पाने फुटली, हा चमत्कार वाल्मिकींच्या नावावर आहे. हे दासबोधात सांगितले आहे.

 

वाल्मिके जेथे तप केले । ते वन पुण्यपावन जालें।

शुष्क काष्टी अंकुर फुटले । तपोबले जयाच्या॥

 

(दास. 16.1.10)

तसेच एके ठिकाणी भोंदू गुरू, ‘लोका देखता फुले करिती । मद्यमांसाची॥’ असे म्हटले आहे. मद्य मांसाची फुले होण्याचा चमत्कार मोरया गोसावी यांच्या नावावर आहे. आणखी एक मजेशीर चमत्कार त्यात वाचायला मिळाला. आमचा गुरू दगडाच्या नंदीला डाळी खाऊ घालतो. (मोजवून डाळी चारिती । पाषाणनंदी ॥ ) सुमारे २० -२५ वर्षांपूर्वी आपल्याकडे गणपतीची मूर्ती दूध पिते, ही अफवा देशभर पसरली होती. तसा हा प्रकार साडेतीनशे वर्षांपूर्वी रामदास स्वामी भोंदू गुरूंच्या संदर्भात सांगतात. थोडक्यात, हे भोंदू गुरू ज्या कथा ठिकठिकाणाहून ऐकत आहेत, त्यात चांगदेव, ज्ञानदेव ही महाराष्ट्रीयन संत मंडळी आहेत. त्यांच्या कथा हे भोंदू साधू स्वत:च्या नावावर सांगून भोळ्या भाविकांचे डोळे दीपवत आहेत. रामदास सांगतात, ”हे भोंदू अनुभवावाचून बोलणारे आहेत. त्यांना अध्यात्मविद्या पिंड ब्रह्मांड ज्ञान, तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान यांचे काडीचेही ज्ञान नाही. या लोकांच्यात काही अर्थ नाही. हे लक्षात ठेवा की, ज्याला अध्यात्मविद्या कळली, तोच खरा साधू.“ यावरुन अंधश्रद्धा निर्मुलनाची सुरुवात रामदास स्वामींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केली होती, असे म्हणायला हरकत नाही.

 
 
सुरेश जाखडी
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@