व्हॉट्सअॅपवर रेल्वेचे अपडेट्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018   
Total Views |


 

 

सध्याच्या काळात तंत्रज्ञानाच्या वापराने आपल्या सर्वांचेच जीवन सुसह्य झाल्याचे आपल्याला दिसते. पत्र, टेलिफोन, पेजर, मोबाईल आणि त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या आगमनाने तर संपर्कक्षेत्रात मोठाच बदल झाला. कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही वेळी मेसेज वा ऑडिओ-व्हिडिओ कॉलच्या साहाय्याने संवाद साधणे सहज सुलभ झाले. आता भारतीय रेल्वेनेदेखील व्हॉट्सअॅ्पचा वापर करण्याचे ठरवले असून त्याचा फायदा रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आज दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या जवळपास तीन कोटींपर्यंत आहे, शिवाय दररोज धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्याही १३ हजारांपेक्षा अधिक आहे. बऱ्याचदा आपल्याला असे दिसते, आपण त्याचा अनुभवही घेतो की, आपल्याला रेल्वेगाड्यांचे लाईव्ह स्टेटस कळत नाही. ते स्टेटस जाणून घेण्यासाठी एक तर नियंत्रण कक्षाला फोन करावा लागतो वा रेल्वेच्या अॅपचा वापर करावा लागतो वा इंटरनेवर रेल्वेच्या वेबसाईटवरून संबंधित रेल्वेची माहिती घ्यावी लागते. बऱ्याचदा हे काम वेळखाऊ ठरते. याचाच विचार करून भारतीय रेल्वेने आता रेल्वेगाड्यांचे लाईव्ह स्टेटस व्हॉट्सअॅपद्वारे देण्याचे जाहीर केले आहे. आता व्हॉट्सअॅपच्या वापराद्वारे प्रवाशांना रेल्वे उशिराने धावत असेल तर किती उशीर होईल, पुढील स्टेशन कोणते असेल, स्टेशनवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, अशा सर्वच गोष्टींची माहिती मिळणार आहे. रेल्वेने ही सेवा ‘मेक माय ट्रीप’ या वेबपोर्टलच्या जोडीने देणार असल्याचे सांगितले असून या सर्व प्रक्रियेसाठी एक व्हॉट्सअॅप क्रमांकही जारी केला आहे. ७३४९३८९१०४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर प्रवाशांना फक्त आपल्या रेल्वेगाडीचा क्रमांक मेसेज करावा लागेल, त्यानंतर काही सेकंदाच्या आतच संबंधित क्रमांकाच्या रेल्वे गाडीबाबतची सर्वच माहिती प्रवाशांच्या व्हॉट्सअॅपवर दिसेल, ज्याचा उपयोग प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होईल. तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य कसे होईल, यासाठी केला जावा, असे नेहमीच म्हटले जाते. सध्या देशभरात व्हॉट्सअॅपवरून फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसमुळे पसरविण्यात येणाऱ्या अफवा आणि त्यामुळे होणाऱ्या हिंसक घटना झाल्याचे आढळते. अशा काळात रेल्वेने व्हॉट्सअॅपचा वापर करत प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे.

 
 
काळ्या पैशाला ओहोटी... 
 
 

उठसूठ मोदी सरकारवर काळ्या पैशावरून टीका करणाऱ्या विरोधकांची आणि मित्रपक्षांची बोलती बंद करणारी माहिती नुकतीच स्वीस बँकेने दिली. विशेष म्हणजे भाजपच्या नेतृत्वातील रालोआ सरकारच्या काळात भारतीयांच्या काळ्या पैशात ८० टक्क्यांची घट झाल्याचेही बँकेने म्हटले. याशिवाय नॉन बँक लोनची रक्कम २०१६ च्या ८० कोटी डॉलर्सवरून २०१७ मध्ये ५२.४ कोटी डॉलर्सपर्यंत घसरली आहे, हे महत्त्वाचे. केंद्रातील मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासूनच काळ्या पैशाविरोधात तीव्र मोहीम उघडली. करचोरीचे जे जे मार्ग, पळवाटा होत्या त्या बंद करण्यासाठी जोमाने कार्यवाही केली. कर भरण्यातही सुलभता आणली, ज्यामुळे व्यापारी-व्यावसायिकांना करभरणा करणे सोपे झाले. परिणामी करसंकलनही वाढले. एका बाजूला कर भरण्याच्या पद्धती सहज करतानाच मोदी सरकारने ज्या क्षेत्रात काळा पैसा तयार होतो, त्या क्षेत्रातली छिद्रे बुजवण्यावर भर दिला. प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाचा, डिजिटलायझेशनचा वापर करत सर्वच गोष्टींच्या-व्यवहारांच्या खुणा कशा उमटतील, हे पाहिले. याचा परिणाम असा झाला की, जो कोणताही व्यवहार केला जाईल, त्याची माहिती संबंधित प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचू लागली. म्हणजेच कोणतीही गोष्ट वा व्यवहार लपून करायची सोय राहिली नाही. मोदी सरकारने केलेल्या या सर्वच उपाययोजना काळा पैसा रोखण्यात कमालीच्या यशस्वी ठरल्या. काळा पैसा निर्माण होण्याची पद्धत म्हणजे, करचोरी करणे, रिअल इस्टेट क्षेत्रातले व्यवहार, बनावट कंपन्या, बनावट खाती या होय. पण, केंद्र सरकारने त्यावरच अंकुश लावला. सुरुवाती सुरुवातीला या उपाययोजनांचा काळ्या पैशाच्या निर्मितीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी टीका विरोधकांकडून केली गेली. पण, आता विरोधकांची टीका किती चुकीच्या आणि फक्त द्वेषाच्या गृहितकांवर आधारलेली होती, हे लक्षात येते. अर्थात, मोदी सरकारच्या उपाययोजनांमुळे ज्यांची गोची झाली, त्यांनीच मोठ्या प्रमाणावर मोदींवर आणि भाजपवर टीकेचे वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता स्वीस बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार मोदी सरकारने केलेल्या उपाययोजना काळ्या पैशाच्या निर्मितीला प्रतिबंध घालण्यात यशस्वी ठरल्याचेच सिद्ध होते. शिवाय यामुळे विरोधकांच्या शाब्दिक वारांची धार पार बोथट झाल्याचेही स्पष्ट होते.

@@AUTHORINFO_V1@@