साहित्याच्या प्रांगणातला समाजशील दीपअप्पा जोशी प्रतिष्ठान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018   
Total Views |


 

‘मरावे परी कीर्तिरूपी उरावे’ या उक्तीला सार्थ करत अप्पा जोशी या व्यक्तीची नव्हे, तर त्या व्यक्तीच्या ध्येयवादी कार्याची गाथा म्हणजे ‘अप्पा जोशी प्रतिष्ठान’ म्हणू शकतो. पर्यावरण, साहित्य, समाजजीवन या विविध परीक्षेपासून माणसाच्या जीवनाचा वेध घेत, समस्यांना भेदत ‘अप्पा जोशी प्रतिष्ठान’ कार्यरत आहे.

साल १९५२ , आपल्या देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. मूलभूत हक्क आणि अधिकार यांच्या समन्वयासाठी कारवाईसाठी देश कामाला लागला होता. शिक्षणाला मुलभूत अधिकाराचा दर्जा मिळाला होता. त्याची व्याप्ती, पाळेमुळे खोलवर रूजवणे गरजेचे होते. ठाणे, बेलापूर पट्ट्यातही परिस्थिती वेगळी नव्हती. ‘वाघिणीचे दूध’ म्हणून बिरुदावली मिळालेले शिक्षण, या शिक्षणाचा प्रसार या पट्ट्यात होणे गरजेचे होते. त्या काळी अप्पा जोशींनी हे शिवधनुष्य आपल्या ताकदीनुसार पेलले. त्यांनी शाळा सुरू केली. अर्थात, शाळा सुरू केली तीच गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी. पण पालक आपल्या मुलांना शाळेत घालतील तर ना? ‘शाळा शिकून काय बॅरिस्टर होणार आहे? शेतीतचं घाम गाळायचा किंवा पिढीजात पारंपरिक कामं करायची आहेत’ ही मनोवृत्ती. त्यामुळे मुलांना शाळेत न घालता घरीच ठेवले जायचे. अशा वातावरणात पालकांना समजावणे फार कठीण. पण अप्पा जोशी घरोघरी जायचे. पालकांना भेटायचे. मुलांना शाळेत का घालावे, याचे प्रबोधन करायचे. जोपर्यंत पालक मुलांना शाळेत पाठवत नाहीत, तोपर्यंत पालकांचे प्रबोधन सुरूच ठेवायचे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवले की, त्यानंतर मग अप्पांचे दुसरे काम सुरू व्हायचे ते म्हणजे मुलांना शिक्षणाची गोडी कशी लागेल? त्यांना सकारात्मक यशस्वी आयुष्य जगण्याची प्रेरणा कशी मिळेल? यासाठी प्रयत्न करणे. या प्रयत्नांतून अप्पा जोशी यांनी त्या परिसरातील बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवला. पुढे काही काळ लोटला. अप्पांचे चिरंजीव आणि रा.स्व. संघाचे स्वयंसेवक नंदकिशोर जोशी यांना वाटू लागले की, अप्पा जोशींचे कार्य निरंतर सुरू राहायला हवे. विस्मृतीच्या पटलाआड ते कार्य जाऊ नये. हाच विचार नंदकिशोर यांचे सहयोगी मोहन ढवळीकर यांचाही होता. विचारांशी विचार जुळत गेले आणि त्यातून त्या विचारांना मानणारी माणसेही मिळत गेली. या सर्वांनी अप्पांच्या जाणिवेतले कार्य सुरू राहवे यासाठी ‘अप्पा जोशी प्रतिष्ठान’ स्थापन केले.

 

साधारण एका दशकापूर्वी प्रतिष्ठानचे काम खर्या अर्थाने सुरू झाले. त्यावेळी नवी मुंबई ही ’नवी मुंबई’ म्हणून आकार घेत होती. औद्योगिक उद्योगांचे जाळे नवी मुंबईमध्ये अक्राळविक्राळ पद्धतीने उभे राहायला सुरुवात झाली होती; नव्हे तर, त्याचे परिणाम नवी मुंबईला ’याची देही याची डोळा’ पाहायला मिळू लागले. तुर्भे, कळंबोली, तळोजा वगैरे, तर औद्योगिक पट्टे म्हणूनच मिरवू लागले. त्यातच मुंबईशी स्पर्धा करत नवी मुंबईची लोकसंख्याही वाढत होती. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचा पर्यावरणात्मक दृष्टीने विचार करता ’प्रदुषणाची धनी’ ही मुंबई बनत चालली होती.

 

पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. आज जर तसे केले नाही, तर उद्या हा शब्द तरी उरेल का? असे वाटावे अशी परिस्थिती. अशा परिस्थितीत ’अप्पा जोशी प्रतिष्ठान’ने पर्यावरणासंबंधी काम करण्याचे ठरवले की, लोकांमध्ये पर्यावरणाची जागृती निर्माण करायची. पर्यावरणाचे संवर्धन का करावे? कशासाठी करावे? आणि कसे करावे? याची मार्गदर्शन शिबिरे प्रतिष्ठानने आयोजित केली. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या या शिबिरांमुळे नवी मुंबई आणि लगतच्या पट्ट्यांमध्ये पर्यावरण जाणिवासंबंधी बर्यापैकी जागृती होऊ लागली. पर्यावरणाच्या कक्षेत येणारे विविध घटक जे पर्यावरणाशी संबंधित असतात आणि ज्यांचा समतोल ढासळला की, पर्यावरण ढासळते अशा घटकांचा विचारही ‘अप्पा जोशी प्रतिष्ठान’ करू लागले. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जलसंवर्धन हाही विषय महत्त्वाचा. कारण, पाण्याचे दैन्य असेल, तर आयुष्यात कोणतेही चैतन्य असत नाही. हे पाणी वाचवणे महत्त्वाचे. ‘पाणी अनमोल आहे, त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.’ हे ब्रीद घेऊन प्रतिष्ठान काम करू लागले. नवी मुंबईच्या वस्ती पातळीवर सोसायट्यांपर्यंत जाऊन सोसायटी आपल्या इमारतीवर पडणार्या पावसाचे पाणी कसे जतन करू शकते त्याचे फायदे काय? याचे मार्गदर्शन प्रतिष्ठान करू लागले. त्यामुळे झाले काय की, सोसायट्यांमधील रहिवाशांपर्यंत ‘जलसंवर्धन’ हा विषय पोहचला. तसेच हे जल कसे वाचवायचे याचेही प्रात्यक्षिक सोसायट्यांना मिळाले. घनकचरा व्यवस्थापन, ध्वनी प्रदूषण, प्लास्टिक आणि तत्सम वस्तूंमुळे होणारे प्रदूषण या सर्व प्रदुषणांविरोधात आवाज उठवत ’अप्पा जोशी प्रतिष्ठान‘ काम करत होते.

 

अर्थात, ही अशी कामे अनेक स्वयंसेवी संस्था करत असतात. प्रत्येकाचे आपापले नियोजन आणि ध्येय ठरलेले असते. पण ’अप्पा जोशी प्रतिष्ठान’ने त्याही पुढे जाऊन पर्यावरण संवर्धन, जाणिवा, समस्या, उपाय या विषयांवर एक अभ्यासक्रमच सुरू केला. कारण या विषयांवर अभ्यास करणारी नवीन पिढी तयार होणे गरजेचे होते. अप्पा जोशी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेंटर पॉर इनव्हॉयरमेंटल रिसर्च अॅमण्ड ट्रेनिंग सुरू झाले. साहित्य संमेलनाचे एक आगळे वलय आहे. नवी मुंबईमध्येही दरवर्षी साहित्य संमेलन भरते. नवी मुंबईकरांसोबतच शहरालगतच्या भागातले नव्हे महाराष्ट्रभरातून लोकं या साहित्य संमेलनाला हजेरी लावतात. अत्यंत खेळीमेळीच्या आणि तितक्याच आपुलकीच्या वातावरणात साजरे होणारे हे संमेलन, नवी मुंबईचे आकर्षण ठरू पाहत आहे.

 

साहित्य संमेलनाबाबत प्रतिष्ठानचे कार्यवाह मोहन ढवळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,”अप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत पर्यावरण क्षेत्रात विविध अभ्यासक्रम आणि उपक्रम सुरू झाले. याशिवाय आणखी काय काय करता येईल, याचा विचार करतानाच साहित्य क्षेत्रातही काही काम करता येईल, असा एक विचार पुढे आला आणि तो प्रत्यक्षात आला तो म्हणजे प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या रुपानेच. सप्टेंबर १९१३ मध्ये ‘निसर्ग’ या विषयावर एक साहित्य संमेलन घ्यायचे ठरले. पर्यावरणाशी संबंधित असलेलाच ’निसर्ग‘ हा विषय असल्याने तो प्रत्यक्षात आणणे फारसे कठीण गेले नाही. या संमेलनाचे विशेष म्हणजे प्रथम साहित्य संमेलन असून विविध कविंच्या ‘निसर्ग’ याच विषयावरील कवितांचं संकलन असलेला एक कवितासंग्रह या संमेलनात प्रकाशित करण्यात आला. सानपाडा येथील विवेकानंद संकुल या शाळेतील शिक्षकांनी ‘निसर्ग’ याच विषयावरील कवितेचे सादरीकरण केले. या संमेलनानंतर एक नित्य नियमित उपक्रम सुरू झाला, तो म्हणजे प्रत्येक तिसर्या शनिवारी काही ना काही साहित्यिक कार्यक्रम करायचे. आज चार साहित्य संमेलने संस्थेच्या गाठीशी आहेत. या चारही साहित्य संमेलनाचे आणखी एक विशेष म्हणजे त्या त्या साहित्य संमेलनाच्या विषयावर विशेषांकही प्रकाशित केला गेला. या सर्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य परिषदेच्या माधवी वैद्य, सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव, प्रा. प्रवीण दवणे, वारकरी संप्रदायाचे काकाजी पाटील, धनश्री लेले, गोपाळ देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती उल्लेखनीय होती. नवी मुंबई साहित्य परिषदेचा आणखी एक उपक्रम नुकताच सुरू झाला आहे. सध्याच्या आपल्या जीवनशैलीने विविध कारणांनी आपल्या मातृभाषेकडे- मराठीकडे दुर्लक्ष होत चालल्याची सर्वांच्याच मनात खंत होती. मराठी माणसांनी मराठीपासून दूर जाऊ नये, तर त्याचा अधिक अभ्यास करावा, व्यवहारामध्ये अधिकाधिक मराठीचाच उपयोग करावा आणि हे सर्व मराठी साहित्याच्या अभ्यासातून होऊ शकते हे लक्षात घेऊन ‘साहित्य संवाद’ या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

पुढे येणार्या कालावधीत ‘अप्पा जोशी प्रतिष्ठान’ चे नियोजित कार्य कोणते? तर येणारे वर्ष हे अप्पा जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या जन्मशताब्दीवर्षानिमित्त हे प्रतिष्ठान विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करणार आहे. वर्षातला पहिला उपक्रम आहे गुरूपौर्णिमा उत्सव. या गुरूपौर्णिमेचे वैशिष्ट्य हेच की, अप्पांचे अनेक विद्यार्थी आज नव्या मुंबईत विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पुढाकराने गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. दुसरा उपक्रम आहे शिक्षकांसाठी. शिक्षकांसाठीची कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. या कार्यशाळेचा विषय आहे, ‘शैक्षणिक माध्यमांद्वारे मराठी भाषेचे संवर्धन.’ माय मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहत आहे हेच मोठे दुर्दैव आहे. पण नुसते दुर्दैव म्हणून गप्प राहिले तर प्रश्न सुटणार नाही. विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक वर्ग जर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढे आला, तर थोडा तरी परिस्थितीत बदल होईल. त्यासाठी शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. तसेच जागतिकीकरणाच्या रेट्यात आणि बदलत्या काळात पर्यावरणासंबंधी असणार्या समस्यांचा आढावा आणि त्यावर सकारात्मक नियोजन या विषयांवर आधारित ‘पर्यावरण’ या विषयावर एका परिषदेचे आयोजन होणार आहे.

संस्थेचे कार्यवाह मोहन ढवळीकर अत्यंत सविस्तरपणे संस्थेच्या उपक्रमाची माहिती देत होते. खरे तर नवी मुंबईच्या साहित्यक्षेत्रात ढवळीकरांना ओळखणारा नाही, असा साहित्यिक आणि साहित्याची आवड असणारा माणूसच नसेल. नवी मुंबई शहर म्हणून वाढत असताना, शहराची सांस्कृतिक गरज म्हणून साहित्यासंबंधीच्या घडामोडी कार्यक्रम होणे आवश्यक असते. नवी मुंबईचे शहरीकरण होताना शहराच्या भौतिक संपन्नतेचा विकास होत होता, पण सांस्कृतिक गरजेचे काय? त्यामुळे मोहन ढवळीकर आणि त्यांच्या सहकार्यांनी नवी मुंबईला साहित्यिक चळवळ उभी केली. ढवळीकरांनी उल्लेख केलेले साहित्य संमेलन एक भाग झाला, पण सतत साहित्याचा ऊहापोह व्हावा म्हणून अप्पा जोशी प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याच्या एका शनिवारी साहित्यविषयक विषय घेऊन कार्यक्रम करत असते. तसेच ‘साहित्य-संवाद परीक्षा’ या उपक्रमाचा तपशील पाहिला, तर ’अप्पा जोशी प्रतिष्ठान’ आणि प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांचे साहित्य जगणे कळून येईल.

 

‘साहित्य-संवाद परीक्षा’ एक वैशिष्ट्यपूर्ण परीक्षा आहे. यामध्ये प्रतिष्ठान विविध विषयांवर परीक्षा घेणार आहे. त्या त्या विषयांवरच्या पुस्तकांचा अभ्यास परीक्षार्थिंनी करायचा आहे. ’कादंबरी’ या विषयाच्या अभ्यासासाठी भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’, उद्धव शेळके यांची ‘धग’, शुभांगी भडभडे यांची ‘मोक्षदाता’ या कादंबर्या वाचायच्या आहेत, तर ‘कविता’ विषयासाठी इंदिरा संत यांची रंगबावरी, बा.भ. बोरकर यांची आनंद भैरवी, कुसुमाग्रज यांची रसयात्रा हे संग्रह वाचायचे आहेत. ’नाटक’ या विभागामध्ये महेश एलकुंचवार यांचे वाडा चिरेबंदी, प्राजक्ता देशमुख यांचे देव बाभळी, वसंत कानिटकर यांचे सूर्याची पिल्ले या नाटकांचा अभ्यास करायचा आहे. तर ’ललित लेखना’ संबंधी परीक्षार्थिंनी विंदा करंदीकर यांचे स्पर्शाची पालवी, विजय तेंडुलकर यांचे नाटक आणि मी, मंगला गोडबोले यांचे नवी झुळूक वाचायचे आहे. ’मराठी भाषेचे उपयोजन’ यामध्ये शुद्धलेखन, वृत्तपत्रिय पत्रलेखन, वृत्तलेखन आणि मुद्रितशोधन याचा अभ्यास आहे.

 

आता हे सर्व कशासाठी तर? मराठी भाषेचे प्रेम वाचकांमध्ये वृद्धिंगत व्हावे यासाठी. मराठी भाषेचे श्रीमंत वाङ्मय प्रकार वाचले जावेत यासाठी. वाचक परंपरा वाढावी यासाठी. हे सर्व करून अप्पा जोशी प्रतिष्ठानला काय मिळणार? असा प्रश्न मनात आला. पण मन वाचावे इतके सरळपणे मोहन ढवळीकर म्हणाले,”मराठी भाषा ही मायबोली आहे. पर्यावरण संतुलन ही जशी भौतिक सामाजिक गरज आहे. तसेच भाषा समृद्धी ही समाजाची मानसिक गरज आहे.”

मोहन ढवळीकर काय, डॉ. नंदकिशोर जोशी, अरूंधती जोशी काय, ही सर्व मंडळी ‘सकल सर्वाना शहाणे करूनी सोडावे’ या ध्येयाने पछाडलेली आहेत. ‘मी तर बाबा पछाडलेला’ ही काव्यपंक्ती या साहित्यवेडया समाजशील व्यक्तींच्याबाबतच लिहिलेली आहे की काय? असे वाटते. निस्वार्थीपणे समाजासाठी काम करणारी ही माणसं समाजाचे वैभव आहेत.

@@AUTHORINFO_V1@@