मतिमंदांचे ‘प्रारब्ध’ बदलविणारे ‘आधार’ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |



१७ जानेवारी १९९४ ला प्रथम ‘आधार’ चा आरंभ केला. तेव्हापासून गोरेंव्यतिरिक्त अन्य विश्वस्त हे पालकांमधूनच निवडले जातात. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला पालक सभा होते. मतिमंदांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. आधार सुरू झाला व स्थिरावला.


जन्म हा एक अपघात आहे, तर मृत्यू स्वाभाविक आहे असे मानले जाते, तसेच जे प्रारब्धात असेल ते अटळ असते. ते भोगावेच लागते,असेही बोलले जाते. मात्र, जीवनातील फक्त १० टक्के घटना पराधीन असतात व उरलेल्या ९० टक्के या मानवाच्या कर्तृत्वावर अवलंबून असल्याने त्या आपल्या स्वाधीन असतात. यावर कै. माधवराव गोरेंचा विश्वास होता. माटुंगा येथील चिल्ड्रन एड सोसायटीतून ते निवृत्त झाले. त्याचवेळेस त्यांनी ज्या पालकांना १८ वर्षांपेक्षा वयाने मोठी मतिमंद मुले आहेत अशा पालकांना एकत्र करून पहिली २२ वर्षे बदलापूरला व आता गेली चार वर्षे नाशिकची शाखाही रुजली. संस्थेत १३५ पर्यंत तत्पर आपुलकीने वागणारा कर्मचारी वर्ग आहे. पालक व अर्थातच आलेले सर्व पाल्य येथे रमतात ते इथल्या आपुलकीच्या वातावरणामुळे. दोन वर्षांपूर्वीच सेंट्रल डिपॉजिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडने संस्थेला दुमजली सुरेख वास्तु (इमारत) बदलापूर येथे बांधून दिली. आपलेपणा व मंगलमय मैत्री यांचा संगम म्हणजे ‘आधार! निसर्गापुढे मानव हतबल होतो. एकाने तर आपल्या हातानेच पाल्याचे जीवन संपविले, तर कित्येक माता आपली चाललेली नोकरी सोडून अशा दिव्यांगांचा सांभाळ करायला घरी बसतात. देशामधे मतिमंदांची संख्या १५ लाख आहे. त्यांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे जिवन सुसह्य बनावे म्हणून स्थानिक पातळीवर का होईना ’आधारची निर्मिती झाली. मतिमंदाना ‘आयुष्यभरासाठीचा निवारा देण्याची हमी दिली जाणारी ही आगळी वेगळी संस्था. ‘सुरळीत चालले तर तो व्याप नाही तर संताप अशी परिस्थिती चोहीकडे असतांनाही दुसर्‍यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याची वृत्ती जोपासणार्‍या सत्वगुणी माणसांची ही संस्था! प्रत्येक माणसातील दिव्यांगांबद्दल माणुसकी जागृत करणे, हाच खरा धर्म हेच खरे शिक्षण असे मानून प्रत्येकातील दिव्यत्वाला आव्हान देण्याची मोठी कला आधारमध्ये शिकवली जाते. सचोटी व मेहनत या पायांवर संस्था भक्कमपणे उभी आहे.

 

मानसिक वाढीच्या दृष्टीने मुलेमुलीच या पाच स्वतंत्र कक्षात राहतात. नर्सेस आयोग्यविषयक काळजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतात. प्रसंगी शहरातील इस्पितळातही न्यायची तयारी असते. ५ एकरच्या विस्तीर्ण जागेवर नवीन इमारतीत वर्कशॉपला प्रशस्त जागा मिळाली. या जागेमधे सकाळी १ १ ते ४ या वेळात संस्थेतील मुले मशिनवरील काम, पेपर बँग्स इ. मुले तर मुलींच्या कामात विविधता जास्त आढळते. विणकाम, भरतकाम, मेणबत्या, अगरबत्या बनविणे, खाद्य पदार्थांमधील गोडामसाला, इडलीचे कोरडे पीठ बनविण्याचे काम हौसेने करतात. त्यांच्या दिनक्रमातील वर्कशॉप (कार्यशाळा) हा महत्त्वाचा भाग असतो, ज्यामुळे त्यांना आत्मनिर्भरतेचा आनंद मिळतो. पहाटे साडे पाचला उठवले जाते. साडे पाच ते साडे सात प्रात:विधी, काहींना तर दातही घासून घावे लागतात. नंतर नाश्ता, चहा दिला जातो. रविवारी इडली असते. सकाळी ८ वाजता श्लोक म्हणून घेतले जातात. गाणी म्हटली जातात. गोष्टी सांगितल्या जातात. आवारात फिरुन आणले जाते. साडे नऊ वाजता कर्मचारी वर्ग दाखल झाल्यावर वर्कशॉपकडे पाय वळतात. अडीच ते चार छंदांसाठी वेळ राखून ठेवला आहे. नंतर चहा झाल्यावर सायंकाळी मोकळ्या हवेत गावात आवाराबाहेर देखरेखीखाली फिरायला नेले जाते. काहीजण क्रिकेटही खेळतात, काहींना व्हीलचेअरसह बाहेर आणले जाते. कॅरमही खेळणारे आहेत. दूरचित्रवाणी संच लावलेले आहेत. तिथे गाणी हिंदी चित्रपट, क्रिकेट सामने विशेषत: आयपीएल बघण्यासाठी गर्दी होते. कर्मचारी शिफ्टप्रमाणे बदलत राहतात. स्वच्छता, आत्मीय व्यवहार यामुळे कर्मचारी व दिव्यांग यांचे नाते दृृढ झाले आहे.

 

पालकसभेच्या वेळेस आपापली कला सादर केली जाते. गणपती पाच दिवस, होळी, दसरा-दिवाळी सर्वच सण मोठ्या उत्साहात आनंदाने मोदक, पुरणपोळी व त्यावेळी गोडधोड खाऊन साजरे होतात. मतिमंदांना आधार देऊन या शब्दाला सर्वप्रथम अर्थप्राप्त करुन देण्याचे श्रेय कै. माधवराव व आता त्यांचे पुत्र विश्वास यांच्या दूरदृष्टीने प्रकल्प राबविण्याला जाते. गेली ११ वर्षे पराग फडणीस यांनी ‘आधारवार्ता हे त्रैमासिकही चालवले आहे. त्यातील कर्मचार्‍यांचे व पालकांचे प्रांजळ मनोगत आपल्याला अंतर्मुख करते.

 

नंदन नीलकेणींनी देशातील नागरिकांना ओळख मिळावी व सरकारच्या सर्व योजनांच्या फायदा मिळावा म्हणून गेल्या १० वर्षात ‘आधार नाव देऊन प्रणाली सुरू केली हा एक ‘योगायोगचम्हणायचा. बदलापूर (प.) ला बारवी डॅम रस्त्यावर, ठाकूरवाडी गावात हा प्रकल्प आहे.

 

अशा या संस्थेचा रोजचा २०० जणांचा कारभार व नवीन ६ निवासस्थानी ही ३० जणांचा समावेश झाल्यावर गाडा व्यवस्थित चालावा म्हणून व्यक्ती संस्था, कंपनी म्हणून आपापले योगदान देण्यासाठी स्वत:हून पुढे यावे व पुढील प्रमाणे संपर्क साधावा ही अपेक्षा संस्था करते. गेल्या चार वर्षापासून नाशिकलाही ‘आधारची नवी शाखा सुरू झाली. तेथे ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. संस्था विशेष व्यक्‍तींसाठी करत असलेले कामही विशेष आहे. हा एक प्रकारे जगन्‍नाथाचा रथ आहे. याला समाजाची साथ हवी आहे.

 

-अनिल पालये

@@AUTHORINFO_V1@@