बदलत्या काळानुसार संघासमोर बदलती आव्हाने : भैय्याजी जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2018
Total Views |


 

 

गेली 43 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि सध्या संघाच्या सरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळणारे सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांनी नुकतीच दैनिक 'मुंबई तरुण भारत'च्या वडाळा, मुंबई येथील नुतन कार्यालयाला भेट दिली. यावेळी दैनिक 'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार यांनी भैय्याजी जोशी यांच्याशी रा. स्व. संघाचे आज सर्वच चर्चांच्या केंद्रस्थानी येणे, संघासमोरची आव्हाने, संघाबद्दलचे गैरसमज आदी विषयावर मनमोकळी बातचित केली.

 

संपादक : आज रा. स्व. संघ सर्व प्रकारच्या चर्चांच्या केंद्रस्थानी आहे. एक काळ असा होता की प्रसिद्धी नाही, बातम्या नाही, साधी दखलही कोणी घेत नव्हते. तुम्ही या सगळ्या स्थित्यंतराकडे कसे पाहता? म्हणजे अगदी ताजं उदाहरण, काल लोकसभेतसुद्धा सुमित्रा महाजनांना राहुल गांधींना सांगावं लागलं की, संघाचं नाव घेऊ नका. या सगळ्या स्थित्यंतराकडे तुम्ही कसं पाहता?

 

भैय्याजी जोशी : समाजामध्ये दखल दोन कारणांनी घेतली जाते. एक तर काही चुकीचं काम केलं तर समाज दखल घेतो आणि दुसरे म्हणजे चांगलं काम केलं तर दखल घेतो. मला असं वाटतं की, आज संघाची शक्ती अशी झालेली आहे की, तिची कोणीही उपेक्षा करू शकत नाही. आज संघाची चर्चा होते, तो सगळा आमच्या वाढत्या कामाचा परिणाम आहे. आमच्या वाढत्या कामामुळे संघ चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसते. त्याचवेळी संघावर टीकाटिप्पणी करणार्‍यांची संख्याही वाढली आहे. पण त्या टीकाटिप्पणीदेखील इतक्या आधारहीन असतात की, त्याबाबत उत्तरे द्यायलाच पाहिजे, असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला विचार करावा लागतो, तो वेगळ्या गोष्टीचा. तो म्हणजे आज संघाचं जे स्थान समाजामध्ये निर्माण झालं आहे, त्यातून आमच्याकडून समाजाच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. समाजासमोर निर्माण होत असलेल्या विविध प्रश्नांबद्दल संघाची भूमिका काय आहे, हा आज चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे संघाची भूमिका ही योग्य दिशा देणारी असेल, असं वाटणारा फार मोठा वर्ग हितचिंतक म्हणून उभा राहिलेला आहे. त्यामुळे मी म्हणेन की, संघ चर्चेच्या केंद्रबिंदूमध्ये आला नसून संघ आज समाजामध्ये सर्वत्र स्वीकारण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे.

 

संपादक : संघ वाढतो आहे, समाजाचं संघामधलं प्रमाण वाढतंय, प्रतिबिंब वाढतंय. अशावेळी संघाविषयी गैरमज असणारी मंडळी आहेतच. पण त्याचबरोबर संघाला मानणारी, संघाकडून अपेक्षा ठेवणारी अशी मंडळीही मोठ्या प्रमाणावर वाढताहेत आणि सहजभावाने नैसर्गिकपणे या मंडळींच्या संघाकडून अपेक्षाही वाढताहेत. या अपेक्षा कदाचित संघाच्या कक्षेच्या बाहेरच्यासुद्धा असतील. मग तुम्हाला हे संघासमोर असलेलं आव्हान वाटतं?

 

भैय्याजी जोशी : मला असं वाटतं की, आव्हान आहे. पण आम्ही असं प्रामाणिकपणे म्हणतो की, सगळ्या प्रश्नांचं उत्तर आमच्याकडे आहे असे नाही. आम्ही एका पद्धतीने, एका दिशेने काम करत चाललो आहोत. हे स्वाभाविक आहे की, एक जबाबदार संघटन म्हणून विविध विषयांवर संघाचं मत काय आहे, हे जाणून घेण्याची समाजाची इच्छा असते, पण आम्ही एक मर्यादा पाळत आलेलो आहोत की जे आमच्या कक्षेतले आहे, त्याच्या संबंधाने आम्ही मत प्रकट करतो आणि जे कक्षेबाहेरचे आहेत, त्याबद्दल आम्ही स्पष्टपणे म्हणतोही की, हे आज आमच्या विचारक्षेत्रामध्ये येत नाही. पण असे विषयही आमच्या कक्षेत यावेत, अशी लोकांची अपेक्षा नक्कीच आहे. मात्र आम्हीही एका मर्यादित दृष्टिकोनातूनच काम करत असल्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे असतीलच, असं समजायचं काही कारण नाही.

 

संपादक : भैय्याजी, रोजगाराच्या संबंधातले प्रश्न आहेत, कृषीच्या संदर्भातले प्रश्न आहेत. राष्ट्रभक्ती, मूल्यांची जोपासना, त्याग असा संघाचा प्रवास आहे. अशा परिस्थितीत आज देशासमोरचे प्रश्नसुद्धा संघाचे प्रश्न झालेले आहेत, असं वाटतं का?

 

भैय्याजी जोशी : इथे एक विचार केला पाहिजे की, काही विषय हे ध्येयधोरणांचे आहेत. काही व्यवस्थांचे आहेत. व्यवस्थेच्या संदर्भात जे प्रश्न आहेत, जसा की बेरोजगारीचा. हा व्यवस्थात्मक प्रश्न आहे आणि आमच्या मते व्यवस्थात्मक गोष्टींचे शासनाने प्रभावीपणे क्रियान्वयन केले पाहिजे. शासनाने योग्य ते धोरण आखावं की, ज्यामुळे बेरोजगारी कमी होईल, कारण हा सैद्धांतिक प्रश्न नाही. त्यामुळे जे प्रश्न व्यवस्थेचे आहेत, त्याबाबत शासनाने विचार करावा, असं आमचं मत आहे. जे प्रश्न वैचारिक आहेत, सिद्धांताशी, हिंदुत्वाशी, देशहिताशी, समाजहिताशी निगडित आहेत, त्याबाबत आम्ही जरूर विचार करतो. पण जे व्यवस्थात्मक प्रश्न आहेत, जसे की, देशाची सुरक्षा, रोजगार, आर्थिक क्षेत्राशी संबंधित प्रश्न, त्यातला व्यवस्थात्मक भाग हा शासनाने उचलला पाहिजे व त्यातली वैचारिक, सैद्धांतिक भूमिका जी आहे, ती वेळोवेळी संघ मांडत आलेला आहे.

 

संपादक : भैय्याजी, संघ एका विशिष्ट जातीचा आहे, असा एक गैरसमज आहे, मात्र जो संघात आला, त्याला याचा अनुभव असतो की, संघात असं काहीही नाहीय. पण हा जो गैरसमज आहे, तो सर्वदूर विशेषतः अनुसूचित जाती-जमातीच्या मंडळींमध्ये पसरविण्यात एका मोठ्या गटाला चांगलं यश आलेलं आहे. या सगळ्याकडे आपण कसं पाहता?

 

भैय्याजी जोशी : खरं म्हणजे या प्रश्नाला वास्तवाचा कोणताही आधार नाही, असं मी मानतो. आम्ही असा वेगळा प्रयत्नही करत नाही, पण संघाची एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये समाजातले जितके म्हणून काही क्रॉस सेक्शन आहेत, ते सर्व संघाच्या प्रक्रियेमुळे संघामध्ये येतात, परंतु आम्ही संघाच्या प्रक्रियेमध्ये कधीही अमक्या जातीचे एवढे लोक आहेत, तमक्या जातीचे तेवढे लोक आहेत, अशी मांडणी करत नाही. ती मांडणी करणे म्हणजे समाजामध्ये पुन्हा विभाजन करणे असं आहे, असं संघाला वाटतं. एक काळ असा होता की, सुरुवातीच्या काळात संघाचं काम एका विशिष्ट वर्गामध्ये होतं, पण आज ९३ वर्षानंतर या आरोपामध्ये काही अर्थ नाही आणि असे आरोप करणारे पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातूनच आरोप करतात, असं आमचं मत आहे. ज्यांनी संघ जवळून बघितला, त्यांना या आरोपामध्ये काही तथ्य असल्याचं वाटत नाही. त्यामुळे आम्ही या प्रश्नाच्या संदर्भाने फार चर्चा करू इच्छित नाही, पण एवढं नक्कीच सांगू शकतो की, आज देशव्यापी संघटनेमध्ये सर्व प्रकारच्या, सर्व वर्गाला स्पर्श करणारं असं आमचं काम उभं राहिलेलं आहे.

 

संपादक : शहरी माओवादाचा विस्तार करत असताना या गैरसमजाचा उत्तम उपयोग करून घेतला जातोय, याबद्दल तुम्ही काय म्हणाल?

 

भैय्याजी जोशी : मला असं वाटतं की, शहरी माओवादामध्ये केवळ एवढाच मुद्दा नाहीय. समाजातला जो गरीब, दुर्बल वर्ग आहे, त्यांच्या अज्ञानाचाही यात फायदा घेतला जातो. देशातल्या हिंदू समाजातल्या जातीव्यवस्थेमुळे जे काही प्रश्न निर्माण झाले, त्याचाही उपयोग करून घेतला जातो. शिवाय हा प्रश्न शुद्ध राजकीय स्वरूपाचा होत चालला आहे. त्याचा सामाजिक विषयाशी काहीही संबंध राहिलेला नाही. ज्यांना समाजामध्ये विद्रोहाचंच वातावरण निर्माण करायचं आहे, ते लोक असे विषय स्वाभाविकपणे पुढे आणत राहतील. संघाचं मत असं आहे की, आम्ही प्रामाणिकपणाने आमच्या कामातूनच सर्व समाजात विश्वास निर्माण करू शकतो आणि आमचा अनुभव असा आहे की, त्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे या जाणूनबुजून केल्या जाणार्‍या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश येईल, असं वाटत नाही.

 

संपादक : भैय्याजी देशात निवडणुकांचं वातावरण सुरू झालेलं आहे. संघ भावविश्वाचे म्हणून काही प्रश्न आहेत. त्यात आपल्याला अनेक मुद्द्यांचा अंतर्भाव करता येईल. ते सगळे सुटलेत, असं म्हणायला आज वाव नाहीय. आपल्याला काय वाटतं याविषयी?

 

भैय्याजी जोशी : एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, कोणत्याही सरकारला असे संवेदनशील प्रश्न सोडवताना खूप काळजी घ्यावी लागते. ज्यातून समाजामध्ये काही तेढ निर्माण होईल, असं होऊ नये, याची त्यांना काळजी घ्यावी लागते. सरकार हे संविधानाच्या मर्यादेमध्ये काम करतं. नियम आहेत, कायदे आहेत, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की, सत्तेमध्ये असलेल्या मंडळींनी या विषयांबद्दल प्रामाणिकपणे भूमिका घेतली आहे की नाही, एवढीच एक समीक्षा करण्याची गोष्ट असते. त्यामुळे निर्णय झाले नाहीत, याच्याशी प्रश्न न जोडता ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केले जात आहेत की नाहीत, एवढाच विचार आम्ही करतो.

 

संपादक : म्हणजे तुमचं म्हणणं आहे की, अशी समीक्षा होते आहे?

 

भैय्याजी जोशी : हो, होतेय.

 

संपादक : संघ म्हणून अशी प्रक्रिया सुरू आहे?

 

भैय्याजी जोशी : हो, सुरू आहे, आम्ही अशी समीक्षा करतच असतो आणि आमच्या भावना योग्य त्या ठिकाणी योग्या त्या शब्दांमध्ये आम्ही प्रकटही करत असतो.

 

संपादक : भैय्याजी, काश्मीर प्रश्न चिघळतोय. पूर्वी नव्हता इतका तो आता गंभीर झाला आहे, असं एक वातावरणसुद्धा आहे, देशभरात...

 

भैय्याजी जोशी : ज्यांनी असं ठरवलं आहे की, प्रश्न सुटू द्यायचे नाहीत, अशी मंडळी तिथे सक्रिय आहेत. प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्या बाजूंनी एक प्रयत्नांची साथ असावी लागते. मला असं वाटतं की, आज काश्मिरचा प्रश्न चिघळला आहे, असं म्हणण्यापेक्षा काश्मिरचा प्रश्न लोंबकळत ठेवणं अशाच उद्देशाने सगळे प्रयत्न सुरू आहेत. ते सुटू नयेत म्हणून वेळोवेळी विविध शक्तींना उभे करून एक अस्थिरतेचं वातावरण कायम राहावं आणि प्रामाणिकपणे देशहिताच्या दृष्टीने काश्मीर प्रश्नाची सोडवणूक व्हावी, असं न वाटणारा वर्ग थोडासा प्रभावी होत आहे. काश्मीरमध्ये विचार केला तर असं लक्षात येतं की, असं वाटणारा वर्ग थोडा आहे, पण तो हिंसक मार्गाचा अवलंब करतोय आणि कोणत्याही समाजामध्ये हिंसक प्रवृत्तीच्या शक्ती या थोड्या जरी असल्या तरी त्यांचा प्रभाव जास्त असतो. त्या उठून दिसतात. सर्वसामान्य माणसे यापासून दूर राहायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आज जे काश्मीरमध्ये सुरू आहे, त्याला सर्वसामान्य सर्व काश्मिरींचा पाठिंबा आहे, असं आम्हाला वाटत नाही.

 

संपादक : भैय्याजी, महाएमटीबी हे नवं माध्यम आहे. जसं आपलं वेबपोर्टल आहे, तसं अन्य माध्यमांचीही वेबपोर्टल्स येत आहेत. या सर्वच नवमाध्यमांनी पारंपरिक माध्यमांची मक्तेदारी मोडीत काढून आपला एक नवा वाचकवर्ग निर्माण केला आहे. आपण याकडे कसं पाहता? आणि महाएमटीबीच्या वाचकांना, दर्शकांना आपण काय संदेश द्याल?

 

भैय्याजी जोशी : मला असं वाटतं की, कुठल्याही परंपरा मोडून काढणं याच्याशी आम्ही सहमत नाहीत. त्या त्या काळामध्ये त्या त्या व्यवस्था या उपयोगी सिद्ध झालेल्या आहेत. प्रगती होत आहे, म्हणजे मागचं चूक आहे, असं नाही होत. मोडून काढणं म्हणजे असं की, मागच्या सगळ्या गोष्टी चूक होत्या, असं सिद्ध करणं. त्यामुळे मला असं वाटतं की, असा विचार करणं काही योग्य नाही. हो, आजच्या काळामध्ये कालसुसंगत मार्गावर वाटचाल केली पाहिजे. मला असं वाटतं की, या माध्यमातून ती आपण सुुरू केलेली आहे, ती स्वागतार्ह आहे. मी गेले काही दिवस या माध्यमाशी संबंधित आहे. साधारणपणे मी रोजच ते बघत असतो.

 

संपादक : महाएमटीबी तुम्ही रोज बघता?

 

भैय्याजी जोशी : हो, महाएमटीबी मी रोज बघत असतो आणि चांगलं वाटतं की, एकूण आपल्या विचारांची मंडळी या आधुनिक साधनांचा उपयोग करून पुढे जात आहेत. मला फक्त दोन गोष्टी सुचवायच्या आहेत - एक म्हणजे गतीने अपडेट होत राहणं, याची आपल्याला आवश्यकता आहे. त्यामध्ये आणखी थोडी गती आणली पाहिजे. काही मर्यादा असतील, पण त्या मर्यादांचा विचार न करता, मर्यादा ओलांडायच्या आहेत, हे लक्षात घेऊन तरुण भारतने पुढे गेले पाहिजे. मला असं वाटतं की, या सगळ्या माध्यमांचा जो दर्शक आणि वाचकवर्ग आहे, त्यांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांची कशी पूर्ती करता येईल, याचाही विचार केला पाहिजे. म्हणून दर्शकांचा, वाचकांचा एक अध्ययनाचा विषय करून आपण पुढे पुढे जात राहिले, तर मला असं वाटतं की, हे माध्यम अधिक उपयोगी सिद्ध होईल. सध्याचा जो दर्शकवर्ग आहे तो जाणकार आहे, एका विचाराने भारलेला आहे. आजच्या काळात जी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ती आणखी कशी पोहोचवता येईल, याचा विचार करावा. दर्शक आणि वाचक हा तरुण भारतमध्ये येणार्‍या सर्वच गोष्टींचा विचार करून आपल्या विचारांचा पाया भक्कम करत राहो आणि त्यासाठी योग्य ती कृती करण्याची सिद्धता सगळ्या वाचवकर्गाने ठेवावी, अशी अपेक्षा स्वाभाविकपणे आहे.

@@AUTHORINFO_V1@@