थरुर निकाल लावणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |

 

 
हल्ल्यात बळी पडणाऱ्या अखलाख, पहलू वा अकबरऐवजी तिथे अमर, संदीप वा हेमंत असता तर त्यावेळीही शशी थरूरांनी खरेच अशी चिंता व्यक्त केली असती का? कारण, काँग्रेस आणि थरूरादी मंडळींचा इतिहास असाच आहे.


ज्या संस्था-संघटनेत अथवा समाजात मूर्खांचाच भरणा असतो, त्याला विनाशापासून कोणीही वाचवू शकत नाही. सध्या काँग्रेस पक्षाची अवस्था अगदी अशीच झाल्याचे दिसते. म्हणूनच त्या पक्षातल्या एकाहून एक नेत्याला देशातल्या कोणत्याही मुद्द्याचा संबंध, संबंध नसलेल्या मुद्द्याशी जोडण्याची हुक्की येते. दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यरांपासून सुरू होणारी ही यादी फार मोठी आहे, त्यातलेच एक नाव म्हणजे शशी थरूर. शशी थरूर यांना याआधी काँग्रेसमधले एक विद्वान गृहस्थम्हणून ओळखले जाई. पण, गेल्या काही काळापासून स्वतःची पत्नी-सुनंदा पुष्कर हिच्या संशयास्पद मृत्यूचे भूत त्यांच्या असे काही मानगुटीवर बसलेय की, शशी थरूर आता विद्वत्ता वगैरे विसरून भस्म्या रोग लागल्यासारखे बरळतच सुटलेत. २०१९ च्या निवडणुका भाजपने जिंकल्या, तर देशाचा हिंदू-पाकिस्तान होईल,” अशी मुक्ताफळे उधळून दोन दिवस होत नाहीत, तोच थरूरांना आज गाय अन् मुसलमान आठवले. देशात मुसलमान असण्यापेक्षा गाय असणे अधिक सुरक्षित आहे,” असे ट्विट त्यांनी केले. कोणताही मुद्दा तापवून आपला स्वार्थ साधणे हे कोणत्याही राजकारण्याचे ध्येयच असते. शशी थरूर तरी त्याला कसे अपवाद असतील? त्यांचे हे ट्विट त्याच स्वार्थी राजकारणाचे उत्तम उदाहरण.

 

देशभरात काही काळापासून कथित गोरक्षकांनी घातलेल्या धुमाकुळाचे प्रकरण चांगलेच गाजत असून प्रत्येकजण त्यातून आपला स्वार्थ साधण्यातच गुंतल्याचे दिसते. गाय आणि गोरक्षेचा संबंध मुस्लिमांशी जोडला की, आपली झोळी मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानाने शिगोशीग भरेल, ही त्यामागची लाचार भावना. शशी थरूर यांना आज त्याच एकगठ्ठा मतांपायी देशात मुस्लिमांपेक्षा गाय सुरक्षित असल्याचे तारे तोडावे लागले. देशातल्या कुठल्यातरी कोपर्यात घडलेली छोटीमोठी घटना म्हणजेच देशभरातली वस्तुस्थिती समजण्याची राजकारण्यांची, विरोधकांची, पत्रपंडितांची नि बुद्धिमंतांची वाईट सवयच याला मुळी कारणीभूत. राईचा पर्वत करून ज्यातून स्वार्थ साधेल त्या गोष्टीला नको तितके महत्त्व द्यायचे, त्यावरून पुरेसा धुरळा उडेल याची खबरदारी घ्यायची, आपली प्रसिद्धीची हौस भागवायची आणि त्यातून जे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत आलेत, त्यांच्यात फूट पाडायची, त्यांना चिथावणी द्यायची असला हा खेळ आहे. शशी थरूर याच खेळातले एक भिडू. थरूरांच्या आधीही अनेकांनी हा खेळ खेळला, नाही असे नाही. पण, देशातले जनमानस ना अशा लोकांच्या काव्याला फसले ना भुलले. कारण, त्यांना या लोकांच्या मुखवट्याआड दडलेला कारस्थानी चेहरा चांगलाच परिचयाचा आहे. शेवटी आपल्या डावपेचांना यश मिळत नसल्याचे पाहून या लोकांनी पुन्हा पुन्हा काहीतरी खुसपटे काढून नवा नवा वाद निर्माण करण्याचे धोरण आरंभले. पुरस्कारवापसी, असहिष्णुता वगैरे मुद्दे पुढे करण्यामागे हेच धोरण होते आणि आताही शशी थरुरांच्या विधानांमागे हेच धोरण आहे.

 

देशात २०१४ साली झालेल्या सत्तांतराचा धक्का पचवू न शकलेल्या लोकांचा कंपू अजूनही त्यातून सावरलेला नाही. त्यामुळेच देशात कोणतीही घटना घडली की, त्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याची निराधार मांडणी या लोकांकडून केली जाते. शशी थरूर यांचे हिंदू-पाकिस्तानचे विधानही त्याच पठडीतले आणि आजचे मुस्लीम गायीपेक्षा सुरक्षित असल्याचे विधानही तसलेच. जनतेत नाव घेण्यासारखे कर्तृत्व नसले की, ज्याचे नाव आहे, त्याला किती आणि कसे बदनाम करता येईल, अशी चढाओढ नाकर्त्या लोकांमध्ये लागते. शशी थरूरादी मंडळी याच प्रकारातले नमुने. म्हणूनच प्रत्येकवेळी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी, अमित शाह यांना आरोपीच्या पिजऱ्यात उभे करायचे आणि पक्षश्रेष्ठींना खुश करायची नीती ही मंडळी अवलंबतात. त्यातून त्यांना आपण सेक्युलरअसल्याचे नाटकही छानपणे वठवता येते. सेक्युलर असण्यासाठी जो काही मालमसाला हवा असतो, त्यात गायीला विरोध करणेही ओघाने आलेच. गायीला विरोध न केल्यास अशा लोकांचे सेक्युलर जानवे धोक्यात येते, म्हणून मग अशा मंडळींना आपले सेक्युलर पावित्र्य जपण्यासाठी सतत गायीविरोधात दात विचकावेच लागतात. शिवाय गायीला विरोध केल्यास मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांचा शिरखुर्माही ओरपायला मिळणार, ही आणखी एक आशा. त्यातूनच बहुसंख्य हिंदूंच्या दृष्टीने गाय अनादी अनंत काळापासून पूजनीय, वंदनीय असल्याचे या मंडळींकडून जाणूनबुजून विसरले जाते. गायीप्रती हिंदूंची श्रद्ध वादातीत आहे. शिवाय कितीतरी राज्यात गोवंशहत्याबंदीही आहे. तरीही काही लोकांकडून केवळ हिंदूंना खिजवण्यासाठी आणि कायद्याला पायदळी तुडवून गोहत्या केली जाते. अशी गोहत्या करणे कितपत योग्य? हा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतो. शिवाय अशावेळी पेटासारख्या संस्था आणि प्राणीमित्र टोळकेही मातीत चोच खूपसून बसते. असे का? अन्य प्राण्यांची हत्या करतेवेळी अशा संस्थांच्या अन् प्राणीमित्रांच्या प्राणीप्रेमाला चांगलीच उकळी फुटते. पण, गायीचा विषय आला की, त्याला लगोलग ओहोटी लागते. असे का? गाय हिंदूंसाठी श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे म्हणूनच ना? थरूरांनाही गायीचा विषय चघळण्याची बुद्धी गाय ही हिंदूंसाठी आराध्य आहे म्हणूनच आठवला ना? यातूनच आम्हाला हिंदूंची मुळीच फिकीर नसल्याची काँग्रेसी वृत्ती दिसते.

 

गायीच्या नावावर कोणत्याही व्यक्तीची हत्या करणे नक्कीच निषेधार्ह आणि धक्कादायक. कारण, कोणाही व्यक्तीची जेव्हा हत्या होते, तेव्हा त्या व्यक्तीचे उभे जीवन तर संपतेच, पण त्याच्याशी संबंधित सर्वांचेच विश्वही कोलमडते. कोणाचे घर उद्ध्वस्त होते, कोणी अनाथ होते तर कोणाची म्हातारपणाची आशा मरून जाते. त्यामुळे अशा हत्या व्हायलाच नकोत, हे खरेच. पण, अशा हल्ल्यात बळी पडणार्या अखलाख, पहलू वा अकबरऐवजी तिथे अमर, संदीप वा हेमंत असता तर त्यावेळीही शशी थरूरांनी खरेच अशी चिंता व्यक्त केली असती का? कारण, काँग्रेस आणि थरूरादी मंडळींचा इतिहास असाच आहे. ज्या ज्या वेळी मुस्लिमांचे नाव येईल, त्या त्या वेळी डोळे ओले झाल्याचे दाखवायचे आणि ज्या ज्या वेळी हिंदूंचे नाव येईल, त्या त्या वेळी गपगुमान बसायचे, हाच कित्ता या लोकांनी वेळोवेळी गिरवल्याचे दिसेल. म्हणजेच, यांच्या राजकारणासाठी मुस्लीम व्यक्तीचा बळी जाणेच गरजेचे असते, असेच समजावे लागेल. दुसरा मुद्दा कोण किती सुरक्षित आणि असुरक्षित हा. शशी थरूर केरळमधील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पण, नुकत्याच उघडकीस आलेल्या केरळी चर्चमधील घटना पाहता शशी थरूरांनी खरे तर त्याविरोधात बोलायलाच हवे होते. चर्चमध्ये आलेल्या महिलांवर, नन्सवर पाद्य्रांकडून बलात्कार, अत्याचार होत असल्याचे उघड झाले. पिडीत महिलांनी त्याविरोधात तक्रारीही केल्या. पण, शशी थरूर यांना त्या महिलांच्या सुरक्षेची कधी काळजी करावीशी वाटली नाही की कधी त्यावर प्रश्न विचारावासा वाटला नाही. का? कारण, तिथे असलेली ख्रिस्ती मतपेटी सुरक्षित ठेवायची आहे म्हणूनच ना? इथे तिथे घडणाऱ्या? कोणत्याही घटनेवर पोपटपंची करत मिरवण्यात थरूरांची दातखीळ ख्रिस्त्यांच्या दबावामुळेच बसलीय ना? थरूरांनी तिथल्या चर्चविरोधातही कधीतरी आवाज बुलंद करावा.

 
 
@@AUTHORINFO_V1@@