रेल्वे पुलाचे विद्रूपीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |




डोंबिवली : ‘सुसंस्कृत, सुशिक्षित नोकरदार वर्गाचे शहर,’ असे बिरुद मिरवणाऱ्या डोंबिवली शहराला ‘इतरत्र थुंकणाऱ्याचे शहर’ असा कलंक लागण्यास सुरुवात झाली आहे, कारण डोंबिवली रेल्वेस्थानकात असणार्‍या पुलावर अनेक बेशिस्त नागरिकांनी पानाची पिचकारी मारून या ब्रिजचे विद्रूपीकरण केले आहे. त्यामुळे रेल्वेच्या सफाई कर्मचाऱ्यांना वारंवार या पिचकाऱ्या साफ करताना ऐन पावसातही अक्षरश: घाम गाळावा लागत आहे. त्यामुळे ‘तुम्ही थुंका, ते धुवत राहतील,’ असेच काहीसे खेदाने म्हणावे लागत आहे.

 

रेल्वेस्थानकात एकूण तीन पूल आहेत. या पुलांवर कायम प्रवाशांची वर्दळ असते. सीएसटी आणि कल्याण दिशेचा पूल अरुंद असून मधला पूल हा तुलनेने मोठा आहे. या ठिकाणी आकर्षक रंगसंगती असलेली चित्रंही सामाजिक संदेशासह रेखाटण्यात आली आहेत. मात्र, या सामाजिक संदेशातून बोध न घेता उलट या मनमोहक चित्रांवरच पिचकाऱ्या मारण्यात काही बेशिस्त प्रवासी धन्यता मानत असल्याचे दिसून येते. वर्षभरापूर्वी स्थानकातील पायऱ्या व ब्रिजवर काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुंदर रंगसंगती साधत रंगकाम व चित्रे रेखाटली होती. मात्र या पायऱ्यावरही प्रवाशांनी घाण केली आहे. एकीकडे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून काही हात पुढे येत आहेत, तर दुसरीकडे स्वच्छता अभियानाला हरताळ फासण्याचे काम काही बेशिस्त प्रवासी करत आहेत.

 

रेल्वेस्थानकातील पुलांवर रेल्वेचे सफाई कर्मचारी मोठ्या मेहनतीने भिंतीवरील व इतर ठिकाणी प्रवाशांनी मारलेल्या पानाच्या पिचकाऱ्या स्वच्छ करण्याचे काम करत होते. मात्र, पिचकाऱ्याचे अनेक थर साचल्यामुळे ते स्वच्छ करताना या कर्मचाऱ्यांना घाम गाळावा लागला. “दर दोन तीन दिवसांनी आम्ही तासन्तास या ठिकाणी स्वच्छता करतो. काही नागरिक सतत थुंकून घाण करतात. यामुळे साफसफाई करण्याच्या कामाला अधिक विलंब होतो. मात्र, संपूर्ण स्वच्छता झाल्याशिवाय आम्ही काम करणे थांबवत नाही. आमचे कर्तव्य आम्ही पार पडतो,” असे या कर्मचाऱ्यांना सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@