माहिती चोरीची टांगती तलवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 

सध्याचं युग म्हणजे डिजिटल युग. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जमान्यात इंटरनेटवर असणारी निर्भरता ही गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत, असं म्हटलं जातं. अगदी तसंच या इंटरनेटच्या बाबतीतही लागू होतं. इंटरनेट वापरकर्त्यांची माहिती किती सुरक्षित आहे आणि ती कंपन्यांकडूनही किती सुरक्षित ठेवली जाते, हा यक्षप्रक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकदा वापरकर्त्यांच्या माहितीचा सर्रास गैरवापर होताना दिसतो किंवा ही माहिती इतर कंपन्यांना विकली जाते, या चर्चांना उधाण येते. या संदर्भात सध्या आपल्या देशात असलेले नियम हे पुरेसे नाहीत. काळानुरूप जसं तंत्रज्ञान बदलत गेलं, तसंच या नियमांमध्येही बदल होणं तितकंच गरजेचं आहे. मात्र, सध्या दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ने ग्राहकांची माहिती गोपनीय ठेवण्यासंदर्भात काही सूचना केल्या आहे. केंद्र सरकारकडून या सूचनांना मान्यता मिळाल्यास तो मोठा निर्णय ठरू शकतो. ‘ट्राय’च्या सूचनांनुसार ग्राहकांच्या संपूर्ण माहितीवर केवळ ग्राहकांचाच अधिकार असणार आहे आणि ती माहिती अन्य कोणत्या ठिकाणी शेअर करणे किंवा तिसऱ्या व्यक्तीला देण्याचा अधिकार हाही केवळ ग्राहकांनाच असेल. दूरसंचार सेवांसाठी दिल्या जाणाऱ्या लायसन्सच्या अटी-शर्तींमध्ये ग्राहकांची माहिती शेअर करण्यावर कंपन्यांवर बंधने घालण्यात आली आहेत. मात्र, दूरसंचार कंपन्यांकडून सर्रास डोळेझाक करत ग्राहकांची माहिती अन्य कंपन्यांना पुरवली जाते. मात्र, ‘ट्राय’ने आता या नव्या सूचना डिजिटल तंत्रज्ञानावरही लावण्याची शिफारस केली आहे. प्रत्येक वेळी ब्राऊसिंग करतानाही आपली कोणती ना कोणती माहिती निरनिराळ्या प्रकारे साठवली जात असते. मात्र, त्या माहितीचाही गैरवापर होऊ नये किंवा ती माहिती अन्य कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला मिळू नये यासाठी ती माहिती गोपनीय ठेवण्याचा किंवा नष्ट करण्याचा अधिकार हा केवळ ग्राहकांनाच देण्यात यावा, अशी शिफारसदेखील ‘ट्राय’कडून करण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर ‘ट्राय’ने केलेल्या शिफारशी या कायद्याच्या दृष्टीनेही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. यामुळेच ग्राहकांच्या माहितीच्या होणाऱ्या गैरवापरावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. मात्र, याला मंजुरी मिळेपर्यंत तरी ग्राहकांच्या डोक्यावर माहिती चोरीची टांगती तलवार कायम राहणार आहे.

 

आयुष्याची चाळण

 

रस्ते आणि त्यांची अक्षरश: झालेली चाळण, ठिकठिकाणी पडलेले खड्डे हा सध्या सर्वांचाच चर्चेचा विषय. अस्तित्वहीन पक्ष यावर आपली राजकीय पोळी भाजून आपलं राजकीय अस्तित्व टिकविण्याचा एकीकडे खटाटोप करताहेत, तर दुसरीकडे काही रेडिओवाल्यांनी त्यावर झोंबणारी गाणी केल्याने त्रस्त झालेले राजकारणी पोकळ धमक्या देत सुटले आहेत. मात्र, या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवांशी होणाऱ्या खेळाकडे सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील राजकारणीही सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या खड्ड्यांमुळे प्राण गमावलेल्यांची संख्या दुपटीने वाढली आहे आणि हे वास्तव सर्वांना स्वीकारणे अपरिहार्य आहे. गेल्या वर्षी देशभरात खड्ड्यांमुळे ३५९७ नागरिकांना आपले प्राण गमावले होते, तर राज्यातील स्थितीही याबाबतीत अशीच निराशाजनक. २०१६ च्या तुलनेत खड्ड्यांमुळे मृत पावलेल्या राज्यातील नागरिकांची संख्या ३२६ वरून ७२६ पर्यंत पोहोचली. मुंबईचे शांघाय करताना मात्र शहरांमधील प्रमुख समजल्या जाणाऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ही परिस्थिती आताची नाही. गेली अनेक वर्ष हिच परिस्थिती जैसे थे तशीच आहे. रस्ते हे किती जीवघेणे असतात, याचं उदाहरण मुंबईसह अनेक राज्यांमधील लोक घेतच आहेत. अभियंत्यांचे रस्तेबांधणीच्या वेळी होणारे दुर्लक्ष, पाहणी न करताच रस्ते पूर्ण झाल्याची नोंद, त्यातून मिळणारा मलिदा यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात खड्डेदुरुस्ती करण्यात येत नाही. कदाचित तसा काही नियमही आहे. मात्र, पावसाळ्यात खड्डे पडल्यानंतरही त्यांची दुरुस्ती करणं यासारखी उघड माथ्याने होणारी दुसरी कोणतीही फसवणूक नसेल. डांबराच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते जरी टिकाऊ असले तरी तापमान आणि पाणी मुरण्याच्या दृष्टीने त्यांना प्राधान्य देणे योग्य ठरत नाही,परंतु रस्ते तयार करण्यासाठी उभी राहिलेली साखळी, एकमेकांचे हितसंबंध, काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला अन्य कोणत्याही नावे देण्यात येणारे कंत्राट यामुळे रस्त्यांची आणि आणि पर्यायाने नागरिकांच्या आयुष्याचीच चाळण होताना दिसत असते. दरवर्षी हजारो कोटींचा खर्च करूनही हा खर्च खड्ड्यातच गेल्याचे चित्र आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. रस्तेबांधणीसाठी असलेले अन्य पर्याय आणि त्याकडे जाणूनबुजून करण्यात येणारे दुर्लक्ष आणि आपलेच घोडे दामटविण्याचा प्रयत्नच सर्वसामान्यांना यमसदनी पोहोचविण्यास कारणीभूत ठरत आहे.

@@AUTHORINFO_V1@@