जागतिक खाद्यसंस्कृती कृत्रिमतेकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |
 
 
 
‘द अॅयटलांटिक’ या लोकप्रिय नियतकालिकाच्या १३ जुलै २०१८ च्या आवृत्तीत साराह झांग यांचा ‘द फार्सियल बॅटल ओव्हर व्हॉट टू कॉल लब ग्रोन मीट’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि जगभरातील मीडियाने कान टवकारले. कारण आतापर्यंत जी गोष्ट कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षिली गेली होती, त्याबाबतीतला हा जगासाठीचा वेकअप कॉल होता.
 

भारतीय खाद्य संस्कृतीची विश्वात वेगळीच ओळख आहे. विविध व्रतवैकल्ये, धार्मिक सण, महिने यांमुळे शाकाहार जरी भारतीयांचा मूळ आहार असला तरी, आजमितीस भारतीय मांसाहारास विशेष पसंती देताना दिसतात. आधुनिक जगात विविध विश्वातील खाद्यसंस्कृतीही जवळ आली आहे. त्याचा परिणाम आपल्यावर होणे स्वाभाविक आहे. नुकतेच १२ जुलै रोजी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने एक लोकबैठक बोलावली होती. विषय होता ‘प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या वाढवल्या गेलेल्या टेस्ट-ट्यूब मांसाचा.’ या बैठकीत उपस्थितांनी, संशोधकांना पृच्छा केली की, ‘या मांसास काय संबोधायचे?’ क्लीन मीट (स्वच्छ मांस), कल्चर्ड मीट (प्रक्रियान्वित मांस), आर्टिफिशियल मीट (कृत्रिम मांस), इन व्हिट्रो मीट (बाह्यांगीकृत मांस), सेलकल्चर प्रॉडक्ट (कोशिकाप्रक्रियाधारित उत्पादन), कल्चर्ड टिश्यू (प्रक्रियाकृत ऊती-अमांस) अशी नावे यावेळी सुचवली गेली.

 

‘द अॅयटलांटिक’ या लोकप्रिय नियतकालिकाच्या १३ जुलै २०१८ च्या आवृत्तीत साराह झांग यांचा ‘द फार्सियल बॅटल ओव्हर व्हॉट टू कॉल लब ग्रोन मीट’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि जगभरातील मीडियाने कान टवकारले. कारण आतापर्यंत जी गोष्ट कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षिली गेली होती, त्याबाबतीतला हा जगासाठीचा वेकअप कॉल होता. खरेतर ही केवळ नामाभिधानाची प्रक्रिया नव्हती. हे उत्पादन स्वीकृत करून त्याला बाजारात आणण्याची परवानगी देत आहोत, याची ही चाचणी होती. प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या मांसावर संशोधन अनेक वर्षे सुरू होते. वैज्ञानिक मासिकांमधून त्यावर दोनेक शोधनिबंध प्रकाशित झाले होते. खरेतर ‘क्लोनिंग’च्या प्रयोगानंतर कृत्रिम अवयव बनवले जाऊ लागले, स्टेमसेल (कोशिका) हा जैवतंत्रज्ञानाचा मूलमंत्र झाला. कृत्रिम रक्तापासून ते मातीशिवाय चारा उगवण्यापर्यंत अनेक मौलिक शोध लावले गेले. अवकाशयानातील अंतरिक्ष चमूसाठी कॉम्पॅक्ट फूडची निर्मिती आकार घेत आहे. किमान आकाराच्या व वजनाच्या अन्नात जास्तीत जास्त कॅलरीज आणि जास्तीचे प्रोटीन्स असणाऱ्या डाएटच्या निर्मितीस वेग आला आहे. २००२ मध्ये नासा व तुर्की सरकारच्या एका शोध प्रकल्पाच्या पुढाकाराने प्रयोगशाळेत निर्मिलेले मानवी आहारास योग्य पहिले सामिष भोजन आकारास आले. ती डिश होती, गोल्डफिशच्या स्टेमसेल्सपासून बनवलेल्या फिश फिलेट्सची (माशाचे काप). याच वेळी दबक्या आवाजात कृत्रिम बीफची चर्चा सुरू झाली.

 

खरे तर या विषयावरची पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया विन्स्टन चर्चिल यांनी १९३१ मध्ये ‘पॉप्युलर सायन्स’ या अमेरिकी नियतकालिकाला दिली होती. तेव्हा चर्चिल म्हणाले होते की, “कोंबडीची एक तंगडी किंवा तिच्या शरीराचा काही भाग खाण्यासाठी अख्खी कोंबडी मारण्यापेक्षा जर तेवढंच मांस आपण योग्य माध्यमात वाढवू शकलो, तर अख्खी कोंबडी पोसायची गरज भासणार नाही.” याकडे एक कल्पनाविलास म्हणून तेव्हा पाहिलं गेलं. २००३ मध्ये हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या ओरॉन कॅट्स आणि त्यांच्या सहकार्यांनी काही सेंटिमीटर लांबीची मसल स्टिक निर्माण केली. २००५ मध्ये टिश्यू इंजिनिअरिंगच्या विज्ञान मासिकामध्ये प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या वाढवलेल्या मांसावरचा शोधनिबंध प्रकाशित केला तेव्हा ‘पेटा’चे याकडे लक्ष वेधले गेले. मग गुगलसह अनेकांनी याकडे ध्यान वळवले. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या अन्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा प्राणिरक्षण, भूतदयेसाठी काम करणाऱ्या ‘पेटा’चे कान टवकारले. ‘पेटा’ने २००८ मध्ये कृत्रिम मांस बनविणाऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला १० लाख डॉलरचं बक्षीस देण्यात येईल, असं जाहीर केलं. तेव्हा बराच ऊहापोह झाला. लोकांनी हा पैशाचा अपव्यय असल्याचं म्हटलं, तेव्हा तासाला दहा लाख प्राणी मारले जातात, त्यांच्या जिवासाठी दहा लाख डॉलरचा निधी वाया गेला तरी हरकत नाही, अशी आग्रही भूमिका ‘पेटा’ने घेतली. यापुढे जात नेदरलँड्सने २०१२ मध्ये ४० लक्ष अमेरिकी डॉलर अनुदान प्रयोगशाळेत मांसनिर्मिती करण्याच्या संशोधनासाठी जाहीर केले, पण त्याही आधी अशा प्रकल्पासाठी अमाप पैसा उपलब्ध होऊ लागला. याची योग्य ती परिणती होऊन आता हे मांस बाजारात येण्याची चिन्हे आहेत.

 

फूड इंडस्ट्री याला एक नव्या युगाची अभूतपूर्व संधी म्हणून पाहत आहे. हे मांस चव, वास आणि स्वरूप या मुद्द्यांच्या कसोट्यांवर सिद्ध झालेय. स्वच्छ, निर्जंतुक, समान चवीचे, समान रंगरूपाचे हे मांस वापरात आल्याने मांसाहारात मोठे बदल घडतील. तरीदेखील काही खवय्ये या मांसाला तुच्छतेने ‘फ्रँकेन मीट’ असं म्हणतात. हे मांस कृत्रिमरित्या निर्मिलेले असले तरी प्राण्यांच्या कोशिकेपासून ते बनले असल्याने त्याला मांसाहारच म्हणावे लागेल, हे स्पष्ट आहे. जोपर्यंत खनिज तेलातून कार्बनी रेणू मिळवून त्यापासून मांसजन्य पदार्थ निर्माण केला जात नाही, तोपर्यंत त्या मांसाला शाकाहारी मांस म्हणता येणार नाही.

 

- प्रवर देशपांडे 

@@AUTHORINFO_V1@@