मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2018
Total Views |

वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय

विठ्ठलाची पूजा घरीच करू; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन



मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून विठ्ठल पूजेसंबंधी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पंढरपूर दौरा रद्द केला आहे. पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण हा निर्णय घेतला असून विठ्ठलाची पूजा आपण आपल्या घरी देखील करू शकतो, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हातून होणारी विठूरायाची महापूजा यंदा मात्र होणार नाही.


मुंबई येथे एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. 'राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांना महापूजेचा मान दिला जातो. त्यामुळे विठ्ठलाची पूजा ही सर्व राजकीय आणि सामाजिक प्रश्नांच्या पलीकडली आहे. परंतु काही संघटना आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळू पाहत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षेसाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून आपण आपल्या घरीच विठ्ठलाची पूजा करू' असे त्यांनी म्हटले आहे.

वारकऱ्यांना वेठीस धरणारे महाराजांचे मावळे असूच शकत नाही


दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या पूजेला विरोध करणाऱ्या संघटनांवर फडणवीस यांनी यावेळी जोरदार टीका केली. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही संघटना या वारकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकऱ्यांना वेठीस धरून आपल्या मागण्या पूर्ण करू पाहत आहेत, त्यामुळे विठूरायाच्या वारकऱ्यांना वेठीस धरणारे लोक हे छत्रपतींच मावळे असूच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.


मराठा आरक्षणासाठी सरकार सर्वोत्त्परी प्रयत्न करत आहे


मराठा आरक्षणाच्या मुद्दा हा सध्या उच्च न्यायालयामध्ये असून सरकार यामध्ये कसल्याही प्रकाराचा हस्तक्षेप करू शकत नाही. आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता सरकार करत आहे. त्यामुळे सरकार आपल्या बाजूने सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे, हे मराठा समाजाने ध्यानात घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.


@@AUTHORINFO_V1@@