कानडा राजा पंढरीचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2018
Total Views |


 

 

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशीची वारी.

लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरपूरची वाट धरतात. ‘विठ्ठल... विठ्ठल...’ च्या जयघोषाने अवघे पंढरपूर दणाणून जाते. जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना ‘माऊली-माऊली’ची हाक देतात. माऊलींच्या अफाट प्रेमाचा हा अनोखा मेळावा बघणार्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच ‘आषाढी एकादशी’ हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपर्यातून ठिकठिकाणांहून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची पालखी येते.

 

महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकरी वर्ग हा खेड्यापाड्यात राहतो आणि त्या वर्गात आषाढीच्या वारीला सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीच्या काळात धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या म्हणजेच पंढरीत वारकरी चंद्रभागेच्या प्रेमात न्हाऊन, त्यांच्या आणि त्यांच्याच असणार्या लाडक्या, प्राणप्रिय अशा सावळ्या विठूमाऊलीच्या प्रेमात आकंठ डुंबून त्या सावळ्या परब्रह्माच्या चरणी स्वत:ला अर्पण करुन अमाप प्रेमाची लयलूट तर करतोच, पण साठवणही करतो आणि पुढे वर्षभर व्यवहारात वापरतो. हा असतो अक्षय असा त्याच्या परम निधानाचा प्रेमाचा साठा जो कधी संपूच शकत नाही.

 

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे कालगणना करताना मराठी वर्षामध्ये जो आषाढ महिना येतो, त्यातील पहिल्या पंधरवड्यातील शुद्ध/शुक्ल एकादशीला ’आषाढी एकादशी‘ असे म्हटले जाते आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. आषाढी एकादशीला ‘देवशयनी‘ (देवांच्या निद्रेची) एकादशी म्हणूनही ओळखले जाते

.

मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला ’देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी, असे म्हणतात. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असा समज प्रचलित आहे.

 

आषाढी एकादशीची एक कथाही सांगितली जाते. पौराणिक काळी म्हणजे फार पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने घोर तप करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि वर मागितला. तो तर भोळा सांब सदाशिवच! आणि या दैत्याने त्याचाच फायदा घेत या भोळ्या शिवाकडून अमरपद मिळवले. थोडक्यात काय, तर तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळविला. अर्थातच, त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्यामुळे या मृदुमान्याने उन्मत्त होऊन याच वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला. उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला, पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाले होते. नंतरब्रह्मा-विष्णू-महेश व सर्व देव त्रिकूट नावाच्या एका पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात तिथे ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांच्या श्वासाने एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने देवांना अभय देऊन गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे. नंतर देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की, माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील, ते सर्व पापांपासून मुक्त होतील.

 

आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हणतात हे आपण आधी पाहिलेच होते, तर या देवांच्या निद्राकालात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते, म्हणून अशा प्रकारे त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला. परस्परांवर प्रेम करणे, प्राणिमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.

 

सर्वे सुखिन: सन्तु । सर्वे सन्तु निरामया ।सर्वे भद्राणि पशन्तु । मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।

आषाढी एकादशीला बहुधा सामान्यजन व्रत वा उपवास करतात. आधी एक दिवस म्हणजे दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसीपत्र वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा, रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी काही लोक करतात.

पंढरपूरची वारी ः या व्रताला आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, षट्माह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, त्याप्रमाणे वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.

वारकरी संप्रदायात पंढरपूराला आपले माहेर म्हटले जाते आणि विठ्ठल-रखुमाईला आपले माय-बाप !

साखरेच्या गोडीलाही लाजवेल अशी अवीट मधुरता आहे-मी आणि माझा देव-किती सोपा, साधा, सहज भाव का नाही ते सावळे परब्रह्मही भुलणार? भक्तांच्या या भावाला-भाव तोचि देव ना मग घ्या प्रचिती-अठ्ठावीस युगे हा आपल्या लाडक्या भक्ताने पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर, कटीवर हात ठेवून उभाच आहे...

माझे माहेर पंढरी आहे, भीवरेच्या तिरी,

माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा

बाप अन आई माझी विठ्ठल-रखुमाई...’

पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे अत्यंत लाडके आणि लोकप्रिय दैवत आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी चालू आहे, असे वारकरी संप्रदायाच्या जडण-घडणीविषयी संत सांगतात,

संतकृपा झाली इमारत फळा आली ।

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ॥

नामा तयाचा हा किंकर। तेणे केला हा विस्तार ।

जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ॥

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥’

येथे ‘ज्ञानदेवे रचिला पाया।’ याचा अर्थ संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक दिली, असा आहे. पंढरपूरच्या वारीने हिंदू कुटुंब आणि समाज यात एकोपा वाढण्यास हातभार लावला आहे. व्रतांना अशा प्रकारे सामाजिक महत्त्व मिळाले असावे. महाराष्ट्रातील देव-धर्म संप्रदायांच्या रूपाने जी परंपरा ज्ञानेश्वरांपासूनच्या काळात अस्तित्वात आली, पुढे काही काळ त्यातील चैतन्य, उत्साह हा मावळत चालला अशी भीती दाटू लागताच एकनाथरूपी सूर्य नवचैतन्याने पुन्हा तळपू लागला आणि लोकांमध्ये देव आणि धर्म यांच्या अभिमानाचा उत्साह संचारला, असे निदर्शनास आले. पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्स्वरूप झालेला आहे, या अत्यंत पवित्र भावनेने, अत्यंत प्रेमाने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. सर्वांभूती परमेश्वर म्हणजेच सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, या भावनेला अनुभवायला मिळते. ’मीपण व तूपण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया...’

पंढरीच्या वारीत सर्वच वारकरी मोठ्या प्रेमाने एकत्र येतात, पायवारी करताना एकमेकांना आपले अनुभव सांगतात, नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवतात. आपल्या लाडक्या विठूरायाच्या, पंढरीरायाच्या म्हणजेच विठ्ठल भक्तीच्या प्रसाराच्या नवीन कल्पना सांगतात. वारीत नव्याने आलेल्या नवख्यांना जुने, जाणकार, अनुभवी वारकरी मार्गदर्शन करतात. प्रत्येकजण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत चालू आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात या प्रथेचे आणि पंढरीच्या वारीचे अतिशय जिवंत वर्णन साकार केले आहे ः

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई,

नाचती वैष्णव भाई रे ।

क्रोध अभिमान गेला पावतणी,

एक एका लागतील पायी रे ॥

गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा,

हार मिरविती गळा ।

टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव,

अनुपम्य सुखसोहळा रे ॥

वर्ण अभिमान विसरली याती,

एक एका लोटांगणी जाती ।

निर्मळ चित्ते झाली नवनीते,

पाषाणा पाझर सुटती रे ॥

होतो जयजयकार गर्जत अंबर,

मातले हे वैष्णव वीर रे ।

तुका म्हणे सोपी केली पायवाट,

उतरावया भवसागर रे ॥

आषाढ शुक्ल एकादशी व कार्तिक शुक्ल एकादशी या दोन एकादशांना ‘महाएकादशी’असे म्हणतात. त्यातील आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी तर कार्तिकी एकादशीला ’प्रबोधिनी एकादशी’ असेही म्हटले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णू शयन करतात (झोपतात) ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात, अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल एकदशीला होतो व कार्तिक शुक्ल एकादशीला संपतो. हे चार महिने व्रतस्थ राहायचे असून सणासुदींनी भरलेले असतात.

महाराष्ट्रातील विशेषत: भागवतपंथीय म्हणवणारे लोक या दिवशी उपवास तर करतातच पण शक्य असेल तर पंढरीची वारी करुन श्रीविठ्ठल दर्शन घेतात; नाहीच जमले तर गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात. अगदी लहान बाल गोपाळही या विठ्ठल सावळ्याच्या रुपात नटून जातात, किती लोभस, गोड रुपडे असते ना? आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णूशयनोत्सव असेही म्हणतात. चातुर्मास व्रतारंभ याच दिवशी करतात. यापुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात. ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना या दिवशी करतात. (संकलित)

रिंगण

वारकर्‍यांच्या प्रवासाचे एक स्वरूप असते. काही काळानंतर त्याला एकसुरीपणा येतो. तो एकसुरीपणा घालविण्यासाठी आणि मनोरंजनासाठी ’रिंगण’ नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पालखीबरोबर पार पाडला जातो. एखाद्या मोकळ्या मैदानाच्या जागी भक्तगण गोळा होतात आणि उभे किंवा वर्तुळाकार रिंगण तयार केले जाते. म्हणजे पालखी, ध्वज हे मध्यभागी ठेवून भक्तगण त्याभोवती वर्तुळाकारात उभे राहतात किंवा दोन समांतर ओळीत उभे राहतात. रिंगणात रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. मानाचे दोन अश्व हे प्रशिक्षित असतात.

एका अश्वावर कुणीच आरूढ होत नाहीत. त्याला ’माऊलीचा’ अश्व म्हणतात. दुसर्‍या अश्वावर एक कानडी घोडेस्वार आरूढ होतो. माऊलीचा अश्व सुमारे एक कि. मी. वरून पळत येऊन रथात असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना मान टेकवून नमस्कार करतो, रथाला प्रदक्षिणा घालतो आणि चोपदाराने आदेश दिला की पुन्हा पळत जातो. हा क्षण पाहण्यासाठी लाखो वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पहात असतात. ठराविक संकेतानंतर हे अश्व गोलगोल फेर्‍या घालून रिंगण घालतात किंवा समांतर उभ्या राहिलेल्या वारकर्‍यांमधून एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे धावतात. अश्वाला स्पर्श करण्यासाठी वारकरी आसुसलेले असतात. मानाच्या अश्वाची रिंगणे झाली की, वारकरी त्या रिंगणात उतरून झिम्मा-फुगडी, विविध प्रकारच्या उड्या, लेझिम, भारुडे असे सामुदायिक खेळ खेळतात. खेळात भाग न घेतलेले वारकरी बाहेरच्या गोलात उभे राहून हा मनोरंजनाचा कार्यक्रम पहातात. पालखीच्या मुक्कामात गावोगावी अशी रिंगणे होतात.

पंढरपूरची काही वैशिष्ट्ये

पंढरपूर हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला ‘महायोगपीठ’ म्हटले आहे. (त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणारे ‘पांडुरंगाष्टकम’सुद्धा रचले आहे.) पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. यासंदर्भात पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत.

चंद्रभागा : पंढरपूरला जी ‘चंद्रभागा’ आहे, ती भीमाशंकरच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे ‘भीमा’ झाली. तीच पंढरपुरात मांड खडकापासून विष्णुपद स्थानापर्यंत पाऊण मैल चंद्रकोरीप्रमाणे वाहते, म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते.

लोहतीर्थ : एकदा शंकर-पार्वती वरुणराजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली. तेव्हा ते भीमानदीच्या काठावर थांबले. तेथे शंकराने त्याच्या त्रिशूळाने पाताळगंगेला वर आणले. ती वर येताच दोघांनी आपली तहान भागवली. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने त्या प्रवाहाला ‘लोहतीर्थ’ हे नाव दिले. चंद्रभागेच्या जवळच ‘लोहतीर्थ’ आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्रीकृष्णतत्त्व आणि श्रीविष्णुतत्त्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी, म्हणजेच सगुण तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणार्‍यांसाठी ही मूर्ती लाभदायक आहे. तसेच ब्रह्मगण, शिवगण आणि अनेक शक्तीगण यांनाही अंगाखांद्यावर खेळवणारी ही मूर्ती असल्याने सर्वच स्तरांवरील उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारी आहे, म्हणून सर्वच स्तरांवरील भक्तगण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला भजणारे आहेत.

 
- प्रा. विजया मारोतकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@