ब्लॉगिंग, मायक्रो-ब्लॉगिंग आणि उत्पन्नाचे स्त्रोत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2018
Total Views |


 

आजकाल ब्लॉगिंग किंवा ब्लॉगर्सची मोठ्याप्रमाणावर चलती आहे. हे ब्लॉगर्स वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांमध्ये प्रसिद्ध होतात आणि मग त्याच ब्लॉगद्वारे उत्पन्न देखील मिळवतात. मागील लेखांमध्ये आपण गुगल अ‍ॅडसन्स, ट्विटरच्या माध्यमातून उत्पन्न कसे कमावता येते, ते पाहिले. जे काही उत्पन्नाचे नवनवीन स्रोत आपल्या समोर आहेत, त्यापैकीच एक म्हणजे ब्लॉगिंगद्वारा पैसे कमाविणे. सध्या बरेचसे ब्लॉगर्स ब्लॉगिंगच्या माध्यमातून चांगलेच उत्पन्न कमावताना दिसतात. भारतातील आयटी क्षेत्रात कार्यरत बरेच ब्लॉगर्सही वैविध्यपूर्ण मजकुराच्या आधारे प्रसिद्धी कमावून नंतर ब्लॉग्सच्या आर्थिक गणितांवर भर देतात. अमित अग्रवाल, अमित भवानी, हर्ष अग्रवाल, श्रीनिवास तमाडा, जसपाल सिंग, अरुण प्रभुदेसाई हे असेच काही भारतातील नामांकीत ब्लॉगर्स. याखेरीज बरेचसे सेलिब्रिटीचे ब्लॉगदेखील तितकेच प्रसिद्ध आहेत. अमिताभ बच्चन यांचे एक मोठे उदाहरण यासंदर्भात नक्कीच देता येईल.
 

ब्लॉग म्हणजे नेमके काय?

ब्लॉग मुळात एक वेबसाईटच असते की, ज्यावर आपण नियमित पद्धतीने आपल्याकडे असलेली माहिती, आपले अनुभव किंवा कोणत्याही विशिष्ट गोष्टींबाबत मार्गदर्शन अशाप्रकारचे लिखाण करू शकतो, फोटो-व्हिडिओ शेअर करु शकतो. आधीच्या काळी लोकं डायरी लिहायचे, पत्र लिहायचे आणि नंतर ते प्रसिद्धही करत होते. त्याच पद्धतीने आपण इंटरनेटवर काहीतरी लिहित आहोत, तर त्याला आपण ‘ब्लॉग’ म्हणतो. ‘वेबब्लॉग’ चा शॉर्टफॉर्म ‘ब्लॉग’ म्हणून ओळखला जातो आणि तुमचा ब्लॉग आहे आणि सातत्याने तुम्ही त्यावर लिहिता, त्यालाच ‘ब्लॉगिंग’ असे म्हटले जाते आणि ‘ब्लॉगर’ म्हणजे ब्लॉग लिहिणारा लेखक.

 

ब्लॉगचे फायदे काय?

आपल्याकडे असलेली माहिती दुसर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, आपल्या भावना प्रकट करण्यासाठी, लोकांना कामाची प्राप्ती व्हावी यासाठी लोक ब्लॉग लिहितात. ब्लॉग जो कोणी वाचतो, तो कोणत्या तरी एका विशिष्ट विषयावर इंटरनेटवरती वेगवेगळे ब्लॉग वाचू शकतो. वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती, गणमान्य व्यक्ती, संशोधक या सगळ्यांचे ब्लॉग प्रसिद्ध असतात. हे ब्लॉगर्स इतके प्रसिद्ध झालेले आहेत की, त्यांच्या ब्लॉगला लाखो लोकं भेट देतात आणि त्यामुळे त्याला इंटरनेटच्या भाषेत ’ट्राफिक‘ त्याच्या ब्लॉगवर वाढत जाते. त्याचा फायदा निश्चितपणे त्या ब्लॉगरला जाहिराती मिळवण्यासाठी होतो.

 

ब्लॉग किंवा ब्लॉगिंग

बहुतांशी ब्लॉग्स हे वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध असतात. पण, काही ब्लॉग्स वाचण्यासाठी तुम्हाला विशिष्ट फी आकारणीही केली जाते. ब्लॉगिंगसाठी खूप जास्त गुंतवणुकीची अजिबात गरज भासत नाही. काहीजण प्रायोगिक तत्त्वावर ब्लॉग सुरू करण्यासाठी ब्लॉगस्पॉटवरती मोफत स्वत:चे ब्लॉग नेम तयार करू शकतात. मात्र, जर त्यातून उत्पन्न मिळवायचे असेल, तर त्यामध्ये खूप सारे अडथळे येतात आणि म्हणून ब्लॉग चालवणे कठीण होते. त्याकरिता आपल्याला विशिष्ट डोमेन नेम हे रजिस्टर करावे लागते आणि त्याचे एक्सटेन्शन. .com,.in,.org,.net पशीं असे कोणतेही असू शकते. जर आपल्याला डोमेन नेम रजिस्टर करायचे असेल, तर big rock,Daddy ऊरववू अशा कंपन्या अगदी स्वस्तात अगदी १०० -१५० रुपयांमध्ये डोमेन नेम रजिस्टर करून देतात. हे डोमेन नेम रजिस्टर करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, आपण ज्या कोणत्या मुद्द्यांवरती बोलणार आहोत, जे मुद्दे हाताळणार आहोत, त्याच्याशी ते संबंधित असणं आवश्यक आहे, त्यानंतरच आपण ब्लॉगिंगची पुढची पायरी गाठू शकतो.

 

वेबहोस्टिंग म्हणजे काय?

‘वेबहोस्टिंग’ म्हणजे जिथे आपण आपले लेख, छायाचित्र किंवा फाईल प्रसिद्ध करतो. कोणीही युजर आपल्या वेबसाईटचे पोस्ट पाहू शकतो, वाचू शकतो, ते डाऊनलोड करू शकतो. काही ब्लॉगवर हे वेबहोस्टिंग मोफत असते, तर काही वेळा वेबहोस्टिंगसाठी थोडीशी गुंतवणूक केली जाते. अशा खूप ऑनलाईन वेबसाईट असतात, ज्यांना वेबहोस्टिंगसाठी नाममात्र १५० ते २०० रुपये महिना शुल्क घेऊन तुमच्या ब्लॉगचा प्रचार-प्रसार होऊ शकतो. आपल्या ब्लॉगवरील लिखाण कोणत्या व्यासपीठावरती लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे आणि सिद्ध करायचे आहे, ते आपण जाणून घेणे आवश्यक असते. जर तुमचे लेख वाचणारे खूप लोक आहेत, तर मग आपण मोफत होस्टिंग देऊ शकतो किंवा आपल्याला आणखीन लोक मिळवायचे असतील, तर आपण त्याला ’पेड होस्टिंग‘ देऊ शकतो.

 

ब्लॉगिंगसाठी ‘word press’ हे खूप चांगले व्यासपीठ असून ते आपल्याला मोफत उपलब्ध असते आणि त्यासाठी तुम्हाला होस्टिंगसाठी ‘word press install’ करावे लागते. मग त्यानंतर आपण काही मूलभूत गोष्टी म्हणजेच ब्लॉगचे नाव, ब्लॉगचे url किंवा काही सेटिंगच्या माध्यमातून ब्लॉगिंगचे व्यासपीठ तयार होऊ शकते.

 

ब्लॉगची प्रसिद्धी किंवा पोस्ट करणे

आपला ब्लॉग सेटअप झाल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो, तो वेगवेगळ्या मुद्द्यांवरील लेखांचा. एखादा लेख लिहिताना त्याविषयी विस्तृत किंवा सखोल माहिती असणे आवश्यक आहे. स्वानुभवावर आधारित लेखांची ब्लॉगवरती सर्वाधिक चलती असते. पण, काही वेळेला विषय विश्‍लेषणात्मक असेल, तर गुगलवर सर्च करून विविध ब्लॉगर्सचेस लेखकांचे म्हणणेही आपण जाणून घेऊ शकतो. अर्थात, हे करताना त्या ब्लॉगवरील माहिती आपल्याला तशीच्या तशी कॉपी-पेस्ट करणे अपेक्षित नाही. अशी मजकुराची चोरी केल्यास तुमच्या ब्लॉगचा दर्जा खालावतो आणि तुम्हाला फॉलो करणारे फॉलोअर्सदेखील कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लॉग सुरु केल्यानंतर त्यावर सातत्याने काही ना काही लिहिणे, तो अपडेट ठेवणे आवश्यक आहे. एकदाच खूप सारे लेख टाकले आणि नंतर दोन-तीन महिने ब्लॉगवर काहीही पोस्ट केले नाही, असे होता कामा नये. ब्लॉग पोस्ट करताना त्यामध्ये नियमितता असणे अत्यावश्यक आहे; जेणेकरून लोकांना देखील आपल्याला फॉलो करणे सोपे जाते. सातत्याने एकानंतर एक आपण आपले ब्लॉग प्रसिद्ध करत राहिलो, तर जे आपल्या ब्लॉगला भेट देणारे व्हिजिटर्स आहेत, त्यांना नवनवीन माहिती मिळते, आंतरक्रिया घडून यायला मदत मिळते आणि ते लोकही आपल्या ब्लॉगला दुसरीकडे लिंक पाठवून प्रमोट करतात आणि आपल्या व्हिजिटर्सच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते. ब्लॉगिंगविषयी जेव्हा आपल्याला करिअरचा विचार करायचा आहे त्यावेळी आपल्याला आणखीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या पुढीलप्रमाणे :

 

1. मानवी स्वारस्य आणि त्यांच्या गरजा ओळखणे

आपल्याला वाचकांची रुची नेमकी कशामध्ये आहे, हे जाणून घेणे फार आवश्यक आहे आणि त्यांच्या अभिरुचीप्रमाणे आपण लिखाण केल्यास ते निश्‍चितच त्यांच्या पसंतीस उतरते. फक्त पैसे मिळवण्यासाठी लिखाण केले तर मजकूराच्या दर्जात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. काही हलक्या-फुलक्या विषयांची हाताळणी आपण करू शकतो. व्यापार, करिअर, संगीत किंवा असे विषय ज्या विषयी आपल्याला सखोल माहिती आहे, अशा विषयांवर आपल्याला लिहिता येऊ शकते.

2. लोकांना होणारे फायदे आणि लोकांचे लक्ष्य

तुमच्या ब्लॉगमधून लोकांना काय फायदा होतो, हे बघणे जास्त आवश्यक असते. कोणत्यातरी निश्चित विषयांवर त्यांना माहिती हवी असते. यावर लक्ष देऊन लोकांच्या गरजेनुसार विषयांची हाताळणी करावी लागते आणि त्यानुसार त्यांना माहिती द्यावी लागते. उदा. कोणाला फिटनेसबद्दल काही माहिती हवी असेल, कोणाला आर्थिक घडामोडींविषयी माहिती हवी असेल, कोणाला लग्नसमारंभाबद्दल माहिती हवी असेल, तर त्यासंबंधी काऊन्सिलिंग देखील ब्लॉगच्या माध्यामातून होऊ शकते. असे वेगवेगळे विषय आपण हाताळायला हवेत. फक्त अशा विषयांची हाताळणी करत असताना आपल्याला विशिष्ट विषयांशी निगडीत ब्लॉग लिहिणे आवश्यक आहे. आपले विषय एकमेकांशी संबंधित असावे हे लक्षात ठेवावे लागते. जितके आपण आपल्या विषयांशी संबंधित लेखन करु, त्यामध्ये आपण ज्या शब्दांना ’की वर्ड्स‘ म्हणतो, त्या शब्दांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. जेणेकरून जेव्हा कोणीतरी सर्च करेल, तेव्हा आपल्या ब्लॉगचा क्रमांक हा शोध यादीमध्ये वरच्या क्रमांकावर येईल. त्यामुळे लोकांच्या स्वारस्यानुसार विषय निवडावे आणि नंतर त्यांना इतर विषयांची जोड देऊन ब्लॉगचे ट्राफिक वाढवता येते.

 

जर आपल्या ब्लॉगचा विषय इतर कोणत्या तरी महत्त्वपूर्ण ब्लॉगर्सशी संबंधित असेल, तर आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी विषयाची हाताळणी थोडी वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते.

ब्लॉगिंगविषयीची महत्त्वाची माहिती, त्याद्वारे पैसे मिळवण्याचे आणखी इतर मार्ग आणि मायक्रोब्लॉगिंग याविषयी आपण पुढील लेखामध्ये विस्तृतपणे जाणून घेऊया...

-प्रा. गजेंद्र देवडा

@@AUTHORINFO_V1@@