पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आनंददायक ठरणारा निर्णय व्यवस्थापन परिषदेकडून नुकताच घेण्यात आला आहे.
या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत होत असलेल्या सर्व शैक्षणिक प्रवेशांव्यतिरिक्त (अॅडमिशन) इतर प्रवेशांसाठी परदेशी/पीआयओ (पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन)/ओसीआय (ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडियन) विद्यार्थ्यांकडून आता पाच पट ऐवजी तीन पट शैक्षणिक शुल्क घेण्यास परिषदेने मान्यता दिली आहे. याचबरोबर, एनआरआय (अनिवासी भारतीय) आणि सार्क (दी साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन) देशांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या शुल्कामध्येही कपात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांकडून आता तीन पट ऐवजी दुप्पट शैक्षणिक शुल्क आकारले जाणार आहे.
या निर्णयामुळे विद्यापीठ व इतर संलग्न शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी माहिती विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी दिली.