धो डाला...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2018
Total Views |

मोदींकडून काँग्रेस, गांधी घराण्याची धुलाई: संसदेत अविश्‍वास प्रस्ताव बहुमताने फेटाळला


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित रालोआ सरकारविरुद्ध तेलुगू देसम पक्षासह विरोधी पक्षांनी लोकसभेत आणलेला अविश्वास प्रस्ताव आणि त्यावरील चर्चा रात्री अकरापेक्षाही अधिक वेळ चालली. मात्र, या दरम्यान सदर प्रस्ताव १२६ वि. ३२५ अशा मताधिक्याने फेटाळला गेला आणि भाजपने पुन्हा एकदा आपली सत्तेवरील मजबूत पकड सिद्ध केली. हे होणे तर अपेक्षित होतेच, मात्र यादरम्यान दिवसभर लोकसभेत झालेल्या नाटकबाजीमुळे, विशेषतः काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केलेल्या कृतींमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह सर्वच विरोधकांच्या घेतलेल्या खरपूस समाचारामुळे शुक्रवार, दि. २० जुलैचा दिवस संस्मरणीय ठरला. सकाळी अकरापासून रात्री दहा-साडेदहापेक्षाही अधिक वेळेपर्यंत चाललेल्या या रणसंग्रामानंतर अखेर पुन्हा एकदा ‘सब कुछ नरेंद्र मोदी’ हेच तत्त्व सिद्ध झाले.
 
रात्री साडेनऊच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. या संपूर्ण भाषणात त्यांनी विरोधकांची चांगलीच धुलाई केली. ते म्हणाले की, ” ३० वर्षांनंतर या देशात बहुमताचे सरकार आले आहे.” विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाचे स्वागत करत ते म्हणाले की, ”हा प्रस्ताव म्हणजे देशातील जनतेला विरोधकांचा नकारात्मक, विकासविरोधी चेहरा दाखविण्याची संधी आहे. एकट्या मोदीला हटविण्यासाठी एवढा खटाटोप का केला जात आहे? आमच्याकडे सभागृहातील संख्याबळ आणि १२५ कोटी देशवासीयांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी देशवासीयांवर अविश्वास दाखवू नका,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी टीडीपीसह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी गदारोळ आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. काही वेळ थांबून धो डाला...!
 
 
पंतप्रधानांनी पुन्हा या गोंधळातच भाषण सुरू केले. यावेळी त्यांनी रालोआ सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या विकासात्मक कामाचा दाखला दिला. पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार, कृषी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी असंख्य क्षेत्रांत सरकारने केलेल्या कामाची उदाहरणे देत या कामावर विरोधकांचा विश्वास नसल्याचे ते म्हणाले. आज भारत ही देशातील सहाव्या क्रमांकाची बलाढ्य अर्थव्यवस्था बनली असून हे श्रेय सरकारचे नसून देशातील १२५ कोटी जनतेच्या पुरुषार्थाचे असल्याचे मोदींनी सांगितले. काँग्रेस पक्ष हा स्वतः तर जमिनीपासून दूर गेलाच आहे, परंतु त्यांच्यासोबत जाणार्‍या लोकांचीही हीच अवस्था होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
 
भारतासह जगभरातील सामान्य व्यक्ती, तज्ज्ञ व्यक्ती, नामवंत संस्था वारंवार सांगत आहेत की, देशाची प्रगती होत आहे. मात्र, विरोधकांचा यावर विश्वास नाही. कारण, ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही, त्यांचा इतरांवर आणि आमच्यावर कसा विश्वास असेल. अविश्वास ही तर काँग्रेसची पारंपरिक कार्यशैली असल्याचा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसला या देशातील लोकशाही, अर्थव्यवस्था, न्यायालय, मुख्य न्यायाधीश, निवडणूक आयोग, इव्हीएम मशीन, कशावरच विश्वास नसल्याचे ते म्हणाले. डोकलाम वाद, राफेल करार वाद आणि सर्जिकल स्ट्राईकविषयी विरोधकांनी केलेल्या वक्तव्यांचा मोदींनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, देशाच्या सुरक्षेशी संबंधित इतक्या महत्त्वाच्या विषयावर विरोधकांकडून पोरखेळ का मांडला जात आहे? देश याबद्दल तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही सर्जिकल स्ट्राईकला ’जुमला स्ट्राईक’ म्हणालात. तुम्ही एकवेळ मोदीला शिव्या द्या, परंतु देशासाठी जे जवान प्राणांची आहुती देत आहेत, त्यांना शिव्या देऊ नका, हा या देशाच्या सैन्याचा घोर अपमान असल्याची टीका त्यांनी केली. पिढ्यान्पिढ्या काँग्रेसने इतरांवर अविश्वासच दाखवला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळेच आता ते आम्हाला मिळालेल्या स्थिर जनादेशाला अस्थिर बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी त्यांनी इतिहासात काँग्रेसने केलेल्या विश्वासघाताचे दाखले देत, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांची उदाहरणे दिली. तसेच, विश्वासमत खरेदी करण्यासाठी ‘वोट के बदले नोट’ प्रकरणाचाही त्यांनी उल्लेख केला. रात्री पावणेअकराहून अधिक वेळ पंतप्रधान मोदी यांचे हे प्रदीर्घ भाषण सुरू होते.
 
शिवसेनेचे वाघ रणमैदानातून पळाले !
 
एरवी स्वबळाच्या डरकाळ्या फोडत व्याघ्रगर्जना करणार्‍या शिवसेनेने ऐन रणमैदानात मात्र पळपुटी भूमिका घेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला आणि मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. भाजपसोबतही जाऊ शकत नाही आणि काँग्रेससोबत तर त्याहून जाऊ शकत नाही, अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या शिवसेनेने कोणतीही ठाम भूमिका घेण्याऐवजी सुरक्षितपणे पळ काढत कामकाजावरच बहिष्कार टाकला.
 
‘मोदीजी बारमध्ये जातात !’
 
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौर्‍यांवर टीका करताना, ‘मोदीजी बाहर जाते हैं’ ऐवजी ‘मोदीजी बारमें जाते है’ असे म्हटले आणि पंतप्रधान मोदींसह सर्व सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. त्याचप्रमाणे ‘’मी जे मुद्दे मांडत आहे, त्यानंतर मोदी माझ्या डोळ्याला डोळे भिडवू शकत नाहीत.” असाही आरोप गांधी यांनी केला. त्यांच्या या आरोपालाही पंतप्रधान मनमोकळेपणाने हसताना दिसले.
 
सुमित्रा महाजन संतप्त
 
राहुल गांधी पंतप्रधानांना मारलेली मिठी आणि त्यानंतर आपल्या सहकार्‍यांना डोळे मारणे पाहून लोकसभा अध्यक्ष चांगल्याच खवळल्या. अशाप्रकारे अचानक मिठी मारणे आणि आपल्या बाकावर जाऊन डोळा मारणे, हे योग्य नाही. "राहुल गांधी काही माझे शत्रू नाहीत, ते मला मुलासारखेच आहेत परंतु, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे हे आपलेच कर्तव्य आहे,” अशा स्पष्ट शब्दांत महाजन यांनी राहुलना खडसावले.
 
काँग्रेस, गांधी घराण्याचा खरपूस समाचार
 
या भाषणात मोदींनी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी, नेहरू-गांधी परिवार आणि काँग्रेसचा जोरदार समाचार घेतला. राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, ”पंतप्रधान माझ्या डोळ्यात बघून बोलू शकणार नाहीत.” यावर मोदी म्हणाले की, ”मी एका गरीब आईचा मुलगा, खालच्या जातीत जन्माला आलेला आहे. तुम्ही नामदार आहात, मी कामदार आहे. मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून कसा बोलणार?” त्यांनी यावेळी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्यासह मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण ते अगदी प्रणव मुखर्जी, शरद पवार यांना काँग्रेसने विशेषतः नेहरू-गांधी घराण्याने कशी वागणूक दिली, याची आठवण करून दिली. ज्यांनी या घराण्याच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचा प्रयत्न केला, त्यांना या घराण्याने नेहमीच अपमानित केल्याचे ते म्हणाले. ”मोदी चौकीदार नाहीत तर भागीदार आहेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली. यावर मोदी म्हणाले की, ”होय आम्ही चौकीदार आहोत, भागीदारही आहोत. तुमच्यासारखे सौदागर, ठेकेदार नाही. देशातील गरीब, शेतकरी, शोषित-वंचितांच्या दुःखांचे, स्वप्नांचे आम्ही भागीदार आहोत. आम्हाला त्याचा गर्व असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले.
 

राहुल गांधींची गळाभेट
 
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणानंतर चक्क पलीकडच्या बाकांवर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट मिठीच मारली. त्यांच्या या कृतीने सर्व सभागृह, स्वतः नरेंद्र मोदीही अवाक् झाले. ही कृती करून राहुल यांनी जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु सोशल मीडियासह सर्वत्र देशभरात त्यांच्या या कृतीची चांगलीच फजिती उडाली. या गळाभेटीवर विविध विनोद, व्हिडिओ आदींची रेलचेल सोशल मीडियावर पाहायला मिळाली.
@@AUTHORINFO_V1@@