अविश्‍वासाचा जुमला तुला जमला नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2018
Total Views |

 
रोजगाराचा प्रश्‍न असेल किंवा राफेल कराराचा मुद्दा, राहुलनी केलेले सर्व आरोप हे अर्धवट आणि अपुर्‍या माहितीच्या जोरावर. त्यानेही काही साध्य होत नाही म्हटल्यावर आता ‘आम्ही सेक्युलर’ म्हणवणारी मंडळी हिंदुत्वाच्या रामकथांची पारायणं करतही सुटली आहेत. जनुवेधारी, सश्रद्ध असे हे निर्मळ मनाचे असलेले काँग्रेस अध्यक्ष आता जिथे-तिथे ‘मी किती हिंदू’ याचेच दाखले देताना दिसतात.
 
शुक्रवारी लोकसभेत मोदी सरकारविरोधात रंगलेल्या अविश्‍वास ठरावाच्या राजकीय नाट्यावर हसावे की रडावे, हेच कळत नाही. कारण, पूर्ण बहुमताच्या सरकारच्या विरोधात हा अविश्‍वास ठरावाचा काँग्रेस आणि विरोेधकांचा ‘जुमला’ खरं तर संसदेच्या अमूल्य वेळेचा सर्वार्थाने अपव्यय करणाराच ठरला. त्यातच काँग्रेसचे युवराज-अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाचा संसदेतील ‘हास्याचा तास’ सुरू होताच वातावरण एकदमच पालटले. “आगामी निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव करून काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल,” अशा खरंच मुळात फाजील आशावादी आणि हास्यास्पद विधानाने राहुलने भाषणासाठी तोंड उघडले. ही तर सुरुवातच होती आणि पुढे राहुल यांचे भाषण म्हणजे ‘कॉमेडी विथ काँग्रेस’चा एकपात्री प्रयोगच. त्यामुळे त्यांच्या मागच्या-पुढच्या खासदारांचे चेहरेही पडलेले. त्या सगळ्यांना कदाचित हीच भीती मनोमनी सतावत असेल की, ‘बोलायला आमचे युवराज उभे तर राहिले, पण आज काय पुढ्यात फजिती वाढून ठेवलेली असेल बरे...’ अन् नेमके झालेही तसेच. राहुल यांचे भाषण म्हणजे मनोरंजनाचा संसदेतील शून्य प्रहरच. सवयीप्रमाणे सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालण्याऐवजी युवराजांनी केलेला खरं तर तो बालिश मनोरंजनाचा प्रयोगच म्हणावा लागेल.
 
संसदेत विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर अविश्‍वास का, याचे पोकळ पाढे त्यांनी वाचून दाखविले. मोदी ‘बाहेर’गावी जातात ऐवजी ‘बार’मध्ये जातात, अशी बोबडी वळलेले असे हे काँग्रेसचे म्हणे अध्यक्ष. मोदींवर तोंडसुख घेताना शब्द सुचत नसले, काही उमगत नसले तरी ओढाताण करून भाषणबाजी करत संसदेचे हास्याचे कारंजे फुलवणारा हा काँग्रेसचा विदूषकच. “भाजप-संघाला मी आवडत नाही. तुम्ही मला पप्पू म्हणता,” वगैरे वगैरे फुकटची भाषणबाजी करून राहुल चक्क मोदींना झप्पी देऊन आले. हस्तांदोलनही केले. “माझ्या मनात मात्र मोदींविरोधात वैयक्तिक दोष नाही,” अशी वरवरची सारवासारवही केली. म्हणजे, आधी नाहक टीकेचा टोकाचा सूर आळवायचा आणि नंतर ‘हग डिप्लोमसी’ करून ‘मतभेद आहेत, मनभेद नाहीत,’ सारखी घासून गुळगुळीत झालेल्या वाक्यांची गुळणी करायची, याने काय साध्य होणार? गळाभेटीनंतरही मोदींनी भाषण करताना राहुलसह विरोधकांच्या अविश्‍वासातील हवाच काढली आणि तुफान टोलेबाजी करुन काँग्रेसला स्वत:वरच अविश्‍वास असल्याचे सांगत नकारात्मक राजकारणाचा हा रडीचा डाव हाणून पाडला. पण, राहुल अपरिपक्व असल्यामुळे त्याचे त्यांना निश्‍चितच भान नाही. रोजगाराचा प्रश्‍न असेल किंवा राफेल कराराचा मुद्दा, राहुलनी केलेेले सर्व आरोप हे अर्धवट आणि अपुर्‍या माहितीच्या जोरावर केलेले. त्यानेही काही साध्य होत नाही म्हटल्यावर आता ‘आम्ही सेक्युलर’ म्हणवणारी मंडळी हिंदुत्वाच्या रामकथांची पारायणं करतही सुटली आहेत. जनुवेधारी, सश्रद्ध असे हे निर्मळ मनाचे असलेले काँग्रेस अध्यक्ष आता जिथे-तिथे ‘मी किती हिंदू,’ याचेच दाखले देताना दिसतात. त्यासाठी चक्क राजीव गांधींच्या अंत्यसंस्कारावेळेची राहुल गांधींची क्‍लीपही हल्लीच व्हायरल झाली. त्यामुळे एकेकाळी स्वत:ला सार्वजनिक आयुष्यात ‘हिंदू’ म्हणवून घ्यायला लाज वाटणारे हेच राहुल गांधी स्वत:ला आता ‘हिंदू’ म्हणून मिरविण्याचा तोंडदेखला प्रतिमासंवर्धनाचा प्रयत्न करताना गुजरात निवडणुकीच्या वेळी अवघ्या देशानेच पाहिले. खरे तर हे संघाचे आणि भाजपचेच यश म्हणावे लागेल की, एकेकाळी ‘हिंदू’ म्हणून जाहीर कबुली द्यायला ज्यांची बोबडी वळायची, तेच आता हिंदुत्वाचा कलश माथ्यावर घेऊन नाचवत आहेत.
 
अशाप्रकारे इतर महत्त्वाची विधेयके, चर्चा प्रलंबित असताना मान्सून अधिवेशनातील संसदेच्या सत्राचा आणखी एक दिवस विरोधकांनी अविश्‍वासाच्या अर्धवट ज्ञानापोटी अक्षरक्ष: वाया घालवला. ‘हाती’ काहीच लागणार नाही, याची चांगलीच जाणीव असूनसुद्धा तेलुगू देसमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळे अविश्‍वास ठरावाचे कागदी घोडे उगाच संसदेत नाचविण्यात आले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी संपूर्ण केंद्र सरकारवर अविश्‍वास ठराव दाखल करायची ही कदाचित संसदेतील पहिलीच वेळ असावी. त्यामुळे काँग्रेससह, सप, बसप, तृणमूल-राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही लगोलग वाहत्या गंगेत हात धुवून अविश्‍वास प्रस्तावाला हवा दिली. ही ठिणगी जणू वणवा बनून पेट घेईल आणि मोदी सरकार त्यात भस्मसात होईल, या कुटील भावनेनेच विरोधकांना उकळ्या फुटल्या असाव्यात, पण तसे काहीही झाले नाही, उलट विरोधकांच्या या खुळ्या ‘अविश्‍वासाने’ त्यांच्यातील आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्याचा ‘विश्‍वासच’ आताच कसा आडवा झाला आहे, याची प्रचिती अवघ्या देशाला आली.
 
भारतीय लोकशाहीत संसद हे अभ्यासपूर्ण भाषणांचे एक सर्वोच्च सभागृह. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यांची संसदेतील भाषणे आजही तितकीच संदर्भमूल्य जोपासणारी. पण, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून संसदेला चर्चांचाही नाही, केवळ गोंधळाचा आखाडा बनविण्याचे काम काँग्रेसने सातत्याने सुरूच ठेवले. कारण, इतरवेळी बाहेर कितीही बोंबा ठोकल्या, तरी काहीही साध्य होणार नाही, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. तेव्हा, २०१९ मध्ये आपल्या ‘हाता’चा टिकाव लागणार नाही, याची पूर्वकल्पना असलेल्या काँग्रेसने कर्नाटकमध्ये जेडीएसच्या अल्पमतातील सुकुमारांना मुख्यमंत्रिपदी बसवून विरोधकांसह विजयाचे ‘हात’ उंचावले खरे, पण आता तोच सुकुमार अश्रू ढाळतोय आणि पश्‍चात्तापाच्या आगीत होरपळतोय. त्यामुळे काँग्रेसची अस्तित्व दिखाव्याची धडपड अजिबात लपून राहिलेली नाही. देशातील प्रत्येक छोट्या-मोठ्या मुद्द्यावर उलटसुलट मतप्रदर्शन करण्यापासून ते रस्त्यावर उतरून आपण लोकांमधलेच एक असल्याचे पटवून देण्याचा काँग्रेसचा केविलवाणा चेहरा साफ उघडा पडलाय. पण, इतके सगळे होऊनही ‘गिरे तो भी टांग उपर’ हाच राहुलबाबांचा अतरंगी तोरा...
 
जनतेचे कळीचे प्रश्‍न सोडून संपूर्ण बहुमतातील सरकारवर असा अविश्‍वासाचा ठराव मांडून त्याचा बाजार मांडण्याचा विरोधकांनी केलेला कालचा आणखी एक निष्फळ प्रयोग. ज्याने साध्य तर काहीच झाले नाही, उलट जनतेचाच पैसा आणि वेळ मात्र वाया गेला. तेव्हा, मोदीद्वेषापोटी असा फार्स रचण्यापेक्षा राहुलसह विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे. कारण, राहुल, तुला अविश्‍वासाचा जुमला काही जमला नाही...
@@AUTHORINFO_V1@@