प्रशासकीय व्यवस्थेतील ‘या सम हा...’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2018   
Total Views |



कार्यक्षमता, निष्ठा आणि संवेदनशीलता या बळावर जगदीश पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत अनेक धडाधडीचे निर्णय घेतले. प्रशासनामधील असा हा मानवी संवेदनशील चेहरा...

 

घरदार, अगदी गावही नसलेल्या आणि कोणतीही नागरी ओळख नसलेल्या ४२ हजार भटक्या-विमुक्त बांधवांना सोलापूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी जातीचा दाखला, रेशनकार्ड, वास्तव्याचा दाखला, मतदार ओळखपत्र देण्यात आली. हा मानवी नव्हेच, तर दैवी निर्णय घेतला होता तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी. ते सध्या विभागीय आयुक्त, कोकण या पदावर कार्यरत आहेत. जगदीश पाटील हे मूळचे उजनीचे. वडील शिक्षक, तर आई गृहिणी. घरची शेती आणि सामाजिक, सांस्कृतिक त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता. त्यातच जगदीश यांना वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. जगदीश म्हणतात, “अवांतर वाचन इतके केले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देतानाही इतर कोणतीही विशिष्ट पुस्तकं विकत घ्यावी लागली नाही आणि ही सर्व पुस्तकं वाचनालयात बसून वाचली होती. मी असंख्य ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या. प्रशासन हे सुशासन होण्यासाठी प्रशासनाचे अंतरंग मानवी असावे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून कळते.”

 

जगदीश पाटील यांच्या प्रशासकीय कार्यातील मानवी अंतरंग प्रकर्षाने जाणवतात. त्यामधील एक लातूर जिल्ह्यामध्ये झालेला भूकंप. त्या भूकंपाच्या एक दिवस अगोदर गणेशविसर्जन होते. त्यावेळीही शहरात मूर्तीसंबंधात अफवांचे पीक उठले होते. काही उणेदुणे राहू नये, म्हणून जगदीश पाटील स्वत: रस्त्यावर उतरले होते. पहाटेचे चार वाजले. मिरवणुका सुरूच होत्या. इतक्यात मोठा आवाज झाला, हादरे बसले. जगदीश पाटील गणेशविसर्जनाच्या प्रमुख ठिकाणी गेले आणि माईक हातात घेतला आणि भूकंप झाल्याची घोषणा करुन आवश्यक त्या सूचना देऊन ते लगेच किल्लारीच्या दिशेने निघाले. भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जगदीश यांनी अफाट परिश्रम घेतले. त्याचवेळी त्यांच्या उजनीगावालाही भूकंपाचा धक्का बसला होता. जगदीश यांचे आईवडील ज्या घरात होते ते घरही भूकंपाने कोसळले होते. त्यांनी शेतामध्ये एक खोपटे बांधले होते. पण, या दरम्यान जगदीश यांना एकदाही घरी जाता आले नाही. कारण, भूकंपाने त्राहिमाम झालेल्या भागाचे पुन्हा जगणे उभे करायचे होते. त्याच दरम्यान जगदीश यांचे आईवडील ज्या खोपट्यात होते, ते खोपटे आणि जवळ बांधलेली गुरेढोरेही क्षणार्धात जळून खाक झाली. जीव मुठीत घेऊन बसलेल्या आईवडिलांची व्यवस्था करण्यासाठी जगदीश यांनी थोडावेळ काढला, एवढेच काय ते...

 

जगदीश यांनी सरकारी चौकट न मोडता, त्या चौकटीला व्यापूनच प्रशासकीय निर्णय घेतले. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना जगदीश पाटील यांनी सोलापूरच्या सर्व मान्यवरांना, समाजप्रतिनिधींना एकत्र आणून एक अफलातून निर्णय घेतला. त्यांनी बार्शीमधील विविध ठिकाणी बसवलेले सर्व पुतळे एकत्र आणले आणि ते एका मोठ्या उद्यानात बसवले. हा होता तो धाडसी निर्णय. प्रशासकीय अधिकारी म्हणून जगदीश यांची नियुक्ती महाराष्ट्रभर विविध ठिकाणी झाली, पण त्यांची नियुक्ती लातूरला झाली तेव्हा मात्र त्यांना प्रश्न पडला. कारण, जगदीश यांचे मूळगाव लातूर जिल्ह्यातले. तिथे वडिलोपार्जित घर, शेतीभाती आहे. आपल्याच जिल्ह्यात अधिकार मिळावा म्हणून जंगजंग पछाडणाऱ्यांच्या जगात जगदीश पाटील यांचा विश्वामित्री पवित्रा वाखण्यासारखा आहे.

 

जगदीश यांचे घरचे सगळे आलबेल असले तरी त्यांच्या प्रशासनातील कारकीर्दीचा प्रारंभ सरळ झाला नाही. खरं तर जगदीश यांना प्रशासनात यायचेच नव्हते. पण, त्यांच्या एका मित्राने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अर्ज आणला, त्यांच्यासाठी भरला आणि पोस्टातही टाकला. त्यानंतर मित्राच्या आग्रहाखातर जगदीश परीक्षेला बसले. निकाल लागणार त्याच दिवशी जगदीश यांच्या काकांना कुणीतरी सांगितले की, “जगदीश उत्तीर्ण झाले, आता कलेक्टर झाले” झाले, मग काय काकांनी ‘आमचा जगदीश कलेक्टर झाला’ म्हणत गावभर पेढे वाटले. पण, जेव्हा निकाल लागला त्यात जगदीश मात्र अनुत्तीर्ण झाले. पुढे जगदीश यांनी पुन्हा एमपीएसीची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाले. नियुक्ती झाल्याचेही त्यांना कळवण्यात आले. प्रशासनात नियुक्ती होणार म्हणून जगदीश यांनी बँकेतील चांगल्या पगाराची नोकरीही सोडली. पण, त्यानंतर नियुक्तीचे पत्र मिळालेच नाही. त्याचवेळी शेतात कामावर माणसे नव्हती. त्यावेळी सर्व शेतीची आणि गुराढोरांची कामे जगदीश यांनीच करावी लागली.

 

प्रदीर्घ कालावधीनंतर जगदीश यांना नियुक्तीचे पत्र मिळाले. त्या काळात अवघ्या २६ वर्षे वयाच्या जगदीश यांनी प्रचंड मानसिक त्रास सोसला. पण, आईबाबांचा आधार आणि मनातल्या सकारात्मक विचारांच्यासोबतीने जगदीश यांनी परिस्थितीवर मात केली. चित्त विचलीत न करता, ते धीराने प्रसंगाला सामोरे गेले. या संपूर्ण जीवनप्रवाहात त्यांच्या पत्नी डॉ. माया यांनी जगदीश यांना सर्वार्थाने साथ दिली. धीर, सबुरी, नम्रता, निष्ठा आणि त्याबरोबरच मानवी संवेदना जपणारे आणि जगणारे जगदीश पाटील यांचे व्यक्तिमत्व म्हणजे ‘या सम हा...’

 

9594969638

@@AUTHORINFO_V1@@